आपल्याला भूक लागते, तेव्हा ती शमवण्यासाठी आपण गावात काम मिळालं नाही तर शहरात जाऊन काम शोधतो, पैसे मिळवतो आणि पोटाची खळगी भरतो. बिबट्याचं तसंच आहे. त्याचं घरच सुरक्षित राहिलं नाही तर तो भक्ष्य शोधायला दुसरीकडे जाणारच. माणसाला भूक असते, मग ती बिबट्यांना नसते? आपल्या पारंपरिक अधिवासात शिकार न मिळाल्यास त्याला जंगल सोडून मानवी वस्तीत जावं लागतंय. पोट भरलेला बिबट कधीही हल्ला करत नाही. पोट तुडुंब भरूनही दुसऱ्यांना त्रस्त करणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे.
बिबट मानवी वस्तीत दिसू लागले, तसं त्यांची संख्या वाढते आहे, अशी चर्चा सुरू झाली. हे म्हणजे कुठलाही अभ्यास न करता निष्कर्ष काढून मोकळं झाल्यासारखं वाटतं. बिबट हे आपला अधिवास सोडून मानवी वस्त्यांमध्ये का घुसताहेत, थोड्याफार शिल्लक राहिलेल्या जंगलांमध्ये नेमकं काय घडतंय? बिबट-मानव संघर्ष या विषयावर जे काही उपाय सुचवले जाताहेत, त्यातले बरेचसे म्हणजे रोग न ओळखता उपचार केल्यासारखे आहेत.
परदेशी वनस्पतींचे दुष्परिणामः
नाशिक येथील गिरीपुष्पाने भरलेल्या, पशु-पक्षी न फिरकणाऱ्या निर्जीव शुष्क फाशीच्या डोंगरावर देशी झाडं, झुडुपं, वेलींची लागवड करून, अपार मेहनत सातत्याने करून गेली वीस वर्षांत बहरलेली ‘देवराई’ उभी केली. देशी लता-तरू बहरल्यावर जंगलाचे मूळ रहिवासी कीटक, अळ्या, दुर्मीळ पक्षी, प्राणी तिथं परतले. नैसर्गिक पाईपलाईन्स असलेल्या वड, पिंपळ वा अन्य देशी वृक्षांची लागवड केल्यानं कितीही पाऊस पडला तरी ही झाडं जमिनीत पाणी मुरवतात आणि त्यामुळं तिथली जमीन दलदलीची राहत नाही, हेही अनुभवास आलं. यावर्षी नाशिकमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाळा सुरू झाला, तो आता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत आहे. वन परिसरात आणि इतरत्र फोफावलेल्या परदेशी झाडांमुळे जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. निलगिरीसारख्या तेल सोडणाऱ्या वृक्षांमुळं जमीन सतत ओलसर, दलदलीची राहते. बिबट्यांना सततचा ओलावा सहन होत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होते. त्यांना विश्रांती घ्यायला कोरडी आणि मोकळी जागा लागते. बिबटच्या अनेक अधिवासांत निलगिरी, गिरीपुष्पसारख्या झाडांमुळे त्यांनी तिथून दूर जाणं पसंत केलं. आधीच पोटाला पुरेसं अन्न मिळत नाही, त्यात हवामानाचाही समतोल ढळलेला. त्याचा परिणाम बिबटच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्यावर होतोय.
त्यातच राखीव वनांमध्ये गिरीपुष्पसारखी झाडे, गुलतुरा(घाणेरी), रानमारी, कॉसमॉस, रानतुळससारखे झुडुप, भोंवरी(Ipomoea tribolia) सारख्या उपद्रवी पावसाळी वेली, वेडी बाभूळ यांसारख्या वनस्पतींचं प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे रानससे, मुंगूस, उदमांजर, घोरपड यांच्यासारखे बिबट्यांचे अन्न असलेले प्राणी तिथं राहू शकत नाहीत. घाणेरीसारख्या काटेरी, रानमारी, रानतुळससारख्या दाट वाढणाऱ्या अतिक्रमित उपद्रवी झुडुप, वेलींमुळे त्यांना शिकार शोधण्यास व शिकार दिसल्यास ती करण्यास अडचणी येतात. त्यामुळं या वनस्पतींचा नायनाट करून देशी झाडं, वेलींची लागवड राखीव जंगलांमध्ये केली पाहिजे. तेच आम्ही वनराईमध्ये केलंय.
कॉरिडॉरवर अतिक्रमणः
तिसरं कारण म्हणजे बिबटच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप वाढलाय. पुणे, नाशिकसारख्या जिल्ह्यांतील जंगलं प्रचंड प्रमाणावर लाकूडतोड झाल्यामुळे विरळ होताहेत. बिबटचे कॉरिडोर म्हणजे येण्या-जाण्याचे ठरावीक मार्ग. त्यात अडथळे आल्यास त्यांना मार्ग बदलून मानवी वस्तीत शिरावं लागतंय किंवा त्यांचे मार्ग मानवी वस्तीचा भाग झालेत. नाशिकचं उदाहरण द्यायचं तर त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गात बांधकामं, प्लॉट पडणं, माणसाचा वावर या गोष्टी वाढल्यामुळं त्याला त्याच्या अन्न व अधिवासाच्या दृष्टीने त्रास होतोय. तो त्या भागात म्हणजे कॉरिडॉरमध्ये आला तर आपण, ‘बिबट्या मनुष्य वस्तीत आला,’ असं म्हणतो. पण खरं तर त्याचंच घर आपण बळकावलंय. प्रतिकूल परिस्थितीत, भुकेने व्याकुळ झालेल्या बिबटसारख्या वन्य जिवांना मानवी वस्ती हे शिकार सहज मिळण्याचं ठिकाण दिसतंय. तसंच मानवी हस्तक्षेपामुळे पाच किलोमीटर परिसरातले तीन-चार बिबटे अडीचशे किलोमीटरमध्ये असतील आणि त्यातला एखादा दादागिरी करणारा असेल तर त्याला घाबरून तिथून इतर बिबट बाहेर पडतात.
निफाडसारख्या ठिकाणी ऊस काढणी मजुरांना तीन बिबट पिल्लं सापडली. कोणत्याही प्राण्याची आई कोणी आपल्या पिल्लाजवळ गेल्यावर अंगावर येतेच, तसंच त्यांच्या आईचं झालं. आता वनं घनदाट राहिली नाहीत, मादी बिबट शिकारीला जाताना आपल्या पिल्लांना सुरक्षित वाटणाऱ्या जागी ठेवते. तिथं कोणी त्यांच्याजवळ गेल्यावर ती अंगावर येणारच. बिबट जर माणसावर उगाचच हल्ले करत असता तर मानवी वस्ती वाढून शहरं सुजली नसती.
नाशिक देवराईच्या परिसरात बिबटचा आधी कॉरिडोर होता. मोकळं रान होतं. माणूस ये-जा करत नव्हता. आता तिथं प्लॉट पडलेत, औद्योगिक क्षेत्र झालंय. त्यामुळं तो आता आजूबाजूच्या परिसरात दिसतोय. देवराई हे वन्य प्राण्यांचं घर असल्यानं गेल्या पाच वर्षांपासून बिबट इथं अधूनमधून वास्तव्यास येतो. कधी एकटा तर कधी जोडीने पिल्लासह वावरत असतो. कधीही त्याने त्रास दिला नाही. साठ-सत्तर फुटांवर गवतात असलेल्या बिबट्याने ‘मी इथे उपस्थित आहे, जास्त जवळ येऊ नका’, असे गुरगुर करून सांगत आम्हाला ताकीद दिली आहे. त्यावेळी आम्ही त्यापासून दूर जाऊन आमचे काम करतो. बिबट हा मानवी शिकार करणारा वन्यजीव असता तर त्यानं आमच्यावरही हल्ला केला असता. देवराईत त्याला त्याचं भक्ष्य मिळतं, त्यामुळं तो माणसावर हल्ला करत नाही.
बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी काही उपाययोजना केवळ सरकारवर अवलंबून न राहता आपण केल्या पाहिजेत. त्यांच्या अधिवासातील घाणेरी, रानमारी, कॉसमॉस, रानतुळस इत्यादी व उपद्रवी पावळी वेलीसारख्या वनस्पतींचं उच्चाटन करावं लागेल. प्रत्येक जिल्ह्यात वनराई, देवराया तयार करून वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित केला पाहिजे म्हणजे तिथेच राहणं ते पसंत करतील. त्यांचे निश्चित कॉरिडॉर अधोरेखित करून तिथं मानवी हस्तक्षेप होऊ देता कामा नये. देशी वृक्षांचे वृक्षारोपण करत असताना परदेशी घातक वनस्पतींचा नायनाट करून हे आधिवास वन्य जिवांसाठी शाबूत ठेवायला हवेत.
शेखर गायकवाड
आपलं पर्यावरण संस्था, नाशिक.
