
भारतात पूर्वी सोन्याचा धूर निघत असे असं म्हणतात. या समृद्धीचं एक कारण भारतातल्या वस्त्रोद्योगात होतं. उत्तम विणकाम आणि वैविध्यपूर्ण कलात्मक डिझाइन्स यामुळे भारतातलं कापड जगात सर्वोत्तम मानलं जायचं. पुढे इंग्रजांच्या आगमनानंतर त्याला उतरती कळा लागली. या वस्त्रपरंरपरेचा अभ्यास करून, आणि स्थानिक कलाकारांना सक्षम करत या वस्त्रनिर्मितीला पुन्हा उभारी आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चिन्मय आणि सरोज मिश्र यांच्याशी बातचीत.
चिन्मय मिश्र हा एक अवलिया माणूस आहे. अर्थात ‘अवलिया' हा शब्ददेखील त्याचं वर्णन करायला अपुरा पडावा. कारण ‘अवलिया' म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एखाद्या स्वच्छंद, कुठलीही जबाबदारी न घेता फिरणाऱ्या माणसाची प्रतिमा येते. हा माणूस वृत्तीने कलंदर, माया-मोह-अहंकार यांच्या पाशात न सापडणारा आहे; पण त्यासोबतच तो जबाबदाऱ्या घेणारा व त्या बिनतक्रार निभावणारा आहे. कुटुंब, संस्था, विविध संघटना या सर्वांचा भार तो हसत हसत आपल्या डोक्यावर घेतो आणि हसत हसत त्या जबाबदाऱ्या पारही पाडतो. सामाजिक कार्यकर्ता, लेखक, पत्रकार, संघटक, विचारवंत, रसिक, साहित्य-संस्कृतीचा भाष्यकार, अनुवादक, लेखक आणि कुटुंबवत्सल माणूस अशा अनेक भूमिकांमध्ये तो दिसतो.
चिकित्सकवृत्तीसोबतच तरल संवेदनक्षमता व सौंदर्यदृष्टी लाभणं हा एक दुर्मिळ मणिकांचन योग आहे. अशा ‘श्रीमंत' माणसाशी कोणत्याही विषयावर गप्पा करणं हा एक विलक्षण आनंददायी अनुभव असतो. तुम्ही त्याच्याशी किती तरी तास, नव्हे, अनेक दिवस गप्पा करू शकता आणि या गप्पांमध्ये तो एकाही मुद्द्याची पुनरावृत्ती करणार नाही. सहज बोलता बोलता तो भाषा, समाज, संस्कृती, इतिहास, लोकसाहित्य, लोककला, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांविषयी अनमोल माहिती देतो; सोबतच अनेक विषयांवर मौलिक वैचारिक मांडणीही करतो आणि हे करताना आपण काही विशेष करत आहोत हा भाव कुठेही नसतो. हिंदीभाषी प्रदेशात आढळणारी मिठास बोली आणि जातिवंत विद्वानांत आढळणारी विनम्रता यांचा अनोखा संगम त्याच्या व्यक्तिमत्त्वात झालेला दिसतो.
चिन्मय मिश्र हे हिंदीतील मान्यवर पत्रकार व स्तंभलेखक आहेत. ‘अभ्यासोनी प्रकटावे' हा निजगुण असल्यामुळे त्यांच्या लिखाणाला भक्कम संशोधनाची बैठक असते. विकास व विस्थापन या विषयावरील त्यांची दोन पुस्तकं- ‘प्रलय से टकराते समाज और संस्कृति' व ‘बुंदेलखंड : पलायन की निरंतरता' अतिशय मोलाची आहेत. सिद्धहस्त अनुवादक ही त्यांची आणखी एक ओळख. हर्ष मंदार यांच्या ‘इनव्हिजिबल पीपल' या पुस्तकाचा त्यांनी केलेला अनुवाद अप्रतिम आहे. गेली अनेक वर्षं ते ‘विकास संसद' या समूहाद्वारे जिल्हास्तरीय संवेदनशील व अभ्यासू पत्रकार हुडकून त्यांना घडवण्याचं व त्यांचं नेटवर्क उभारण्याचं कार्य करत आहेत. त्यासाठी फेलोशिप, प्रशिक्षण, संमेलनं, चर्चासत्रं यांचं आयोजन करत आहेत. या समूहाची सर्व प्रकाशनं ‘कॉपीलेफ्ट' आहेत; म्हणजे त्यांतील मजकूर कोणीही कोणाचीही परवानगी न घेता कुठेही मुक्तपणे वापरू शकतो. चिन्मयजींनी अनेक सामाजिक प्रश्नांवर माहितीपट बनवले आहेत. याशिवाय ते देशभरात ओळखले जातात ते सर्वोदय प्रेस सर्व्हिस (सप्रेस)शी असणाऱ्या त्यांच्या दृढ नात्यामुळे. महेंद्रकुमार यांनी स्थापलेला व नावारूपाला आणलेला ‘सप्रेस' हा पत्रकारितेतील कार्यकर्तेपणाचा एक अद्भुत नमुना आहे. एक खोली, एक कॉम्प्युटर, एक प्रिंटर व एक मदतनीस एवढ्या बळावर नर्मदा आंदोलनाचा विचार पूर्ण जगभर पोहोचवण्याचं बरंच श्रेय ‘सप्रेस'ला जातं. महेंद्रजींनंतर दहा-बारा वर्षं चिन्मयजींनी ‘सप्रेस'ची धुरा वाहिली. ते प्रत्येक आठवड्याला समाजाच्या निकडीच्या विषयांवर किमान चार-पाच लेख लिहून/अनुवादित करून देशभरातील दोन-अडीचशे नियतकालिकांना पाठवत. त्यांनी केलेल्या अनुवादामुळेच पी. साईनाथ हा पत्रकार सर्व हिंदीभाषिक राज्यांत पोहोचला. मेधा पाटकर, संजय संगवई, अरुणा रॉय, अनुपम मिश्र, राधा भट्ट अशा अनेकांना त्यांनी लिहितं केलं. अन्नसुरक्षा, पेटंट, जागतिक अर्थव्यवस्था अशा अनेक विषयांवर जगभरात होत असणारं मंथन त्यांनी स्थानिक पातळीवर पोहोचवलं, तसंच स्थानिक पातळीवरील विस्थापन, नैसर्गिक संसाधनांचा विध्वंस, मनरेगा असे प्रश्न सर्वदूर पोहोचवले. अर्थात या सर्व कामांतून होणारा आर्थिक लाभ शून्य.
गेल्या काही वर्षांत आपला देश जगभरातील औषधी उद्योगांसाठी मानवी चाचण्या (क्लिनिकल ट्रायल्स) घेण्याचं केंद्र बनला आहे. कारण मानवी जीवित व आरोग्य यांचं रक्षण करणारे कायदे इथे कमी, व जे आहेत त्यांना धाब्यावर बसवणं अतिशय सोपं आहे. नव्या औषधांना कमी खर्चात, कमी त्रासात झटपट मंजुरी मिळणं इथे सहज शक्य आहे. त्यात मूठभर हितसंबंधीयांचा लाभ होतो; पण त्या चाचण्या स्वतःवर करून घेण्यासाठी तयार झालेल्या शेकडो व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो, हजारो व्याधिग्रस्त होतात व त्यापैकी कोणालाच नुकसानभरपाई दिली जात नाही. कारण या चाचण्यांच्या विपरीत परिणामांची नोंदच मुळात ठेवली जात नाही. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून हे वास्तव सर्वांसमोर आणणारेही चिन्मय मिश्रच होते.
असे चिन्मय मिश्र व त्यांची पत्नी सरोज या दोघांनी आपल्या असंख्य व्यापांतून वेळ काढून गेली दोन दशकं नेटाने एक काम उभारलं आहे. ते म्हणजे प्राचीन भारतीय वस्त्र परंपरेचा अभ्यास करून तिला नव्याने उभारी देण्याचं.
अशा बहुरूपी व्यक्तित्वाला आम्ही त्याच्या घरी इंदोरला जाऊन भेटलो. इंदोर हे तसं खवय्यांचं गाव, आणि मिश्र कुटुंबीय तर कमालीचं आतिथ्यशील. त्यामुळे चहा, नाश्ता, जेवण, फराळ, सरबत यांचे अनेक राऊंड रिचवत दोन दिवस आमच्या गप्पा चालल्या होत्या. या गप्पा अर्थातच अनेक विषयांवर होत्या. पण इथे त्यातील एकाच पैलूवर भर देत आहोत. प्राचीन भारतीय वस्त्र परंपरेसंदर्भात ते करत असलेल्या कामातून त्यांच्या हाती लागलेल्या काही निष्कर्षांवर.
आजच्या काळात एकीकडे जीन्ससारख्या परिधानाच्या सार्वत्रिकीकरणातून एकसाचेपणा बोकाळतो आहे, तर दुसरीकडे डिझाइन्स, पॅटर्न्स, मोटिफ्स यांची वैशिष्ट्यं नजरेआड करून त्यांची मोठ्या प्रमाणावर सरमिसळ सुरू आहे. भारतीय समाज कपड्यांवर अतोनात खर्च करतो आहे; पण घरीदारी, सार्वजनिक ठिकाणी, समारंभात भारतीय माणसं ज्या प्रकारचे कपडे घालतात, त्यावरून त्यांची सौंदर्यदृष्टी, विचारपद्धती यांची कीव करावीशी वाटते. मुळात आपण कपडे कोणकोणत्या कारणांसाठी घालतो, आपले कपडे काय दर्शवतात, कोणत्या प्रदेशात कशा प्रकारचे कपडे घालावे, पर्यावरणास प्रतिकूल कपडे वापरल्याने काय दुष्परिणाम होऊ शकतात, या सगळ्या प्रश्नांचा अजिबात विचार न करण्याचं आपण बहुधा ठरवलं आहे. परंपरा आणि संस्कृती यांच्या नावाने येता-जाता गळे काढणाऱ्या या समाजात त्याच्याविषयी प्रचंड अज्ञान आहे व येथील मौलिक सांस्कृतिक ठेवा क्षणोक्षणी नष्ट होत असताना त्याचं सोयरसुतक समाज, सरकार, माध्यमं यांना उरलेलं नाही. अशाही परिस्थितीत येथील विणकर, कलाकार व मूठभर कार्यकर्ते यांच्या बळावर आज जागतिक वस्त्रोद्योगावरील भारतीय छाप टिकून राहिली आहे. हे सर्व भान आम्हाला या बातचितीतून आलं.
चिन्मय व सरोज हा एक अविभाज्य द्वंद्व समास आहे. त्यांच्यापैकी कोणाचीच कल्पना दुसऱ्याविना करता येत नाही. त्यामुळे सुरुवातीचा अपवाद वगळता यापुढे दोघांचा उल्लेख वेगवेगळा केलेला नाही.
तुमची प्रमुख ओळख कार्यकर्ता-पत्रकार अशी आहे. पारंपरिक वस्त्रव्यवसायाशी तुमचा संबंध केव्हा आणि कसा आला?
भारतीय पारंपरिक वस्त्र उद्योगाचा अभ्यास करण्याची संधी मला (चिन्मय) खरं तर योगायोगानेच मिळाली. त्यातून देशातील शेकडो वर्षांच्या जुन्या परंपरेचे धागेदोरे माझ्या हाती आले. त्याचं महत्त्व आणि आजच्या काळात टिकाव धरून ठेवण्याची त्याची गरजही माझ्या लक्षात आली. त्याचे सामाजिक पदर लक्षात आल्याने माझा त्यातील रस वाढला आणि मी त्या संदर्भात काम सुरू केलं. ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 1992 मध्ये ‘आदिवासी लोककला अकादमी'ला दिल्लीत सूरजकुंड क्राफ्ट मेळ्याचं आयोजन करायचं होतं. मध्य प्रदेशातील आदिवासींची कला व हस्तकला अशी थीम होती. त्यात एक मोठं भव्य प्रवेशद्वार तयार करायचं होतं. साधारण 37 फूट उंचीचं त्याचं डिझाइन होतं. ते गढवा शैलीतील दंतेश्वरी देवीचं शिल्प होतं. आता दिल्लीमध्ये इतकं मोठं प्रवेशद्वार कोण तयार करणार, असा प्रश्न होता. शिवाय त्याचा खर्चही जास्त असायला नको होता. माझ्या मित्राने मला मदतीसाठी फोन केला. खरं तर अशा प्रकारच्या कामाचा मला कोणताही अनुभव नव्हता, तरीही त्याची निकड होती म्हणून मग त्या कामात उतरलो. आमच्या भागातल्या जुन्या मूर्तिकारांना थोडं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना घेऊन दिल्लीला गेलो. तिथे ते प्रवेशद्वार तयार करायला आम्हाला तब्बल दोन महिने लागले. काम पूर्ण झाल्यावर काही दिवस आम्ही तिथेच होतो. तिथे छत्तीसगढ व मध्य प्रदेशातील आदिवासी व लोक कलाकारांशी आमची गाठभेट झाली. याच काळात आदिवासी लोककला अकादमीचे संचालक डॉ. कपिल तिवारी यांच्याशीही ओळख झाली. त्यांना आमचं काम आवडलं होतं. अशा प्रकारची आणखी इतर प्रदर्शनं करण्याकरता पारंपरिक कला व हस्तकलांचा अभ्यास, संशोधन करण्याची गरज आहे असं कपिलजींना वाटत होतं. आम्ही हे काम यशस्वीरीत्या करू शकू यावर त्यांचा विश्वास बसला होता. अशा रीतीने अपघातानेच आम्ही या कामात गुंतलो. सामाजिक आंदोलन, पत्रकारिता, साहित्य, थिएटर आदी क्षेत्रांतील लोकांशी मैत्री हा आमचा मूळ ठेवा. त्यातून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा यांचे संस्कार मनावर खोलवर रुजत गेले होते. सत्याच्या व चांगुलपणाच्या मार्गावर दृढपणे चालत राहू इतकं बळ या साऱ्यातून आम्हाला मिळालं होतं, आणि तीच
पुंजी घेऊन आमचा आंदोलनाकडून कलेच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना काय अडचणी आल्या? त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं?
भारतीय वस्त्रोद्योगाचा इतिहास व भौगोलिक वैशिष्ट्यं जाणून घेण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना जाऊन भेटायला हवं असं वाटत होतं. पण आम्हाला केवळ कुक्षीच्या मोहम्मदभाईंबद्दलच माहिती होती. कुक्षी हा मध्य प्रदेशातील धार जिल्यातील लाखभर वस्तीचा एक तालुका आहे. आम्ही त्यांना तिथे जाऊन भेटलो. त्यांच्याकडून इतर ठिकाणच्या केंद्रांची माहिती मिळवली आणि आमच्या हाती अक्षरश: घबाड पडलं. कारण त्यातून आम्हाला देशातील विविध प्रांतांतील ठिकाणं व समुदायांचा शोध लागला.
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील तारापूरचा एक पत्ता कळला होता. आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यावर लक्षात आलं की अख्खं गावच कापडावरील छपाईचं काम करत आहे. त्यानंतर आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगढ, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील विणकाम व कापडछपाई करणाऱ्या अंदाजे तीनेकशे केंद्रांना भेट दिली. कोणत्या ठिकाणी कसं काम केलं जातं, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्यानुसार कापडनिर्मितीत त्याचा कसा फायदा होतो याचा आम्ही अभ्यास केला. जसजसे आम्ही या विषयाच्या खोलात शिरत गेलो तसतसे त्यातील कंगोरे कळत गेले. त्याची मजा येऊ लागली. या सगळ्याची एक नशाच चढत गेली म्हणू या ना! या प्रवासात आम्ही त्यांचं काम, त्यामागील इतिहास, विज्ञान व समाजशास्त्र समजून घेतलं. समाज व शासन यांच्या पाठबळाशिवाय स्वतःच्या हिमतीवर हे कलाकार शेकडो वर्षं तग धरून होते. मध्य प्रदेश शासन प्रजासत्ताकदिन उत्सव साजरा करतं. त्यातील ‘लोकरंग'सारख्या कार्यक्रमांतून आम्ही या कलाकारांना समाजासमोर आणलं. त्यांच्या कामाचं डॉक्युमेंटेशन केलं. त्याचं संकलन, प्रदर्शन व मार्केटिंग हा या कामाचा भागच आहे असं मानून आम्ही ते काम केलं. कलाकारांच्या प्रशिक्षणासाठी कार्यशाळा घेतल्या. त्यांच्यासाठी नवी डिझाइन्स, ब्लॉक्स बनवले. जनतेला त्यांच्या कामाचं महत्त्व कळावं म्हणून दिवसा प्रात्यक्षिक व संध्याकाळी विक्री असे कार्यक्रम केले. त्यातून या वस्त्रांची वैशिष्ट्यं, त्यामागील मेहनत ग्राहकांच्या ध्यानात आली. आता त्यांची विक्री 20-25 लाखांवरून 6 कोटींवर गेली आहे.
पुढे तुम्ही पारंपरिक डाइंग व प्रिंटिंग यांचं पुनरुज्जीवन करण्याच्या कामात गुंतलात. काय दिसलं तुम्हाला?
कापडनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया मुख्यत्वे बुनाई, छपाई व रंगाई अशा तीन टप्प्यांमध्ये केली जाते. ही कामं भारताच्या निरनिराळ्या भागांतल्या विविध जाती करत आल्या आहेत. किंवा आपण असंही म्हणू शकतो, की त्यांच्या कामांवरून त्यांच्या जाती तयार झाल्या आहेत. आपल्याकडे कापडनिर्मितीची सुरुवात साधारण सहाव्या शतकात झाली असावी. आज आपण रासायनिक रंग सरसकट वापरतो. ते पक्के असतात म्हणून वापरायला सोयीचे. पण आरोग्य व पर्यावरण यांच्या दृष्टीने ते घातक असतात. आपल्याकडे पूर्वीपासून नैसर्गिक रंगच वापरले जात. त्या रंगांची मजाच वेगळी. पण इतकी वर्षं होऊनही त्यामागील विज्ञान शोधण्याचा प्रयत्न झालेला नाही. मात्र, येथील कारागिरांनी शेकडो वर्षं प्रयोग करून त्यातील महत्वाची सूत्रं शोधून काढली व त्याचं तंत्रज्ञानही विकसित केलं. असं मानलं जातं की महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांमध्ये रंगकाम केलेले काही कारागीर मध्य प्रदेशातील कुक्षी या गावी आले. तिथे त्यांनी इतर कामांबरोबरच कापडावरदेखील रंगाई-छपाई करण्याचे प्रयोग केले. हळूहळू ते अधिकाधिक तरबेज होत गेले व व्यावसायिक छपाईकाम करू लागले. इथलं छपाईकाम जगभर ‘बाग प्रिंट' या नावाने ओळखलं जातं. हे नावही बाग लेण्यांवरूनच पडलेलं आहे. कुक्षीने आपली परंपरा पुढेही शेकडो वर्षं टिकवत ठेवली. इतकी, की आजही देशभरात कुक्षीच्या दर्जाचं काम कुठेही होत नाही.
कुक्षीप्रमाणेच मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील तारापूरमध्येही अशा प्रकारचं प्रिंटिंगचं काम साडेतीनशे वर्षांपासून होत आहे. या गावीही आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला परंपरा जपलेली आणखीही गावं कळली. राजस्थानातील छिपा अकोला हे तर संपूर्ण गावच कापडावरील छपाईकाम करत असल्याचं कळलं.
परंपरागत वस्त्रोद्योग करणाऱ्यांमध्ये सिंधी लोकांची संख्या लक्षणीय आहे. त्यातही खत्री मंडळी जास्त. खत्री हिंदूंमध्येही आहेत आणि मुस्लिमांमध्येही. 600-700 वर्षांपासून हिंदुस्थानात राहणारे मुस्लिम खत्री फाळणीच्या वेळी पाकिस्तानात स्थलांतरित झाले; पण तिथे वर्षभर राहिल्यावर तिथलं हवामान आणि पाणी वस्त्रनिर्मितीला अनुकूल नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मग ते विशेष अनुमती घेऊन भारतात परत आले. इथे आल्यावर पूर्ण काम ते अलिजरीन तंत्राने करू लागले. अलिजरीन हा हँड ब्लॉक प्रिंटिंगचा एक प्रकार आहे. हिंदू खत्री अजरख शैलीत काम करतात. हे लोक राजस्थानातील बाडमेरपासून मध्य प्रदेशातील मंदसौरपर्यंत पसरले आहेत. सध्या भारतात अजरखचं सगळ्यात चांगल्या दर्जाचं काम बाडमेर आणि कच्छमध्येच होतं. अजरखचं कापड विणल्यावर दोन्ही बाजूंची विणाई अगदी एकसारखी दिसते. या कापडाला पाकिस्तानात फार मोठी मागणी आहे. तिथे हे वस्त्र लग्नसमारंभ, मुंडण आदी समारंभांमध्ये अंगावर घेतलं जातं. महत्त्वाचं म्हणजे त्याला सोन्याचा भाव आहे. आता-आतापर्यंत सोन्याच्या मोबदल्यात हे कापड दिलं जात असे.
खत्रींप्रमाणेच छिपा ही दुसरी जात आहे. यांच्यातील काहीजण सन 1330-40 च्या आसपास, तुघलकाच्या काळात मुस्लिम झाले; पण त्यांची आडनावं सोलंकी, ठाकूर अशी हिंदूंसारखीच असतात. हिंदू छिपा लोकांना नामदेव छिपा असंही म्हटलं जातं. राजस्थानातील चित्तोड, उदयपूर, जोधपूरपर्यंत त्यांच्या वसाहती आहेत. दोन्ही धर्मांतील छिपा लोकांमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. त्यांची वंशावळ सांगणारे त्यांचे बडवेही एकच आहेत. त्यांच्यातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे हिंदू छिपा कापडांवर चित्र उमटवताना मानवी आकृती काढतात, तर मुस्लिम छिपा त्या काढत नाहीत. हिंदू-मुस्लिम छिपांच्या दरम्यान रोटीव्यवहार होतो पण बेटीव्यवहार होत नाही. या दोन धर्मांतील लोकांना एकमेकांशी बांधून ठेवलं ते कापडावरच्या कलाकारीने.
छिपा लोक रंगाई आणि छपाई या दोन्ही कामांत असतात, पण नीलगर समाज हा प्रामुख्याने रंगाईकामच करतो. हे लोक विशेषतः निळीचं काम करतात. नदीच्या, विशेषतः विशिष्ट उपनद्यांच्या काठावर त्यांची वस्ती असते. ते नदीचे गुणधर्म उत्तम रीतीने जाणतात. त्यामुळे कापडावर एखादा रंग हवा असेल तर कोणत्या नदीच्या पाण्यातून तो मिळू शकतो हे त्यांना पक्कं ठाऊक असतं. तसं पाहता छपाईपेक्षा रंगाई करणं जास्त कौशल्याचं काम आहे. कारण त्यामागे खूप मोठं विज्ञान आहे. रंगाई करताना पाण्याचे रासायनिक गुणधर्म, त्याचं तापमान, रंगाच्या द्रावणात मिसळण्याचे विविध पदार्थ (उदा. रंग पक्का करणारे फिक्सर) व त्यांचं प्रमाण या साऱ्यांचा बारकाईने विचार करावा लागतो. नीलगर समाज त्यात तरबेज आहे.
प्रत्येक गावाचं, प्रदेशाचं आणि जातीचं आपलं म्हणून काही वैशिष्ट्य आहे. आधी उल्लेख केलेल्या मध्य प्रदेशातील तारापूरसारख्या एका गावात मात्र आम्हाला बांधणी, बाटिक प्रिंट, नीळ रंगकाम, रासायनिक रंगाई, ब्लॉक प्रिंट अशी सहा वेगवेगळी कामं करणारे कारागीर भेटले. पण हे उदाहरण अगदीच विरळा म्हणायचं. एरवी हा उद्योग मुख्यत्वे कौटुंबिक एकता तसंच साधनसामग्री व मनुष्यबळाचं विकेंद्रीकरण यामुळे अजून तग धरून आहे. बांधणीचं कापड तयार करताना गाठी बांधण्याचं काम, कापडावर भरतकाम करणं आदी कसबी कामं घरातील महिला करतात; तर कापडाची छपाई, रंगाई, कापडाची विक्री अशी महत्त्वाची कामं कुटुंबातील पुरुष माणसं करतात. पण गंमत म्हणजे वस्त्राची किंमत ठरवण्याचा अधिकार घरातील स्त्रियांकडे राखीव आहे. ज्या कुटुंबामध्ये आर्थिक संपन्नता येऊ लागली त्या महिला वस्त्रनिर्मिती प्रक्रियेतून बाहेर पडल्या, पण मूल्यनिश्चितीच्या निर्णयप्रक्रियेत मात्र त्यांचं स्थान टिकून राहिलं. बिगर आदिवासी समाजांप्रमाणेच छत्तीसगढमधील आदिवासी विणकर व रंगारी समूहांतही त्यांच्या उत्पादनाची किंमत घरातील स्त्री ठरवते हे लक्षात घेण्यासारखं आहे.
गुजरातमधील पारंपरिक वस्त्रनिर्मिती टिकून राहण्याचं कारण ठसठशीतपणे पुढे येईल असं एका गावचं उदाहरण सांगण्यासारखं आहे. भुजच्या जवळचं धमडका नावाचं गाव जेव्हा भूकंपाने नेस्तनाबूत झालं, तेव्हा घरंदारं तर मोडलीच, शिवाय पाण्याचे सारे स्रोतही नष्ट झाले. त्यामुळे अजरखचं काम बंद होण्याची वेळ आली; पण तेथील कारागिरांनी हिम्मत न हरता 300-400 एकर जमीन खरेदी करून अजरखपूर नावाचं एक नवं गाव वसवलं. त्यात प्रत्येक कलाकार कुटुंबाला जमिनीचे मोफत प्लॉट दिले, कपडे धुण्यासाठी सार्वजनिक घाट बनवला आणि व्यवसायाची घडी पुन्हा बसवली. परस्परांशी स्पर्धा न करता सहकारातून सर्वांचा विकास घडवून आणण्याची आपल्या पूर्वजांची शिकवण त्यांनी प्रत्यक्षात आणली आणि त्यामुळे ते नव्याने उभे राहू शकले. एकूण, भाऊबंदकी न करता सर्व समाजाला सोबत घेऊन चालणं आणि स्त्रियांना योग्य स्थान व प्रतिष्ठा देणं या गुणांच्या जोरावर हे सर्व कलाकार समूह इतकी शतकं तग धरून आहेत. जागतिकीकरणाच्या झंझावातातही ते टिकून राहतील ते याच स्पिरिटच्या जोरावर!
आपल्याकडच्या वस्त्रपरंपरेत प्रांतांनुसार वैविध्यही असेलच. त्याबद्दल थोडं सांगा..
आपल्याकडे भौगोलिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व परिस्थितीचं प्रतिबिंब वस्त्रांच्या डिझाइनमध्ये पडलेलं आढळतं. महिलांच्या पहिरावांमध्ये हे विशेषकरून दिसून येतं. एके काळी आपल्या देशात कोणती स्त्री कोणतं वस्त्र परिधान करते यावरून ती कोणत्या प्रदेशातील, कोणत्या जाती-वर्गातून येते हे सहज समजत असे. एका अर्थाने ती तिची आयडेंटिटी असे. तेथील परिसर, त्याची भौगोलिक वैशिष्ट्यं यांचं प्रतिबिंब त्या वस्त्राच्या डिझाइनमध्ये पडलेलं असे. आता सर्वत्र सरमिसळ झाली आहे. ही वैशिष्ट्यं पुसली जाऊ नयेत, त्यांचं वेगळेपण टिकावं म्हणून आम्ही काम करत आहोत. पण प्रादेशिकतेचा गंध नसणारे मार्केट फोर्सेस हा त्यामागील मोठा अडसर आहे. भटक्या जमातींच्या पारंपरिक पेहरावाची एक गंमत आहे. देशाच्या विविध भागांत भटके व धनगर समाज फिरत असतात; पण ते जिथून येतात त्या प्रदेशाची छाप त्यांच्या पेहरावावर असते. त्यांच्या पेहरावावरून त्यांच्या जाती ओळखता येतात. राजस्थानातील धनगर महिलांचा पेहराव कसा आहे, त्यावर कोणतं डिझाइन आहे यावरून ती महिला उंटचराई आहे, गाय चारणारी आहे, मेंढपाळ आहे की बकरी पाळणारी आहे ते सहज कळतं. राजस्थानात ओढणीवरून स्त्री विवाहित आहे की अविवाहित हेदेखील ओळखू येतं.
साड्यांच्या विणकामात तेथील भौगोलिक परिस्थितीचं प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसतं, निदान पूर्वी तरी असंच चित्र होतं. मध्य प्रदेशातील चंदेरी साडी बघा. तेथील कलाकार हे अनेक शतकं विपरीत भौगोलिक (आणि अनेकदा राजकीय) परिस्थितीत काम करत आले आहेत. त्या साड्यांच्या बुनाईत टोकदार व अँग्युलर पॅटर्न्स असतात. उलट, महेश्वर साड्या. माळव्याच्या सपाट शांत प्रदेशात काम करणारे विणकर महेश्वरी साड्या विणताना अतिशय सॉफ्ट पॅटर्न्स विणतात. त्यात टोकदारपणाऐवजी गोलाकार लहरी तुम्हाला दिसतील. चंदेरी साड्यांमध्ये एक पॅटर्न सूर्योदयाचा आहे. तिथे सूर्य उगवताना जसा दिसतो त्याचं प्रतिबिंब त्या विणकामात पडलेलं तुम्हाला दिसेल. पण आजकाल पॅटर्न्स असे विणकराच्या मनात उगवत नाहीत, ते सरळ टेबलावरून कॉम्प्युटरवर व तिथून त्याच्या हातात जातात व त्याप्रमाणे त्याला काम करावं लागतं. कारण विणकर हा एक कलाकार आहे हेच मुळात कुणाला मान्य नाही.
ही समृद्ध वस्त्रपरंपरा आपल्याकडे निर्माण झाली व टिकून राहिली, तिचं भारताचा इतिहास व अर्थव्यवस्था यांच्याशी काय नातं दिसतं तुम्हाला?
माझ्या मते भारत कधीही कृषिप्रधान देश नव्हता, ती कायम नागरी व्यवस्था होती. आपण भारताच्या आर्थिक इतिहासात शांतपणे डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की इथे कपड्याचं विणकाम, भांडीनिर्मिती, मसाल्यांचं उत्पादन असे व्यवसाय पूर्वापार चालत आलेले आहेत. इथे पूर्वापार मोठ्या बाजारपेठा होत्या. माल परदेशी पाठवण्यासाठी शिपयार्ड बांधले गेले होते. लक्षात घ्या, आपण अन्नधान्य नव्हे, तर कपडे, मसाल्याचे पदार्थ व दागिने-आभूषणं निर्यात करत होतो. आणखी एक दाखला सांगण्यासारखा आहे. ‘फोर्ब्ज' मासिकानुसार अकबर हा जगाच्या इतिहासातील सर्वांत श्रीमंत सम्राट होता. याचा अर्थ काय होतो? शेतीच्या जोरावर एखादं साम्राज्य इतकं समृद्ध झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? इंग्रज भारतात आले आणि त्यांनी ही व्यवस्था तोडली. इथल्या वस्त्रोद्योगातील कुशल कारागिरांना उखडून टाकल्याशिवाय आपल्या कापडगिरण्या चालणार नाहीत हे त्यांनी ताडलं. त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी हा उद्योग मोडला. लोकांकडे जेव्हा उपजीविकेचं साधन राहिलं नाही, तेव्हा शहरातील लोक हळूहळू गावांकडे वळले आणि शेती करू लागले. त्याला आपण रिव्हर्स मायग्रेशन म्हणू. 1750 ते 1900च्या दरम्यानच्या कागदपत्रांत याची सगळी माहिती मिळते. आपण 1830 च्या सुमारास मेकॉलेसारख्या इंग्रज अधिकाऱ्याने ब्रिटिश सरकारला भारताची माहिती देताना काय सांगितलं होतं? या देशातील प्रत्येक गाव हे रिपब्लिक आहे, असं त्याने म्हटलं होतं. कोणत्याही गोष्टीसाठी एक गाव शेजारील गावावरदेखील अवलंबून नाही, असं त्याचं निरीक्षण होतं. याचा अर्थ त्या वेळी देशातील गावं खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होती. गावांतील नागरिकांच्या बहुतेक गरजा गावं स्वतःच भागवत होती. गांधींनी ही गोष्ट चांगली जाणली होती.
हे झालं इंग्रज भारतात येण्याआधीचं. 1947 मध्ये इंग्रज देश सोडून गेल्यानंतर स्वतंत्र भारतात पारंपरिक वस्त्रनिर्मितीच्या क्षेत्रात काय घडलं? विविध सरकारांनी आणि सरकारी व अन्य संस्थांनी कितपत काम केलं?
मी माझा अनुभव सांगतो. आम्ही सहा-सात वर्षं वस्त्र उद्योगाचा अभ्यास केला- संशोधन केलं. अनेक ठिकाणी जाऊन लोकांना भेटलो. या समाजातील लोकांना एकत्र केलं. त्यांची गरज, संसाधनं यांचा विचार करून त्यांना या व्यवसायात पुन्हा नव्याने सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर तारापूर व बागकुक्षी या दोन्ही ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रतीचं काम सुरू झालं; पण या पूर्ण काळात सरकारी पातळीवर आम्हाला हवं तसं सहकार्य मिळालं नाही. सरकारने नॅशनल हँडलूम एक्स्पो या दिशेने काय कितपत काम केलं. त्याशिवायच्या इतर उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील क्राफ्ट, लोकांची कलाकौशल्यं आदींना सरकारने प्रोत्साहन द्यायला हवं होतं. त्यातून रोजगाराच्या बऱ्याच संधी स्थानिकांना उपलब्ध झाल्या असत्या. भारतात कृषी क्षेत्रानंतर कापड उद्योगातूनच सगळ्यात जास्त पैसा व रोजगार निर्माण होतो; पण तरीही सरकारने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे. राजकीय नेते व नोकरशहा दोघांकडेही संवेदनशीलता व योग्य दृष्टी यांचा अभाव आहे. गेल्या काही वर्षांत तर सरकार आणि संस्था यांनी सर्व हस्तव्यवसाय संपवण्याचा चंगच बांधला आहे असंच वाटू लागलं आहे.
खरं तर कलेविषयी जाण व संवेदनशीलता असेल तर कठीण परिस्थितीतही बरंच मोठं काम उभं राहू शकतं. 1950 साली पंडित नेहरूंनी अमेरिकेतील एका उद्योजकाला भारतात बोलावून येथील वस्त्रोद्योगाला जागतिक मार्केट कसं मिळेल याबाबतचं काम त्याच्याकडे सोपवलं होतं. त्यातून ‘फॅब इंडिया'चा जन्म झाला. त्यांनी सुरुवातीला चांगलं काम केलं, पण नंतर त्यामागील विचार लोप पावला.
जनता सरकारच्या काळात अतिशय स्वस्त दरात ‘जनता साडी' विणकराने विणून द्यावी असा सरकारने आग्रह धरला. या मास प्रॉडक्शनच्या दबावात त्याची कला हरपली. हेच पुढेही चालत राहिलं.
आज खादी, हातमाग, हस्तकला अशा सर्वांच्या समस्या बिकट झाल्या आहेत. या सर्वांमध्ये हाताने केलेलं काम हा मध्यवर्ती धागा आहे. पण हल्ली सर्वत्र मशिनवर काम करून ते खादी, हातमाग किंवा हस्तव्यवसायाच्या नावाने विकलं जात आहे. त्यामुळे नकली काम करणारे खूप आहेत. चिनी यंत्रं काम करत आहेत. असुरक्षित रासायनिक रंगांचा सरसकट वापर केला जात आहे. हस्तशिल्प निगमचा निदेशकच जेव्हा कलाकुसरीच्या वस्तू किलोने खरेदी करण्याच्या गोष्टी करतो तेव्हा नकली उद्योग फोफावण्याशिवाय आणखी काय होणार?
काही संस्था आजही टिकून आहेत. त्या चांगलं काम करत आहेत; पण त्या सर्व व्यक्तिकेंद्रित आहेत. त्यांचा परस्परांशी ताळमेळ नाही. त्यामुळे त्याचा व्यापक परिणाम साधला जाऊ शकत नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी)सारख्या संस्था या विषयात रस घेतात. कामही चांगलं करतात. पण मला सांगा, एखाद्या मॉडेलने दोन लाखांचा लेहंगा परिधान केला तर एखादा क्राफ्ट्समन जगेल, पण त्याची कला वाचणार नाही. कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करावं लागेल. पण असं या संस्था करू इच्छित नाहीत. शिवाय त्यांच्यामुळे या कलेतील प्रादेशिक वैशिष्ट्यं लोप पावत आहेत. वारलीची डिझाइन्स ते मध्य प्रदेशातील साड्यांमध्ये आणून घुसवतात. असं कसं चालेल? हे काम टिकवायचं, वाढवायचं असेल तर स्थानिक संसाधन, कलाकारांचा अनुभव, त्यांच्या अबोध मनात लपलेला वारसा यांना महत्त्व द्यायला हवं आहे. त्याशिवाय विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन मिळायला हवं. केवळ निर्यातीवर भर न देता देशी व स्थानिक बाजारपेठ निर्माण करण्यावर लक्ष द्यायला हवं. नवं संशोधन, नवनिर्मिती यांवरही भर द्यायला हवा.
स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन स्थानिक बाजारपेठ तयार करण्याचं काम महेश्वरमध्येही झालं असं तुम्ही म्हणत होतात. तिथे काय घडलं?
हो. महेश्वर हे नक्कीच एक चांगलं उदाहरण आहे. 1753-54 च्या आसपास मध्य प्रदेशातील महेश्वर इथे कापड विणण्याचं काम सुरू झालं. अहल्याबाई होळकरांनी विणकरांना इथे आणून वसवण्यात मोलाची भूमिका बजावली. त्या स्वतः साड्या डिझाइन करत असत. त्यांचं राहणीमान अत्यंत साधं होतं त्यामुळे असेल कदाचित, पण महेश्वरी साड्याही तशाच साध्या, तरीही सुरेख रीतीने विणलेल्या असत. पण काही साड्या मात्र बनारसी साड्यांना चितपट करतील इतक्या सुरेख असत. अशा साड्या मग मोठी संस्थानं किंवा राजघराण्यांमध्ये विकल्या जात. परंतु इंग्रज आल्यावर देशभरातील हातमागाला उतरती कळा लागली. एक काळ असा होता जेव्हा महेश्वरमध्ये केवळ दहा-बारा हातमाग शिल्लक होते आणि 200 च्या आसपास पॉवरलूम काम करत होते. होळकरांचे वंशज रिचर्ड आणि त्यांच्या पत्नी सॅली होळकर या दोघांनी पुढाकार घेऊन या व्यवसायाला एका अर्थी नवसंजीवनी दिली. त्यांनी सरकारी कारखान्यातून कापड विणण्याचं शिक्षण घेतलं. जुन्या साड्यांचे नमुने गोळा केले. शक्य होतील त्यांचे फोटो जमवले. इथल्या विणकरांना ते दाखवले. त्यांना ते बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. तसंच त्यांना स्वतःची कलात्मकता दाखवण्याचं स्वातंत्र्यही दिलं. तयार झालेल्या साड्या इतरत्र विकल्या न गेल्यास आपण त्या स्वतः विकत घेऊ असं आश्वासन दिलं. विणकरांसाठी त्यांनी रेवा सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे विणकरांना पेन्शन लागू केलं. त्याचप्रमाणे त्यांच्या मुलांसाठी शाळा काढली. त्या शाळेत ट्युशन फी, शालेय साहित्य व युनिफॉर्म इत्यादी साऱ्या गोष्टी मोफत होत्या. या सगळ्याची किंमत ते साडीच्या किमतीमधून वसूल करून घेत असत. या साड्या ते दुकानांत विकायला ठेवत नसत. वर्षभरात जेवढी प्रदर्शनं भरत तिथेच फक्त त्या विकल्या जात. तसंच साडीवर त्या विणकराचं नावदेखील असे. रिचर्ड व सॅली यांनी विणकरांना कायम विणकर म्हणूनच वागवलं, नोकरदार केलं नाही. विणकरांची पुरेशी काळजी घेतली गेल्याने त्यांची संख्या वाढू लागली. याचा परिणाम म्हणून आज परिस्थिती अशी आहे, की महेश्वरमध्ये 2500 हँडलूम्स काम करत असून आज तिथे एकही पॉवरलूम नाही. एका अर्थाने या व्यवसायासाठी सरकार काय करू शकतं याचा वस्तुपाठच होळकरांच्या महेश्वर मॉडेलने घालून दिला आहे.
आम्हीही सध्या त्याच दिशेने काम करत आहोत. कलाकारांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देणं, नवनिर्मिती आणि नवंसंशोधन यावर भर देणं असं काम चालू आहे. दक्षिणेत उझरम्माही चांगलं काम करत आहेत. पण हे तुरळक अपवाद झाले. या कामात सरकारला खूप काही करता आलं असतं. दुर्दैवाने तसं झालं नाही. मात्र, या क्षेत्रात चार स्त्रियांनी मोठं योगदान दिलं आहे.
कोण या चार स्त्रिया?
कमलादेवी चट्टोपाध्याय, रुक्मिणीदेवी अरुण्डेल, पुपुल जयकर आणि कपिला वात्स्यायन. स्वातंत्र्यानंतर देशभरात विखुरलेले विविध हस्तव्यवसाय शोधून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सर्वप्रथम कमलादेवींनी केलं. त्यानंतर जेव्हा 1971 मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला, तेव्हा लोकांना काय काम देता येईल, असा प्रश्न तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना पडला होता. तेव्हा त्यांनी पुपुल जयकर आणि रुक्मिणीदेवी अरुण्डेल यांना मिथिलेला पाठवलं होतं. तिथे गेल्यावर पुपुल जयकर यांच्या लक्षात आलं, की इथल्या महिला अळता वगैरेसारखी कामं चांगली करतात. त्यांना रंगाचा उत्तम सेन्स आहे. त्यांनी या महिलांना कागदाच्या शीट्स दिल्या, रंग दिले आणि कागदावर काम करायला सांगितलं. त्या महिलांनी कागदावर अतिशय सुंदर पेंटिंग्ज केली. त्यांना चांगली किंमतही मिळाली. पारंपरिक कलेला बाजारात चांगला मोबदला मिळतो हे त्यातून कळतं. पुढे तो मार्ग प्रशस्त होत गेला आणि उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला. आज ही कला मधुबनी पेंटिंग्जच्या नावाने जगविख्यात आहे. शारीरिक कष्टांवर अवलंबून न राहता पारंपरिक कलांच्या माध्यमातून काम कसं उभं राहू शकतं हे या तीन स्त्रियांनी दाखवून दिलं. दुर्दैवाने काही तुरळक अपवाद वगळता अशी दृष्टी इतर कोणी दाखवली नाही.
कपिलादेवी यांचं योगदान वेगळ्या प्रकारचं आहे. त्या भारतीय साहित्य, कला या क्षेत्रांचा चालताबोलता ज्ञानकोश होत्या. भारतीय कलेचा इतिहास त्यांच्यामुळे सर्वांना कळू शकला. या चौघींचं हे योगदान पाहता मला तर असं वाटतं की या चौघींचे फोटो सर्व कला एम्पोरियममध्ये लावायला हवेत. पण कलेच्या इतिहासात त्यांच्या योगदानाची फारशी चर्चा होत नाही. तसं न होण्याचं कारण म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांमध्ये कलेची पुरेशी जाण नाही. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ही जाण व हे भान कुणीही दाखवू शकलेलं नाही.
या सगळ्याच्या पलीकडे पारंपरिक कला, त्यावर आधारित उद्योग आणि विशेषत: वस्त्रोद्योग यांचं महत्त्व गांधीजींना माहीत होतं. तुमच्याही बोलण्यात नेहमी गांधींचा संदर्भ असतो...
खरं सांगायचं तर माझ्या वस्त्रोद्योगाच्या कामातून मला गांधींचा शोध लागला. भारताची जगातील ओळख वस्त्रोद्योगामुळे होती, व हा उद्योग नष्ट झाल्यावरच देश गुलाम झाला, हे फक्त गांधींनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी वस्त्राला ‘री-इन्व्हेंट' करून स्वातंत्र्याचं साधन बनवलं. विनोबा म्हणत, की ‘गांधी नसते तर आणखी कोणी अहिंसेचा शोध लावला असता, पण खादी मात्र इतर कोणाला शोधता आली नसती.' गांधींना या प्रश्नाची इतकी आच होती, की चरखा सापडण्यापूर्वी ते म्हणत, की हाताने सूत कातता आलं नाही किंवा कापड विणता आलं नाही तर मी नागडा राहीन. खादीतच अनेक प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत असा त्यांचा विश्वास होता.
खादीची सुरुवात गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर 1920 साली झाली. परदेशी कपडे व इतर वस्तूंवर बहिष्कार टाकतानाच संपूर्णपणे आपल्या देशात तयार होणारं वस्त्र वापरण्याचा आग्रह गांधींजींनी धरला. जनतेनेही त्याला उदंड प्रतिसाद दिला. आपल्या देशात पिकणाऱ्या कापसापासून आपल्या देशात वस्त्र तयार करायचं आणि तेही लहान गावांना स्वयंपूर्ण करूनच, असं गांधीजींनी ठरवलं. त्यासाठी विचारांती त्यांना चरख्याची कल्पना सुचली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी एक युक्ती शोधली. चरख्याचं सर्वोत्तम मॉडेल तयार करणाऱ्याला त्यांनी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्या काळी एक लाखाचं मूल्य किती प्रचंड असेल हे आपल्याला कळू शकतं. आपल्या देशाला कापड उद्योगात स्वयंपूर्ण केलं तर देशाची आर्थिक बाजू बळकट होईल आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल हे गांधींनी जाणलं होतं. म्हणूनच त्यांनी खादीवर भर दिला. हा विचार समजून घेऊन अनेक लोकांनी त्यामागे आपली शक्ती लावली; पण त्यामानाने आपल्या हातात फार काही पडलं नाही असं म्हणावं लागतं.
का झालं असं? ज्या स्वातंत्र्य चळवळीतून हे वस्त्र जन्माला आलं, त्याची अशी दुरवस्था होण्याची कारणं कोणती?
गांधीच्या चळवळीचा रेटा म्हणून पूर्वी लोक खादी वापरत; पण तरीही जनमानसामध्ये खादीविषयी काहीशी अनास्था राहिली आहे असं मी म्हणेन. खादीचं जाडेभरडेपण, जास्त किंमत, रंगवैविध्य नसणं, रूक्ष व अनाकर्षक रूप यांमुळे ती कायमच सर्वसामान्यांपासून दूर राहिली. कोणी व्यक्ती ती विचारपूर्वक वापरत असेल तरच, अन्यथा साधारणपणे कोणी तिला आपलंसं केलं नाही. खादी भांडारात उभे असलेले विक्रेते कधी प्रेमपूर्वक वा आपुलकीने खादी विकताना तुम्ही पाहिले नसतील. ते केवळ उदरनिर्वाहाचं साधन म्हणून तिथे नोकरी करताना दिसतात. त्यामुळे कापडखरेदीसाठी आलेल्या ग्राहकालाही ती विकत घ्यावीशी वाटत नाही. अशी अनेक कारणं आहेत. पण त्यामुळे खादी घराघरांत पोहोचू शकली नाही. पर्यायाने खादी हा एक विचार म्हणून लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयश आलं.
खादीची किंमत जास्त असणार हे विनोबांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं. जिथे मानवी श्रम लागतील तिथे किंमत जास्त असणारच. हे सत्य स्वीकारूनच खादी वापरायला हवी. परंतु आज इतक्या वर्षांनंतरही लोक त्याच्या किमतीचीच चर्चा करत असतात. खादीचे दर जास्त असल्याकारणाने खप वाढत नसल्याची खंत व्यक्त केली जात असते. प्रत्यक्षात शासकीय संस्था व कार्यालयांमध्ये खादी वापरली गेली तर खप वाढू शकतो. रेल्वेमधल्या चादरी, इस्पितळातल्या चादरी-पांघरुणं आदी ठिकाणी खादी सहज वापरली जाऊ शकते. पण तेवढाही प्रयत्न सरकारी पातळीवर केला जात नाही. इतरही अनेक प्रश्न आहेत. आजच्या घडीला खादीत बेइमानी खूप आहे. खादीच्या नावाखाली विकलं जाणारं वस्त्र हाताने कातलेलं आणि हाताने विणलेलं असलं पाहिजे; पण आज त्याची शाश्वती राहिलेली नाही. आज किती तरी संस्था या क्षेत्रात काम करतात; पण त्यांच्या कामाचं सुसूत्रीकरण होत नाही. त्यामुळे एकत्रित परिणाम मिळू शकत नाही. शिवाय खादीत नवनिर्मितीची- इनोव्हेशनची कमतरता आहे.
खादी किंवा हँडलूमची आजची स्थिती बदलण्यासाठी काय करायला हवं असं तुम्ही सुचवाल?
खादी आणि हँडलूम दोन्हींच्या बाबतीत आपल्याला खूप प्रयत्न करण्याची गरज आहे. आम्ही या दोन्हींवर लक्ष केंद्रित करून प्रयत्नशील आहोत. आमचं असं निरीक्षण आहे, की नैसर्गिक डाईजचा उपयोग खादीवर जास्त चांगल्या पद्धतीने होतो. हँडलूममध्ये मात्र रंग सिल्कवर छान उठून दिसतात. कापड जितकं सच्छिद्र तेवढे रंग शोषण्याची त्याची क्षमता जास्त. अर्थात, ही झाली तांत्रिक बाजू. पण खादी हे केवळ वस्त्र नाही, ती एक जीवनशैली आहे. त्यासोबत तुमचं राहणीमान, शिक्षण अशा अनेक गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत सगळ्यात पहिल्यांदा लोकांमध्ये जागृती घडवून आणायला हवी. सेंद्रिय अन्नपदार्थ का खाल्ले पाहिजेत, त्यांचे फायदे काय वगैरे जसं ठासून सांगितलं जातं, त्याचप्रमाणे वस्त्राच्या बाबतीतही प्रयत्न व्हायला हवेत. त्याचे फायदे कळले की कालांतराने लोक ते स्वीकारतील.
गेल्या 20-25 वर्षांत जग बरंच बदललं आहे. जगाच्या अर्थव्यवस्था एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हस्तकला आणि त्या अनुषंगाने गांधींची दृष्टी यांचा मेळ कसा बसवता येईल असं वाटतं?
मी आधी म्हटल्याप्रमाणे आपला देश नेहमीच कारागिरांचा, हस्तकौशल्यकारांचा होता. त्यांच्या कौशल्यांना उत्तेजन देण्यासाठी व देश स्वयंपूर्ण होण्यासाठी गांधीजींनी चरख्याचा शोध लावला. आपल्या देशात हातमाग (हँडलूम) आधीपासूनच होता. त्याला खादीची जोड मिळाली तर देशात आर्थिक सुबत्ता प्रस्थापित होईल अशी गांधीजींना खात्री होती. औद्योगिक क्रांती व त्यानंतर जागतिकीकरण यामुळे जगात आणि देशात प्रचंड उलथा-पालथ झाली. आर्थिक वृद्धी झाली खरी, पण त्याच वेळेस पर्यावरणाची मोठी हानी झाली. पारंपरिक अर्थव्यवहारही मोडला गेला. या बदलाला आपल्याकडच्या श्रीमंत-सुशिक्षितांनी कोणत्याही प्रकारे विरोध केला नाही व ते सारे अपरिहार्यता म्हणून त्याला शरण गेले. खरं तर पर्यावरणाचा नाश करून नव्हे तर त्याचं रक्षण करून विकास साधला जायला हवा. या दृष्टीने इथल्या शेतकरी व कलाकारांनी आपलं स्वत्व टिकवण्याचा चिकाटीने प्रयत्न केलेला दिसतो. किती तरी पिढ्या उलटून गेल्या तरी भारतात पारंपरिक शेती, खादी, हँडलूम, हस्तकला या गोष्टी काही ना काही प्रमाणात टिकून राहिल्या आहेत. माझ्या मते ग्लोबलायझेशनला उत्तर लोकलायझेशन हेच आहे. जागतिकीकरणाचा मुकाबला करायचा असेल तर स्थानिक तंत्रज्ञान, पद्धती यांच्या पुनरुज्जीवनातूनच ते शक्य आहे. परंपरेतून आलेली कौशल्यं, विज्ञान व तंत्रज्ञान यांचं नाव लोकविद्या. लोकविद्या हेच जागतिकीकरणाला उत्तर असणार आहे.
गांधींनी ‘हिंद स्वराज' लिहिलं तेव्हा औद्योगिकीकरणाचा बोलबाला होता. पण आता शहाणी माणसं हे समजून चुकली आहेत, की औद्योगिक समाज ही दोन दिवसांची जत्रा होती, जी आता उठण्याच्या बेतात आहे. मानवाच्या इतिहासात पूर्वीच्या 3000 वर्षांत पर्यावरणाचं जेवढं नुकसान झालं नाही तेवढं मागच्या 300 वर्षांत झालं आहे. यापुढे असं चालू शकणार नाही. मानवजातीचं होणारं हे नुकसान रोखायचं तर आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. तिची सुरुवात अन्न आणि कापडापासून करता येईल. आपल्याला आपली शेती आणि वस्त्रोद्योग वाचवावा लागेल. स्वातंत्र्यानंतर आपली सौंदर्यदृष्टीच हरवली जणू. पूर्वी किती विविधता होती आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये! आज बाजार वस्तूंनी भरलेले आहेत. म्हणायला त्यात विविधताही आहे; पण ती अन्य कुणी तरी ठरवलेली आहे. मला फक्त त्यातून निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या आवडीची वस्तू मिळण्याची व्यवस्था त्यात नाही. स्त्रियांच्या वस्त्रांतील रंगसंगती, विविधता, सुंदर पोत आता संपले आहेत.
आता लोक आपल्या हवामानाला प्रतिकूल असे सिंथेटिक कपडे घालतात. पुरुषांच्या परिधानातील वैविध्य तर पार हरवून गेलं आहे. पण पहा, इतके हल्ले होऊनही आपल्या कलाकारांनी आपली कला टिकवून ठेवली आहे. बनारस हिंदू विद्यापीठाच्या कला केंद्रात ठेवलेल्या तब्बल साडेबारा मीटरच्या एका ठाणाचं वजन फक्त 250 ग्रॅम आहे. बंगालमध्ये आजही 680 क्रमांकाचं सूत कातणारे कारागीर आहेत. त्याचा धागा जवळजवळ पारदर्शी आहे. पण प्रश्न असा आहे की हे कोण खरेदी करणार? पूर्वी राजेरजवाडे होते. आज ‘पेज थ्री'वाले सेलिब्रिटी घेतात. पण हा काही पर्याय होऊ शकत नाही. समाजाने या सर्व उद्योगाच्या मागे उभे राहायला हवं. त्यामागील विज्ञान शोधून त्याला अधिक समृद्ध करायला हवं, तरच उद्याची आशा जिवंत राहू शकेल.