आगे भी जाने ना तू
पीछे भी जाने ना तू
जो भी है, बस यही एक पल है।
साहिर लुधियानवींचं हे गीत म्हणजे अनेक जीवनचिंतकांनी सांगितलेलं जगण्याचं सार आहे. जो क्षण तुम्ही अनुभवता आहात त्या क्षणात ‘असणं' म्हणजेच खऱ्या अर्थाने जगणं, जगण्याचं समाधान लाभणं. म्हटलं तर अगदी सोपी गोष्ट, म्हटलं तर भल्याभल्यांना न जमणारी. ‘त्या क्षणात असणं' नावाची ही गोष्ट आपल्या स्मार्टफोनने आणखी अवघड करून ठेवली आहे.
कशी? एखादं उदाहरण घेऊन बघू.
आपण कुठल्या तरी गावी पर्यटनाला जातो. काय हेतू असतो या पर्यटनाचा? रोजच्या धावपळीच्या रूटिनमध्ये आपण शांतता-उसंत हरवून बसलेलो असतो. आपल्या आसपासचा परिसर, माणसं; एवढंच काय, स्वतःशीही संवाद साधणं विसरून गेलेलो असतो. पर्यटनाच्या निमित्ताने या रुटिनच्या शृंखला गळून पडू शकतात, मेंदूला थोडी विश्रांती मिळू शकते. नवा परिसर, नवी माणसं अनुभवताना आपण स्वतःलाही नव्याने भेटण्याची संधी तयार होते. पण ही संधी आपण खरोखरच घेतो का?
आपण घराबाहेर पडतो तेच मुळी मेंदूला जीपीएस नावाच्या यंत्राच्या हवाली करून. जीपीएस अन् गुगल मॅप्स हे क्रांतिकारी शोध आहेत खरे. त्याचं नवल करावं तितकं कमी आहे आणि त्याच्या वापरामुळे आपलं जगणं सुकरही झालेलं आहे. पण एखाद्या तंत्राचा वापर करणं आणि त्यावर ठार विसंबून राहणं यात फरक करणं आपल्याला जमेनासं झालंय की काय? फोनवरच्या मॅप्समध्ये आपल्या गाडीचा ठिपका योग्य दिशेने जातोय की नाही हे पाहण्यात खिडकीबाहेरचा जिवंत नकाशा अनुभवणं आपण विसरत चाललोय का? रस्ते शोधण्याच्या निमित्ताने माणसांशी बोलणं, वेगळ्या भाषेच्या प्रदेशात या चौकशांमधून होणारी गंमतजंमत अनुभवणं, रस्ते चुकणं आणि पुन्हा सापडणं या सगळ्यातली मजा आपण हरवत चाललोय की काय? हे सगळे अनुभव आपल्या आसपास असतात तेव्हा आपण नेमके कुठे असतो?
प्रत्यक्ष पर्यटनस्थळी पोहोचल्यावरही आपलं वर्तन फोनकेंद्रीच नसतं का? हॉटेलांपासून इच्छित स्थळी जाण्यासाठी, चांगली रेस्टॉरंट्स शोधण्यासाठी, त्या जागांबद्दलचे लोकांचे रिव्ह्यूज वाचण्यासाठी आपण फोनवर अवलंबून असतोच. पण एखादा शांतसुंदर सूर्यास्त असो किंवा एखादी ऐतिहासिक वास्तू, तिथे थांबून केवळ त्या ठिकाणी आपलं ‘असणं' अनुभवणं दुर्मिळ होत चाललं आहे. त्या ठिकाणाचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो काढल्याशिवाय तो अनुभव पूर्ण झाला असं आपल्याला वाटत नाही. खास फोटोग्राफीच्या उद्देशानेच तिथे गेलेल्यांचा प्रश्न वेगळा. पण अन्यथा, एखादं सुंदर ठिकाण बघताना आपल्या मोबाइलचा कॅमेरा बाहेर काढायलाही विसरलो असं आपल्याबाबत किती वेळा होतं? असं होतं तेव्हा त्या क्षणी आपण तिथल्या दृश्यामध्ये विरघळून गेलेलो असतो. किमान तशी शक्यता तयार झालेली असते. तेव्हाचा आनंद कसा असतो ते आठवा. पण तसे क्षण फार कमी वेळा येतात. उलट, आपलं लोकेशन ओळखून तिथले फोटो सोशल मीडियावर टाका, असं सांगत आपल्याला उचकवण्यास आपला स्मार्टफोन उत्सुकच असतो. काही संशोधकांचं असं म्हणणं आहे, की ज्या फ्रेम्स आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करतो त्या आपल्या मनातून पुसल्या जातात. एका मर्यादित अर्थाने याचा अनुभव आपण सगळ्यांनीच कधी ना कधी घेतलेला आहे. म्हणूनच थोडी अतिशयोक्ती करायची तर पर्यटनाचा अनुभव आपण घेत नसून आपला फोनच घेतो आहे की काय अशीही शंका येते.
थोडक्यात, आपण त्याच जगात, त्याच क्षणात असताना आपल्या स्मार्टफोनद्वारे एका वेगळ्या प्रतलाची निर्मिती करून त्या आभासी प्रतलात जगू लागलो आहेत की काय? अर्थात, कोणी म्हणेल, हे सारं झूठ आहे. उलट, स्मार्टफोनमुळे प्रत्येक क्षण आम्ही कैद करू शकतो आहोत. पूर्वीपेक्षा अधिक रसरसून जगत आहोत.
ज्याची त्याची दृष्टी!
(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
