अगदी परवा घडलेला प्रसंग सांगते. माझी मुलाखत चालू असताना समोरच्या पत्रकार मुलीने मला एक क्लिप दाखवली. बासू चटर्जींनी दिग्दर्शित केलेली जवळजवळ तीसेक वर्षांपूर्वीची ‘व्योमकेश बक्षी' या मालिकेतली ती क्लिप होती. त्यातल्या एका भागात मी होते. एकूण मालिकेतला तो लहान भाग असला तरी महत्त्वाचा होता. मी त्यात बंगाली साडी नेसले होते. फारसा मेकअप नव्हता. तो भाग मला दाखवून त्या मुलीने त्याविषयी एक प्रश्न विचारला. प्रश्न तर चांगला होताच पण इतकी जुनी मालिका तिच्या लक्षात असल्याचं पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. गंमत म्हणजे तिला ती मालिका आठवत होती इतकंच नव्हे तर त्याविषयी प्रश्नही विचारावासा वाटत होता.
मी नकळतच भूतकाळात गेले. तो सगळा काळ डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहिला. तो एक एपिसोड आम्ही तीन दिवस शांतपणे शूट केला होता. तो पुन्हा एकदा बघताना मला शांतपणे काम करणं म्हणजे काय हे जाणवलं. मग लक्षात आलं की यालाच ठेहराव म्हणतात. तीन दिवस एक एपिसोड शूट करणं कुठे, आणि आता एका दिवसात तीन एपिसोड्स शूट करणं कुठे. एका दिवसात अनेक एपिसोड्स केले तरी त्याचा काही प्रभाव राहतो का? फक्त हिने कोणती साडी नेसली, कोणत्या अतर्क्य घटना घडल्या याच्याव्यतिरिक्त आपल्याला काही आठवतं का? तर नाही. याचा अर्थ वेळ घेऊन केलेली गोष्टच दीर्घकाळ लक्षात राहते. आता मुख्य कलाकारांनाच मालिकांचं पुरेसं कथानक आधी माहिती नसतं. रोज सेटवर जायचं आणि समोर येतील ते संवाद म्हणायचे एवढं हाती उरतं. बाकी काही असो किंवा नसो, फक्त वेग मात्र अफाट असतो. हे कशामुळे होत असेल? काय चुकतंय नेमकं? आपण काही हरवत आहोत का? मी स्वत:लाच प्रश्न विचारत होते. विचार करता करता माझं मन आणखी मागे गेलं... माझ्या बालपणीच्या रम्य आठवणीत, तेव्हाच्या औरंगाबादेत..
माझ्या लहानपणी टीव्ही, मोबाइल काही नव्हतंच. त्यामुळे अभ्यास, खेळ आणि वाचन या तीनच गोष्टी होत्या. आई शिक्षिका आणि वडील डॉक्टर. त्यांनी आम्हा दोघी बहिणींच्या मनावर वाचनाचं महत्त्व बिंबवलं. औरंगाबादच्या माझ्या शारदा मंदिर शाळेत मराठीच्या मॅडम होत्या. शाळेत टिळक पुण्यतिथी किंवा इतर प्रसंगी वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा निबंध स्पर्धा असेल तर त्या सांगायच्या, टिळकांचा शेंगांचा किस्सा वगैरे नेहमीचे प्रसंग सोडून तुम्ही बोला. त्यामुळे मग ग्रंथालयात जा, पुस्तकं वाचा, मग कुठला किस्सा कोणी आधी सांगितलाय किंवा पेपरात आलाय ते शोधा, असं आम्ही करायचो. तोवर जे बोललं, लिहिलं गेलंय त्यापेक्षा वेगळं मिळवायचो. त्यासाठी वेगवेगळी पुस्तकं वाचायचो. शिवाय आमच्या शाळेत आयत्या वेळच्या वक्तृत्व स्पर्धा असायच्या.
मग एक विषय द्यायचे, त्यावर तीन मिनिटं विचार करायचा आणि बोलायचं. असं करायला आपल्याकडे संदर्भ असतील तर बोलता येतं. त्यासाठी वर्तमानपत्रं वाचायला हवीत, पुस्तकं वाचायला हवीत हे लक्षात येत गेलं. शिवाय घरी किशोर आणि चांदोबा हे दोन अंक नियमित यायचे. साने गुरुजींच्या गोष्टींसारखी अनेक पुस्तकं असायची. दिवाळीचा फराळ खाताना हातात दिवाळी अंक असणं हे सुख वाटायचं. अत्यंत आनंददायी अनुभव असायचा तो. एखाद्या वाचत्या घरात आपलं बालपण जाण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडचा असतो, असं आज मागे वळून पाहताना जाणवतं.
नववी-दहावीनंतर मी ‘जिगीषा'च्या ग्रुपमध्ये जायला लागले आणि मग माझ्या वाचनाला दिशा मिळाली. ‘जिगीषा'मध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर पुस्तकांच्या चर्चा व्हायला लागल्या. आम्ही तेव्हा औरंगाबादमध्ये ‘स्त्री' नावाची एकांकिका केली होती. त्याच वेळी मुंबईत ‘मुलगी झाली हो'चे प्रयोग होत होते. म्हणजे गावं वेगवेगळी असली तरी आमची एकांकिका आणि हे प्रयोग यामागची संवेदना एकच होती. तर मग असं वाटलं की याबद्दल आपण जास्त वाचायला पाहिजे, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे.
त्या भावनेतून बरंच वाचलं. रझिया पटेलचं ‘चाहूल' वाचलं. मग मल्लिका अमर शेखचं ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय' वाचलं. अमृता प्रीतमचं ‘रसीदी तिकीट' वाचलं. शांता शेळकेंनी अनुवादित केलेलं ‘चौघीजणी' वाचताना त्यात रममाण व्हायला व्हायचं. मग गौरी देशपांडे वाचायला सुरुवात केली. गौरी देशपांडेचं लिखाण खूप आधुनिक वाटलं. नातेसंबंधांकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन वेगळा होता. गौरी देशपांडेने अगदी माझ्या हृदयात जागा निर्माण केली. प्रवासात पण मी सतत तिची पुस्तकं बरोबर ठेवायचे. त्या त्या वयात जे आवडतं ते वाचलं गेलं. मग आमच्या ग्रुपमध्ये चर्चा व्हायला लागल्या. तू हे वाचलंस का, अमुक आवर्जून वाच, वगैरे. राधाकृष्ण मुळी या मित्राने मला बा. भ. बोरकरांचं ‘रसयात्रा' हे कवितांचं पुस्तक वाचण्यासाठी सुचवलं. असं ते होत गेलं.
त्यातून बाहेरचं जग, माणसं यांची हळूहळू ओळख व्हायला लागली. यातून प्रोत्साहन तर मिळायचंच; शिवाय कोणी कोणी काय काय करून ठेवलंय, आपण या पद्धतीचं काही तरी केलं तर मजा येईल, असंही वाटायचं. मग त्या पद्धतीचं आणखी वाचावंसं वाटायला लागलं. वाचन आपल्याबरोबर राहतं, आनंद द्विगुणित करतं, दु:खावर फुंकर घालतं, असं जाणवायला लागलं. मग भारत सासणे वाचायला लागले. अनिल अवचटांचं ‘कार्यरत' मला अतिशय आवडलं. त्यांच्या नवीन लिखाणाची मी वाट बघायचे. महात्मा गांधींच्या ‘सत्याचे प्रयोग'सारखी पुस्तकं कधीही काढून वाचली तरी छान वाटतात. विजय तेंडुलकरांची नाटकं आवडायचीच, पण त्यांचं ललित आणि वैचारिक लेखनही मी आवर्जून वाचायचे. वेगवेगळ्या वयांत वेगवेगळे लेखक आवडत गेले. मग अनेक चरित्रं-आत्मचरित्रं वाचली. ‘फ्रीडम ॲट मिडनाइट' या फाळणीवरच्या पुस्तकाने मला खूपच अस्वस्थ केलं.
एकेका लेखकाने भारावून जाण्याचा तो काळ होता. एका काळात मला आशा बगे खूप आवडायच्या. त्यांच्या कथांमधली वातावरणनिर्मिती, त्यांनी साकारलेला कॅनव्हास... एकदा मला आठवतंय- मी त्यांचं साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेलं पुस्तक ‘भूमी' वाचत होते. त्यात थिरूअनंतपुरमचं वर्णन आहे. त्या वेळी मी तिथेच शूटिंग करत होते, अशी माझी त्याबद्दलची छान आठवण आहे. असा या वाचनातून आनंद मिळत गेला. आपल्या भावना पुस्तकातूनही व्यक्त झालेल्या दिसायच्या. पुस्तकं मित्र असतात हे जाणवायचं.
अशीच आणखी एक आठवण. शफी इनामदार गेले तेव्हा भक्ती बर्वे-इनामदार प्रशांतला (दळवी) भेटल्या होत्या. प्रशांतला त्या म्हणाल्या, “या दु:खातून मला बाहेर यायचंय, तर त्यासाठी काही पुस्तकं मला सांगाल का? मरण या विषयाबाबत मला जास्त समजून घ्यायचंय.” प्रशांतने काही पुस्तकं सुचवली. ती त्यांनी वाचली. मरण कसं अपरिहार्य आहे, त्याचं महत्त्व व वैशिष्ट्य काय आहे, जवळच्या माणसाच्या जाण्याचं दु:ख आपण कसं स्वीकारायचं... ही मॅच्युरिटी, ही प्रगल्भता वाचनातूनच येते. म्हणजे पुस्तकांचं महत्त्व किती आहे बघा.
आपल्याला आता वाटतं की पुस्तक नसलं तरी मोबाइल आहे, टीव्ही आहे; पण ते तुम्हाला विचार, प्रगल्भता देत नाहीत. वाचन, त्यात रेंगाळणं, त्या रेंगाळण्यातून तुम्हाला काही तरी मिळणं हे हरवलंय. इथे टीव्हीवर दर सेकंदाला १०० फ्रेम्स धडधड जातायत, तुम्हाला त्यात विचार करायला वेळ कुठे मिळतो? तुम्ही घेत असलेला एक अनुभव आत झिरपायला वेळच मिळत नाही.
मी परफॉर्मर असल्यामुळे असेल कदाचित, (आमच्या ग्रुपमध्ये आम्ही सगळेच तसे होतो) आपण वाचलेल्या पुस्तकाविषयी एकमेकांना सांगितल्याशिवाय ते पुस्तकवाचन पूर्ण झाल्यासारखं वाटायचं नाही. जसं नाटक ही कला प्रेक्षकांशिवाय पूर्ण होत नाही, अगदी त्याचप्रमाणे कोणत्याही पुस्तकाचं वाचन हे आस्वादक मित्र किंवा मैत्रिणीसोबत शेअर केल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याचा फायदा असा झाला, की ते वाचलेलं खूप काळ टिकून राहायचं. आपण नुसतंच वाचून पुढे गेलो तर ते ठसत नाही. विसरण्याची शक्यता खूप असते. ‘जिगीषा'सारखा वाचता ग्रुप मिळाल्यामुळे, वाचलेल्या पुस्तकावर उलटसुलट बोलणं झाल्यामुळे ते कायमस्वरूपी ठसत गेलं. प्रगल्भता वाढायला याची खूप मदत झाली.
हा सगळा माझ्या आयुष्यातला भूतकाळ आहे. हाच वर्तमान असता तर मला आवडलं असतं. कधी ते नक्की आठवत नाही, पण एका बेसावध वळणावर हे निसटायला सुरुवात झाली. सूर्यास्तानंतर हलके हलके प्रकाश लुप्त व्हावा तसा माझ्या जीवनातला वाचनाचा आनंद विरळ होत गेला.
मी टेलिव्हिजनसाठी कामं करायला लागले तसा कामाचा रेटा खूप वाढला. दामिनी ही माझी पहिली दैनंदिन मालिका आली. दररोज एक भाग प्रसारित करायचा म्हणजे जवळपास रोज चित्रीकरण करावं लागायचं. बरं, अभिनयाची आवड होती म्हणून मी औरंगाबादहून मुंबईला आले होते. अशी संधी मिळते तेव्हा ती सोडून चालतच नाही. पण त्यामुळे काम इतकं वाढलं की वाचन मागे पडायला सुरुवात झाली. खूप रुखरुख, खंत वाटायची. वेळ आपल्या हातात नसणं म्हणजे काय ते शब्दश: कळत होतं. त्यावर विचार करायच्या आधीच अनेक गोष्टी येऊन आदळायच्या. त्यामुळे दामिनी मालिका संपल्यावर मी थोडासा ब्रेक घेतला. मग त्या दरम्यान थोडंसं वाचन केलं.
हळूहळू एक गोष्ट जाणवायला लागली, की कामाच्या पद्धती बदलल्या आहेत. मी मोबाइलच्या आहारी अजिबातच गेलेली नाहीये. पण एखादं प्रोजेक्ट करत असताना त्याच्या प्रसिद्धीसाठी इव्हेंट, फेसबुक लाइव्ह करायला लागणं, मग लगेच समाजमाध्यमांसाठी आणि वृत्तपत्र-मासिकांसाठी मुलाखती देणं, मग कॉश्च्युम ट्रायल्स.. या गोष्टी इतक्या वाढलेल्या आहेत की त्याच्यामुळे वाचनासाठी म्हणावा तितका वेळ देता येत नाही.
एकूणच, समाजमाध्यमं आणि या गोष्टींचं मला फारसं आकर्षण नसलं, तरी त्यांनी आता आपल्या आयुष्यात इतकं थैमान घातलंय, की आपल्या नकळत आपण त्यात ओढले जातो. मला नको असतानाही त्याला वेळ द्यावा लागतो. म्हणजे मालिका करताना आम्हाला सांगितलं जातं की रील बनवून द्या. एखाद्या वेळेला व्यवसायाचा भाग म्हणून ते करून बघावंसं वाटूही शकतं. मनुष्यस्वभाव आहे. काही तरी गंमत, वेडेपणा करावासा वाटतो. पण ही गोष्ट तुमच्या कामाचा इतका महत्त्वाचा भाग कशी होते याचं आश्चर्य वाटतं. पण कधी कधी नाइलाज असतो. आजूबाजूची माणसं ४०-५० वेळा ते करत असतील तर मला चार-पाच वेळा तरी ते करावं लागतं. पण परत परत तेच कसं करणार? त्यात कोणता आनंद मिळतो, मला कळत नाही. समाज म्हणून आपल्या आनंदाची जातकुळीसुद्धा आपल्याला तपासून बघायला हवी का? केवळ ट्रेंडिंग आहे म्हणून जे शंभर लोकांनी केलंय तेच तुम्ही एकशे एकाव्यांदा करून काय मिळवणार? अर्थात मला जे वाटतं आहे तसं आज अनेकांना वाटत असेल याची मला कल्पना आहे. पण प्रवाहाविरुद्ध बोलण्याच्या भानगडीत कशाला पडा म्हणून या विषयावर कोणी बोलत नसावं.
असं म्हणतात की आपल्या ब्रँडिंग आणि प्रसिद्धीसाठी ते वापरतात; पण मला मनापासून असं वाटतं, की याला खरंच काही अर्थ नाहीये. कारण खरंच असं रील बघून किंवा समाजमाध्यमांवरची प्रसिद्धी बघून कोणी सिनेमा बघायला जाईल असं मला वाटत नाही. त्यापेक्षा एखादा सिनेमा चांगला आहे असं कुणी सांगतं तेव्हाच तुम्ही तो सिनेमा बघता. म्हणजे शेवटी कोणी माणूस सांगतो आणि तुम्ही डोक्याने विचार करता तेव्हाच त्यावर विश्वास टाकता. समाजमाध्यमांवरच्या रीलला, पोस्टला लोकांनी ‘ब्युटिफुल', ‘ग्रेट' लिहिलं म्हणजे ते ‘ग्रेट' होतं किंवा असतं असं नाही. ‘ग्रेट' आणि ‘ऑसम' या शब्दांना आता अर्थ राहिलेले नाहीत. तुम्ही आभासी जगात वावरायला लागता, तेच तुम्हाला खरं वाटायला लागतं. हे खरं वाटायला लावण्यात इतरही गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत. त्या अर्थाने या समाजमाध्यमांनी आपल्याला सवंग बनवलंय असं वाटतं. आता नवीन आलेल्या कलावंतांना जेव्हा विचारतात ना, तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत, तेव्हा हसावं का रडावं कळत नाही. तुमचे फॉलोअर्स किती आहेत यावरून तुम्ही मोठे कसे ठरता? काम करण्याचा आणि फॉलोअर्स असण्याचा काय संबंध आहे? तुमच्या अभिनयाच्या दर्जाचा आणि याचा काय संबंध आहे? विचारांतून, आजूबाजूला सजगपणे बघण्यातून येणारी प्रगल्भता नसेल, तरच अशा इतर गोष्टी महत्वाच्या वाटायला लागतात. बुंदीचा लाडू करताना त्याची खुमारी वाढावी म्हणून त्यात काजू-बेदाणे जरूर घालतात. पण म्हणून फक्त काजू-बेदाण्यांचा लाडू करायचा नसतो. पण इतपतही तारतम्य समाजाला उरलेलं दिसत नाही.
पूर्वी मुलाखतीत आम्हाला एखाद्या भूमिकेसाठी तुम्ही कशी तयारी केलीत, काय अभ्यास केलात, तुमच्या भाषेवर, देहबोलीवर काम केलंत का, असे प्रश्न विचारले जायचे. पण आता असं काही दिसतं का? आता साडी कशी डिझाइन करून घेतली, प्रोस्थेटिक्स कसे वापरले, किंवा त्या चित्रीकरणाच्या वेळी सेटवर काय गंमत झाली ते विचारतात. म्हणजे जे पूरक म्हणून आहे तेच आता आकर्षणाचं मुख्य केंद्र बनलंय. अस्सल मनोरंजन ही माणसाची गरज असते. पण आता आपल्याला आपली गरज कोणती, चैन कोणती आणि चंगळ कोणती तेच कळत नाहीये. मला आठवतंय, लालन सारंग यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये एकदा लिहिलं होतं, ‘रथचक्रमधल्या भूमिकेचा मला त्रास व्हायला लागला, इतकं ते नाटक करताना मी भूमिकेशी समरस व्हायचे. कधी कधी रडणं थांबवता यायचं नाही.' खरं तर आपण आणि आपली भूमिका यांचा समतोल साधता यायला हवा असं मला वाटतं. पण अशी भूमिका जगणं, त्याचा आनंद घेणं, तो अनुभवणं आणि नंतर तो व्यक्त करता येणं हाच त्या कलेचा मुख्य भाग होता आणि असला पाहिजे.
कसं असतं, की तुमच्या मनात एक सूर तयार झालेला असतो. तो गाण्याचा असेल, नाटकाचा असेल, तुमच्या सादरीकरणाचा असेल, तुमच्या वाचनाचा असेल, तो सूर तुमच्या मनात रेंगाळत राहणं ही गरज असते. मानसशास्त्रही सांगतं, हा सूर रेंगाळत राहतो तेव्हा तो तुमच्या शरीरात खूप सूक्ष्म बदल करतो. तो छान परिणाम असतो. आता असं वाटतंय, की तो सूर हरवलाय आणि त्यामुळे तो ठेहराव हरवलाय. आपल्याला त्या सुरामध्ये रेंगाळताच येत नाही. मी गाणं ऐकताना गाणंच ऐकते असं नाही, आणखी काही तरी करते. आपण गाडी चालवताना फोनवर बोलत असतो. जेवण करताना टीव्ही बघत असतो. वेळेचं व्यवस्थापन म्हणून हे एखाद्या वेळी आवश्यकही असेल; पण जे ऐकतो आहोत त्याचा पूर्ण आस्वाद घेणं, ते मनात रेंगाळत ठेवणं, त्याची रुजवात करणं हे सगळं हरवत चाललंय. त्यामुळे त्या अनुभवाने माणूस म्हणून आपण समृद्ध होत जाणं हेही हरवतंय.
आताची पिढी हुशार आहे; पण थांबून अनुभवणं, विचार करणं, चिंतन करणं याचं महत्त्व कदाचित त्यांना लक्षात येतंच असं नाही. आपण चुकलो तरी तिथे रेंगाळणं, यश मिळालं तरी तिथे रेंगाळणं, हे आता उरलेलंच नाही. हा ठेहराव सगळीकडेच हरवलाय. अगदी नातेसंबंधातही. दोन माणसांमधला संवाद, समजुतदारपणा कमी होत चाललाय. ‘मला असं चालणार नाही', ‘मला हे पटत नाही', असं म्हणून लगेच तडकफडक बोलून तोडून टाकायचं. घटस्फोट, नात्यांची तोडमोड. थोडं समजून घेणं, मग अधिक समजून घेणं, आणखी अधिक समजून घेणं असं व्हायला हवं. या समजून घेण्यात आपली आपल्यालासुद्धा नव्याने ओळख होते. समोरच्याने आपला आपल्यालाच न समजलेला एखादा गुण सांगणं, दुसऱ्या माणसाला समजून घेताना आपल्यालाही आपला नव्याने शोध लागणं हे सगळं ठेहरावातूनच येऊ शकतं.
मी परवा माझ्या गाडीतून चालले होते. माझ्या मागे अतिशय वेगात एक गाडीवाला येत होता. माझ्या गाडीसमोर काही तरी कुत्रा, मांजर आलं म्हणून माझ्या ड्रायव्हरने स्पीड कमी केला, म्हणून त्या मागच्यालाही कमी करावा लागला. तर नंतर त्याने आमच्या गाडीसमोर त्याची गाडी आडवी घालून आम्हाला थांबवलं आणि गाडीतून उतरून काहीही न बोलता, विचारता माझ्या ड्रायव्हरच्या थोबाडीत मारली. काय झालंय हे समजून घ्यायची त्याची इच्छाही नव्हती. पेशन्स संपत चालल्याची अशी उदाहरणं पावलोपावली दिसतात.
पूर्वी प्रतिक्रियांसाठी वृत्तपत्रांतून किंवा वाहिन्यांकडून फोन यायचे तेव्हा ‘मी एक दहा मिनिटांनी बोलते' असं मी सांगायचे. आता तसं नाही. त्यांचं म्हणणं, आत्ताच सांगा. ती प्रतिक्रिया किती वरवर आहे याच्याशी त्यांना काहीच देणंघेणं नसतं. ती खोलवर असावी, अर्थपूर्ण असावी, त्यातून काही तरी धागा मिळावा, भावना पोचावी असं कोणाला का वाटत नाही? माणूस गेल्यावर किंवा एखाद्या घटनेवर व्यक्त व्हायचं असेल, तर त्यावर काही विचार व्हायला हवा की नको? तुम्ही विचार करून बोलणं आणि तत्क्षणी बोलणं यात काही फरक असेल का नाही?
इतकी घाई कशासाठी ते कळत नाही. अगदी ढोबळ उदाहरण द्यायचं तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तेव्हा त्या पडणाऱ्या सफरचंदाकडे तो बराच वेळ बघत, विचार करत राहिला म्हणूनच शोध लावू शकला. आजही जे शोध लागतात त्यासाठी शास्त्रज्ञांनी खूप वेळ दिलेला असतोच ना! वेळ देणं ही मानसिक गुंतवणूक आहे. आशयपूर्ण पुस्तकं वाचताना अशी मानसिक गुंतवणूक आपोआप होते. ‘समिधा' पुस्तकात साधनाताई आमटे सांगतात, की बाबा आमटे यांना पहिल्यांदा तो कुष्ठरोगी पाहिल्यावर मनात कशी किळस दाटून आली आणि मग त्यांनी कशी त्यावर मात केली आणि त्याची सेवा केली. तर हा अनुभव तुम्हाला वाचनातून मिळणार आहे. त्यातून आमटे परिवाराच्या कामाचं महत्त्व समजणार आहे.
बदल तर घडणार आहेतच, पण आपण त्यात सहभागी कसं व्हायचं, ते बदल कसे स्वीकारायचे हे आपणच ठरवायचं आहे. छापील पुस्तकं मागे पडली, किंडल आलं; पण ते वाचणं होतंय का? की शेवटी आपण यूट्युबवरच वेळ घालवतोय हे बघायला हवं. बदलांना सामोरं जाताना तुम्ही तुमचं स्वत्व, सत्त्व, चांगलेपण कसं टिकवून ठेवताय हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि ठेहराव ही त्याची गरज आहे. ठेहराव ही फॅशन नाहीये, गरज आहे.
काळाला नावं ठेवणं सोपं आहेच. पण आपण चांगलं होऊ शकतो. त्यासाठी अधिक प्रयत्न करू यात. सामूहिक पातळीवर तर जाऊद्या पण स्वत:पासून त्याची सुरुवात तरी करू शकतो. म्हणूनच याही परिस्थितीत वेळ काढत मी वाचते. कोविडच्या काळात मी अरुण खोपकरांचं ‘अनुनाद' वाचलं. ते पुस्तक वाचताना मला अरुण खोपकर यांचा लेखक म्हणून आवाका थक्क करून गेला. एकाच व्यक्तीला ध्वनी, प्रकाश, अवकाश यापासून ते चित्रीकरणाच्या तांत्रिक अंगांपर्यंत किती गोष्टींचं सखोल ज्ञान असू शकतं हे पाहून आश्चर्य वाटलं. त्याच काळामध्ये युवा नोवाल हरारी यांचं ‘होमोसेपियन्स' हे जगभर गाजलेलं पुस्तक वाचलं. शिवाय नांदेडच्या मनोज बोरगावकर यांचं गोदावरी नदीशी नातं सांगणारं ‘नदिष्ट' हे पुस्तकही झपाटल्यासारखं वाचून काढलं. अर्थात एरवी अगदी एकापाठोपाठ एक वाचलं जात नाही. प्रशांतचं मात्र वाचन चालू असतं आणि तो त्याबद्दल बोलतोही. मग त्याने दहा पुस्तकं वाचली असतील तर तो ‘ही दोन तरी तू वाचच' असं सांगतो, आणि मी ती वाचते. त्याची मलाही आतून गरज वाटते. कारण नाहीतर वाचनाच्या बाबतीत मागे पडल्याची खंत वाटायला लागते. आपल्याला खूप गोष्टी माहितीच नाहीयेत असं वाटतं.
मध्यंतरी स्टोरीटेल ॲपसाठी मी वाचन केलं, तर ती पुस्तकंही मी घरी आणून पुन्हा वाचली. मी जे वाचते ते माझ्या लेकीला, रुंजीला सांगते. तिने भरपूर वाचावं म्हणून आम्ही दोघंही प्रयत्नशील असतो. परिणामी, आता ती मराठी आणि इंग्रजी दोन्ही वाचते. घरातल्या वातावरणामुळे तिला वाचनाची गोडी लागली याचा आनंद आहे.
वाचनामुळे आपण सवंगतेकडून सुजाणतेकडे जातो. आर्थिक श्रीमंती तुम्हाला अनेक मार्गांनी मिळेल, पण वैचारिक समृद्धी तुमची तुम्हाला विचारपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक मिळवायला हवी. असा सगळा विचार करताना माझ्या मनात जीवनगाणं संपल्याचीच भावना येते. एक सूर मनात रेंगाळण्याअगोदरच दुसरं काही येऊन आदळतं, जे तुम्हाला त्या भावनेपासून, विचारापासून दूर नेतं, तुम्हाला समृद्ध होण्यापासून दूर नेतं. रेंगाळता आलं पाहिजे. अगदी दु:खातसुद्धा. आनंद, राग, लोभ, तशीच दु:ख ही पण एक भावना आहे. त्याचा निचरा करूनच तुम्ही पुढे जायला हवं. आपण त्यासाठी पुरेसा वेळ न देता तसंच पुढे पुढे जात राहतो, आणि मग एखाद्या कसोटीच्या प्रसंगी आपणही तोंडावर पडतो. समतोल साधू शकत नाही. वाचन वेगाने कमी होत आहे हे जरी खरं असलं तरी हाताच्या बोटांवर मोजता येतील असे काही कलावंत आहेत की जे त्यांचं काम सांभाळून नियमित आणि भरपूर वाचतात.
सरतेशेवटी मला इतकंच सांगायचं आहे की जीवन गाण्यातला ठेहराव हरवत चालला आहे. तो परत गवसायचा असेल तर वाचन-मनन-चिंतन याला पर्याय नाही.
(अनुभव, सप्टेंबर २०२३च्या अंकातून साभार)
