आम्ही कोण?
ले 

नवेगाव बांधच्या डोंगरवार पाटलांची गोष्ट

  • रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • 03.11.25
  • वाचनवेळ 7 मि.
ravindra r p

ही गोष्ट आहे नवेगाव बांध इथल्या डोंगरवार पाटलांची. त्यांच्या अनेक पिढ्यांची, त्यांच्या परिसराची. त्यांना प्राणाहून अधिक प्रिय असणाऱ्या जंगलाची आणि त्यात वसणाऱ्या आदिवासींची. आपला इतिहास, सांस्कृतिक संचित आणि आजची गाव-जंगलांची परिस्थिती यांची डोंगरवार पाटलांच्या नजरेतून सांगितलेली ही गोष्ट आहे. पण त्याआधी हे डोंगरवार पाटील कोण हे सांगायला हवं.

त्यासाठी आपल्याला बरंच मागे, म्हणजे सोळाव्या शतकात जावं लागेल. राणी दुर्गावती हे भारताच्या इतिहासातील एक अभिमानास्पद पात्र. राजस्थानची ही राणी अतिशय शूर होती. तिला शिकारीची आवड होती. तिच्या कानावर गोंडवनातील (आजचा विदर्भ) गोंड राजा दलपत शाहच्या शौर्याची व शस्त्रकलेतील नैपुण्याची कीर्ती गेली. वेश बदलून ती त्याच्या राज्यात गेली आणि तिने त्याला जंगलात शिकार करताना पाहिलं. ती त्याच्या प्रेमात पडली. तिने त्याला सांगितलं, की ‘तू मला (तत्कालीन प्रथेप्रमाणे) पळवून ने, म्हणजे आपल्याला लग्न करता येईल'. त्याप्रमाणे त्यांचं लग्न झालं आणि ती गोंडवनात राहायला आली. (यातील काही भाग दंतकथेचा असेल, पण ती गोंड राजाची राणी झाली हा इतिहास आहे.)

राणी राज्यकारभारात लक्ष घालू लागली. तिच्या ध्यानात आलं, की हा सारा प्रदेश अतिशय दरिद्री आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला पारावार नाही, कारण तिथे सिंचनाची काहीच व्यवस्था नाही. तेव्हा तिने कोहळी जातीच्या काही कुटुंबांना राजस्थानातून बोलवून घेतलं. ही कुटुंबं तलाव बांधणं, त्यांची देखभाल करणं या कलेत पारंगत होती. राजस्थानसारख्या कमी वृष्टीच्या प्रदेशात त्यांनी पावसाच्या पाण्याचा एकेक थेंब वाचवून साठवणाऱ्या कित्येक सिंचनव्यवस्था उभ्या केल्या होत्या आणि त्या पिढ्या न्‌‍ पिढ्या सांभाळल्या होत्या. त्यात अरुंद विहिरी, मोठाल्या पायविहिरी, विविध आकारांचे तलाव यांचा समावेश होता. (अनुपम मिश्र यांनी या विषयावर दोन अत्यंत बहारदार ग्रंथ लिहिले आहेत : ‘आज भी खरे हैं तालाब' आणि ‘राजस्थान की रजत बूंदें'. सामूहिक शहाणीव काय असते हे समजून घेण्यासाठी किंवा निव्वळ त्यांतील भाषावैभवासाठी जिज्ञासूंनी ती नक्की वाचावीत.

कोहळी ही मुळातली भटकी जमात. तलाव बांधणं, त्याचा मोबदला घेणं आणि दुसऱ्या गावी जाणं, ही त्यांची जीवनशैली होती. मात्र, या कुटुंबांना राणी दुर्गावतीने (आजच्या) भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वसवलं. त्यांना जमिनी दिल्या आणि तेथील तलावांच्या देखभालीचे अधिकार दिले. ते ज्या भागात वसले तिथे त्यांनी असंख्य तलाव बांधले. त्यांनी शेकडो वर्षं त्यांची डागडुजी आणि देखरेख केली. तिथल्या पाण्याचा विनियोग त्यांनी घालून दिलेल्या नियमांनुसार होत असे. नंतरच्या काळातील राज्यकर्त्यांनी त्यांना मालगुजारीचे अधिकार बहाल केले. त्यानुसार त्यांना काही गावांत सरकारच्या वतीने सारा जमा करण्याचे आणि बांधलेल्या तलावातील पाण्यावरचे अधिकार प्राप्त झाले. इंग्रजांच्या काळात एकट्या भंडारा जिल्ह्यात ३६ हजार तलाव असल्याची नोंद आहे. त्यांतील काही आजही अस्तित्वात आहेत.

स्वातंत्र्यानंतर १९६१ साली कायद्याने मालगुजारी संपुष्टात आली. या तलावांना आजही माजी मालगुजारी (मा. मा.) तलाव म्हणून ओळखलं जातं. विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत हा भाग सिंचनाच्या दृष्टीने अतिशय पुढारलेला, शेतीच्या दृष्टीने समृद्ध आहे. धानाचं (भाताचं) कोठार म्हणून तो ओळखला जातो. या साऱ्याचं श्रेय या मा. मा. तलावांना आणि ते उभं करणाऱ्या, सांभाळणाऱ्या कोहळी समाजाला जातं. त्यांना या परिसरात आता कोहळी पाटील नावाने ओळखलं जातं. कोहळी समाज गेली चार-पाचशे वर्षं या परिसरात राहत असून, इथल्या समाजात पूर्ण मिसळून गेला आहे. त्यांची घरं-वाडे आता गाव-वस्तीचा भाग आहेत. त्यांच्या तुरळक स्वतंत्र वस्त्या ‘कोहळी टोला' नावाने अजूनही अस्तित्वात आहेत. नागपूर-रायपूर महामार्गावरून नवेगाव बांधला जाण्याच्या रस्त्यावर अशी वस्ती अजूनही आहे.

नवेगाव बांध हा प्रचंड मोठा तलाव बांधणाऱ्या कोहळी पाटलांच्या वंशजांपैकी एक शाखा आता गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातल्या धाबे-पवनी या गावात स्थिरावली आहे. त्यांच्यापैकी श्रीनारायण डोंगरवार (वय वर्षं ७५), त्यांचे सुपुत्र भीमसेन डोंगरवार (वय वर्षं ५०), नातू भारद्वाज डोंगरवार (वय वर्षं २०) यांच्याशी त्यांच्या घरी गाठ पडली. डोंगरवारांच्या रसिकतेची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी त्यांच्या घरात आहेत- ऑर्गन, पेटी, जुनी नाटकांची पुस्तकं, नाट्यगीतं व शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड्स, फोटो, पेंटिंग, अलमेलकरांचं पुस्तक इ. इ., पण तिची पहिली झलक मला त्यांच्या नावावरून मिळाली. भीमसेन नाव अर्थातच भीमसेन जोशींवरून ठेवलं आहे आणि भारद्वाज कोणा ऋषीवरून नव्हे, तर पक्ष्यावरून ठेवलं असल्याचं त्यानेच मला सांगितलं.

डोंगरवार पाटलांनी आपल्या आधीच्या पिढ्यांचा इतिहास खूप चांगल्या रीतीने जतन केला आहे. या भागात आलेले त्यांचे पहिले पूर्वज बीजा पाटील. त्यांची दोन मुलं कोळू आणि चिमणा. या दोघांनी, म्हणजे श्रीनारायण पाटलांच्या बाराव्या पूर्वजाने नवेगाव बांध हे मातीचं धरण बांधलं. ते बांधण्यास त्या काळी ६५ हजार रुपये इतका खर्च आला, असा सन १९०८च्या राजपत्रात (गव्हर्नमेंट गॅझेट) उल्लेख आहे. हे धरण अशा रीतीने बांधलं आहे, की २ हजार फुटांहून थोडी अधिक लांबीची भिंत बांधून असलेल्या तलावाची एकूण क्षमता जवळजवळ ४६ हजार किमी३ एवढी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या किती तरी गावांच्या शेतीची सोय झाली आहे.

या तलावाखाली बुडालेल्या बारा गावांचं पुनर्वसन कोहळी पाटलांनी केलं. तलावाच्या पाण्यावर पहिला हक्क या गावांचा होता. ही परंपरा अनेक पिढ्या चालत होती. फक्त तलाव बांधून जबाबदारी संपत नाही, त्याची नियमित देखभाल करावी लागते, पाण्याचा वापर कोणी, केव्हा व कसा करायचा, कसा करायचा नाही, याचे नियम ठरवावे लागतात आणि लोकांनी ते पाळावे लागतात. पूर्वी गावरचनेत ते सर्व पाळलं जात असे. तलावाच्या बाजूच्या गावांना कोहळी पाटलांनी कडक इशारा देऊन ठेवला होता, की तलावाच्या पाणलोट क्षेत्रात (कॅचमेंट एरिया) कोणीही नुकसान करायचं नाही, गुरं चारायची नाहीत किंवा मल-मूत्र विसर्जन करायचं नाही, जेणेकरून तलावातील पाणी दूषित होणार नाही. पाणी शुद्ध राहण्यासाठी त्यात कासवं सोडली जात. त्याशिवाय बाऊ नावाचा मासाही त्यात सोडला जाई. तलाव पूर्ण झाल्यावर केलेल्या धार्मिक समारंभात त्या माशाला सोन्याचे अलंकार घालून पाण्यात सोडल्याचं श्रीनारायण डोंगरवारांनी सांगितलं. त्याबरोबरच तलावात सात नद्यांचं पाणी आणून टाकलं होतं. त्यांच्या रूपाने सात आसरा (जलदेवता) तलावाचं रक्षण करतात, असा समज होता. कोलू पाटलांना सात मुली होत्या, मुलगा नव्हता. बांधातल्या सर्वांत मोठ्या, तीनशे मीटर लांबीच्या पाराच्या (भिंत) निर्मितीत या बहिणींनी सहभाग घेतला होता, म्हणून तिला ‘सात बहिणींची पार' म्हणून ओळखलं जातं.

इतकं ज्ञान आलं कसं?

जमिनीची उंचसखलता मापण्याची कोणतीही आधुनिक साधनं अस्तित्वात नसताना एवढा अवाढव्य बांध बांधून त्याच्या पाण्याचं नियोजन कसं केलं असेल याचा विचार केला, तर त्या काळी प्रचलित असलेल्या लोकविद्यांचं आणि त्यावर आधारित अभियांत्रिकीचं महत्त्व आपल्या ध्यानात येतं. लोकविद्येत भवतालाचा साकल्याने, समग्रतेने विचार करण्यात येतो. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानात असणाऱ्या ज्ञानशाखांचे हवाबंद कप्पे त्यात नसतात.

नवेगाव बांध बांधतानाही त्या भागातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, पाण्याच्या प्रवाहांची दिशा व वेग, याबरोबरच पाण्यातील माशांच्या जीवनचक्राचाही विचार केला गेला होता. तलाव काठोकाठ भरल्यावर त्यातील पाणी ओसंडून वाहतं, त्या वेळी मासे आणि अन्य जलचर तलावातून वेगाने खाली पडून मरू शकतात. तर काही मासे उलट प्रवास करून तलावात येऊन अंडी घालतात व त्यातून जन्मणारे मासे प्रवाहाबरोबर तलावातून बाहेर पडून नदीत प्रवेश करतात. माशांचा हा दुतर्फा प्रवास सुकर व्हावा, त्यात त्यांची जीवितहानी होऊ नये, म्हणून कोहळी पाटलांनी तलावापासून २००-३०० मीटरपर्यंतचा कालवा तलावाला समतल बांधला. त्यामुळे नदीमधून तलावात स्थलांतरित होणारे ईल मासे, महाशीर मासे (जे आता भारतातून लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत) आणि तलावात येऊन अंडी घालणाऱ्या माशांची पैदास मोठ्या संख्येने होत असे.

कोहळी समाजाने तलावातून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचं नियोजन दोन स्तरांत केलं होतं. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस संपल्यानंतर ते धरणाचे दरवाजे बंद करत. त्यानंतर पडणाऱ्या पावसाचं पाणी धरणात साठून राहत असे. शिवाय, तोवर पाणी वाहत राहिल्यामुळे पुराचाही धोका नसे. मात्र, स्वातंत्र्यानंतर अभियंत्यांनी धरणाचे सांडवे जोडून ते पाणी धबधब्याप्रमाणे एका उंच भिंतीवरून खाली सोडलं. त्यामुळे तलावातून खाली पडणारे मासे मरू लागले. तसंच उलट प्रवास करून तलावात अंडी टाकण्याचा माशांचा मार्गही बंद झाला. त्याचा माशांच्या पैदाशीवर नक्कीच परिणाम झाला आहे. आता धरणातील पाण्याची पातळी सांडव्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पाणी ओसंडत नाही आणि नंतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊन मानवनिर्मित पूरस्थिती निर्माण होते.

नवेगाव बांधनंतरच्या दोनेकशे वर्षांत कोहळी पाटलांनी या परिसरात हजारो तलाव बांधले. कोहळी तिथे तलाव-तलाव तिथे कोहळी, असं समीकरणच होतं. ते तलाव गाळाने भरले नाहीत, की त्यांच्या भिंती फुटल्या नाहीत. कारण निजाम असोत की भोसले, कोणीही या व्यवस्थेत बदल केले नाहीत. ब्रिटिशांनीही या तलावांचं महत्त्व जाणून आधीची व्यवस्था कायम ठेवली.

(संपूर्ण लेख वाचा, यंदाच्या अनुभव मासिकाच्या दिवाळी अंकात..)

अंक पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध आहे-

१. इंस्टामोजो

२. बुकगंगा

३. ॲमेझॉन

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ | ravindrarp@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results