आम्ही कोण?
ले 

एका 'स्पेशल' चित्रपटाची गोष्ट

  • प्रसाद ओक
  • 14.08.25
  • वाचनवेळ 11 मि.
prasad oak

जन्माच्याही अलिकडे असतात आई-बाबा
हिशेबाच्या पलिकडे असतात आई-बाबा
सारं सारं फसतं तेव्हा असतात आई-बाबा
कोणी कोणी नसतं तेव्हा असतात आई-बाबा

मी दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू' या चित्रपटातल्या गीताच्या या ओळी आहेत. कवी संदीप खरे यांनी लिहिलेल्या ओळी मुलाच्या आणि आई-वडिलांच्या नात्याचा गाभा उलगडतात. या ओळी ऐकताना मी नकळतपणे हळवा होतो. ‘कच्चा लिंबू' या चित्रपटाला माझ्या आयुष्यात विशेष स्थान आहे. म्हणूनच आज मी ‘अनुभव'च्या वाचकांना चित्रपटाच्या अलीकडची आणि पलीकडची गोष्ट सांगणार आहे.

आपण एखादं स्वप्न पाहतो तेव्हा ते मोहक आणि रंगीत असतं. ‘कच्चा लिंबू' या चित्रपटाच्या निमित्ताने मी असंच एक इंद्रधनुषी स्वप्न पाहिलं होतं. एक तर मी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट असणार होता. माझे अत्यंत आवडते लेखक जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर तो आधारलेला होता. माझा जवळचा मित्र आणि लेखक चिन्मय मांडलेकर चित्रपटाचं लेखन करणार होता. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, रवी जाधव यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. मी दिग्दर्शक म्हणून भरपूर अभ्यास आणि मेहनत करून चित्रपट बनवला होता. एखादा चित्रपट प्रेक्षकांनी स्वीकारण्यासाठी जे जे लागतं ते सगळं या चित्रपटात होतं; पण प्रत्यक्षात विपरीत घडलं. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. मला दु:ख होणं स्वाभाविक होतं. पण केवळ तिकिटबारीवर चित्रपट अपयशी होण्यापुरतं ते दु:ख मर्यादित नव्हतं. मी खोलवर दुखावला गेलो होतो. म्हणून हा चित्रपट बनण्याची आणि पडण्याचीही कहाणी मी सांगणार आहे.

१९९६साली मी पुण्याहून मुंबईला आलो तो स्वतंत्रपणे दिग्दर्शन करावं हेच स्वप्न उराशी बाळगून. त्या वेळेला श्रीरंग गोडबोले एक नाटक दिग्दर्शित करणार होते. त्या नाटकासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला संधी दिली. सुरुवातीला काही नाटकं आणि चित्रपटांसाठी सहायक म्हणून काम करायचं आणि नंतर स्वतंत्र दिग्दर्शन करायचं असं माझ्या मनात अगदी पक्कं होतं. या नाटकाच्या महिना-दोन महिने तालमी झाल्या. नाटकात संजय मोने, अतुल परचुरे, आनंद इंगळे, सुकन्या कुलकर्णी, संजय नार्वेकरपासून भक्ती बर्वे-इनामदारांसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीपर्यंत अनेक कलावंत होते. पण ते नाटक काही कारणाने रंगभूमीवर गेलंच नाही. तालमींच्या दरम्यान एखादा कलावंत आला नाही तर बदली कलाकार म्हणून मी उभा राहत असे. त्यामुळे ही मंडळी माझा अभिनय पाहत होती. मी चांगला अभिनय करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यामुळे मला एकापाठोपाठ एक नाटकं मिळायला लागली. त्यानंतर टेलिव्हिजनवरच्या मालिकांमध्ये कामं मिळू लागली. मुंबईत मी एक ‘स्ट्रगलर' म्हणून आलो असल्याने मला कामांची गरज होतीच. त्यातून अभिनेता म्हणून माझी ओळख ठळक बनत गेली, पण दिग्दर्शनाचं जे स्वप्न घेऊन मी मुंबईत दाखल झालो होतो ते मात्र मागेच राहिलं.

दिग्दर्शक होण्याची हुकलेली संधी १३ वर्षांनी म्हणजे २००९ साली मला मिळाली. त्या वर्षी मी आणि पुष्कर श्रोत्रीने मिळून ‘हाय काय न्‌‍ नाय काय' या नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा विनोदी चित्रपट होता. पण चित्रपट चालणं हा नशिबाचा खेळ असतो असं म्हणतात तेच खरं. त्याच काळामध्ये ‘स्वाइन फ्लू' हा संसर्गजन्य आजार पसरायला सुरुवात झाली. हा आजार श्वसनाशी संबंधित असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणं धोकादायक बनलं. स्वाभाविकपणे प्रेक्षक चित्रपटगृहात जाणं शक्यच नव्हतं. परिणामी, चित्रपट पडला. त्यामुळे लगेच पुन्हा चित्रपट करण्यासाठी कोणी निर्माता मिळणं कठीणच होतं. शिवाय तोवर मुंबईत पत्नी आणि मुलांसह माझा संसार सुरू झाला होता. डोक्यावर आर्थिक जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे नाटक-चित्रपट-मालिका यापैकी जिथे अभिनयाचं काम मिळेल ते करणं भाग होतं. स्वतंत्रपणे दिग्दर्शक बनण्याचं स्वप्न पुन्हा एकदा सायडिंगला टाकण्याशिवाय पर्यायच नव्हता.

‘आलो दिग्दर्शन करण्यासाठी आणि बसलो अभिनय करत' अशा अवस्थेत वर्षं पुढे सरकत होती. करता करता २०१५ साल उजाडलं. मला मुंबईत येऊन १८ वर्षं झाली होती. अभिनेता म्हणून नाव आणि पैसा मिळत असल्याने तक्रारीला जागा नव्हती. पण स्वतंत्र दिग्दर्शक होण्याचं स्वप्न अपूर्णच राहणार असं वाटू लागलं होतं. त्या दरम्यान चिन्मय मांडलेकर आणि मी बरीच कामं एकत्र करत होतो. त्याने लिहिलेल्या ‘बेचकी' या नाटकात मी अभिनय करत होतो. त्याच्या ‘क्षण' या चित्रपटाचं लेखन त्यानं केलं होतं आणि मी त्यात अभिनय केला होता. एका बाजूला आमचं बरंच बोलणं होत होतं. त्यातून त्याने एक चित्रपट लिहावा आणि मी दिग्दर्शित करावा असं आमचं ठरलं. मात्र, चित्रपटाचा विषय ठरत नव्हता.

याच काळात ‘सेव्हन रोशन व्हिला' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मी महाबळेश्वरला होतो. तिथे जयवंत दळवींचे चिरंजीव गिरीश दळवी यांच्याशी भेट झाली. मी दळवींच्या लेखनाचा चाहता असल्याने त्यांच्या कथा, कादंबऱ्या वाचलेल्या होत्या. ‘पुरुष', ‘पर्याय' किंवा ‘नातीगोती'सारखी नाटकं पाहिलेली होती. त्यांच्या ‘बॅरिस्टर' नाटकावर आधारित मालिकेत मी अभिनय केला होता. त्यामुळे गिरीश दळवींशी मी भरभरून बोलत होतो. ते ऐकून त्यांनी त्यांच्या मनातला विचार बोलून दाखवला. दळवींच्या कथा, कादंबऱ्या आणि नाटकांवर आधारित चित्रपट निघू शकतात असं त्यांना वाटत होतं. मी चित्रपटासाठी विषयाच्या शोधात असल्याने माझ्या विचारांना दिशा मिळाली.

‘ऋणानुबंध' या दळवींच्या कादंबरीवर आधारित ‘नातीगोती' नावाचं नाटक स्वत: दळवींनीच लिहिलं होतं. मोहन जोशी, दिलीप प्रभावळकर, स्वाती चिटणीस आणि अतुल परचुरे अशी कलावंत मंडळी त्यात होती. मी ते नाटक पाहिलं तेव्हा आतपर्यंत भिडलं होतं. त्यामुळे त्याच विषयावर चित्रपट करावा अशी कल्पना मला सुचली. त्याला गिरीश दळवींनी दुजोरा दिला. मुख्य म्हणजे मंदार देवस्थळीसारख्या निर्मात्याने चित्रपटाची निर्मिती करायची तयारी दाखवली.

मी ‘ऋणानुबंध' परत एकदा वाचायला घेतली. १९८०च्या सुमाराची मुंबईतल्या गिरगाव परिसरात राहणाऱ्या एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कहाणी आहे. जेमतेम आर्थिक उत्पन्न असल्याने पती-पत्नी दोघंही नोकरी करत असतात. त्यांचा १५ वर्षांचा मुलगा ‘स्पेशल चाइल्ड' असतो. त्याच्या शारीरिक जाणिवा विकसित होत असतात, पण मेंदूची पुरेशी वाढ न झाल्यामुळे मानसिक वय मात्र बाल्यावस्थेत असतं. अशा पालकांच्या जगण्यातले प्रश्न, त्यातली घुसमट, मानसिक ताण या सगळ्यांची भेदक मांडणी जयवंत दळवींनी कादंबरीत केली आहे. दैनंदिन जगण्यापासून ते पती-पत्नींमधल्या लैंगिक संबंधांपर्यंत सर्व बाबतींत त्या जोडप्याची कुचंबणा होत असते. त्यांचं आपल्या एकुलत्या एक मुलावर मन:पूर्वक प्रेम असतं, पण त्याच्याशी कसं वागावं हे मात्र त्यांना कळत नसतं. कारण आपले आई-वडील काय सांगतायत याचा अर्थच त्या मुलाला कळत नसतो. त्यामुळे त्या त्रिकोणी कुटुंबाची अवस्था ताणलेल्या स्प्रिंगसारखी झालेली असते.

चित्रपटाच्या दृष्टीने कादंबरी वाचत असताना एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली. ‘स्पेशल चाइल्ड' असणाऱ्या मुलांना आपल्या बाबतीत नेमकं काय वेगळं घडतं आहे हे कळतच नाही, पण त्यांच्या पालकांची अवस्था मात्र अवघड असते. वयाने वाढलेल्या मुलाचं रोजच्या रोज सगळं करणं, त्याला एकटं सोडून बाहेर जाता न येणं, त्याचे भावनिक चढ-उतार झेलणं आणि तरीही वरून शांत राहणं, असं सगळं आयुष्यभर जमवावं लागतं. हे कमी म्हणून की काय, ‘समाजाच्या नजरा' नावाचा खतरनाक प्रकार असतो. एखाद्या लग्नकार्यात नातेवाईक वगैरे मंडळी अशा जोडप्यांकडे विचित्र नजरेने पाहतात. असं मूल जन्माला येण्यात त्या जोडप्याचा काहीच दोष नसतो, हे कोणीच लक्षात घेत नाही. या सगळ्याचा मी जसजसा विचार करत गेलो तसतसा कमालीचा अस्वस्थ झालो. मग ठरवलं ‘स्पेशल चाइल्ड'च्या ‘स्पेशल पेरेंट्‌‍स'चा चित्रपट बनवायचा.

मी लगेचच चिन्मयला गाठलं. त्याने ‘ऋणानुबंध' ही कादंबरी वाचली नव्हती, ‘नातीगोती' हे नाटकही पाहिलं नव्हतं. त्याने नाटक पाहिलेलं नव्हतं हे एका अर्थाने चांगलंच झालं, अन्यथा चित्रपटाच्या लिखाणावर नाटकाचा प्रभाव पडला असता. मग मी कादंबरी त्याला वाचायला दिली. त्यालाही ती खूप भिडली. तो पटकथा-संवाद लिखाणाच्या तयारीला लागला. याच काळात मी अनेकांशी चर्चा करत होतो. ‘स्पेशल चाइल्ड' या घटकाचे वेगवेगळे पैलू समजून घेत होतो. या विषयावर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो. एखाद्या विषयावर आपण काम करायला लागलो की त्या विषयाचे संदर्भ आपसूकपणे समोर येत राहतात. जसजसा मी त्या विषयाच्या आत शिरत होतो तसतसं मला त्याचं गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात येत होती. ‘स्पेशल पेरेंट्स'ची अबोध वेदना माझी बनत होती.

मूळ ‘ऋणानुबंध' कादंबरीत लेखकाने केलेला शेवट अत्यंत नकारात्मक आहे. पण कादंबरीचा वाचक आणि चित्रपटाचा प्रेक्षक यामध्ये खूप फरक आहे. चर्चेसाठी

असं धरू की एक लाख प्रेक्षक चित्रपट पाहतील. त्यांमध्ये दहा टक्के म्हणजे दहा हजार लोक ‘स्पेशल चाइल्ड'चे नातेवाईक असू शकतात. चित्रपटाची हाताळणी आणि शेवट करत असताना या मंडळींच्या मानसिकतेचा विचार करणं मला महत्त्वाचं वाटत होतं. मी बोलता बोलता चिन्मयला म्हटलं, “आधीच या मंडळींच्या जगण्याचे रंग उडालेले असतात. त्यात आपण निराशावादी शेवट दाखवून त्यांच्या दु:खात भर का घालायची?” माझं म्हणणं चिन्मयला पटलं. आम्ही चित्रपटाचा शेवट आशावादी करण्याचा निर्णय घेतला.

पण या चर्चेदरम्यान आणखी एक वेगळीच कल्पना माझ्या डोक्यात आली. यांची आयुष्यं रंग उडालेली आहेत, तर मग आपण चित्रपट रंगीत का करायचा? त्याविषयी आम्ही आमचा कॅमेरामन अमलेंदू चौधरीशी चर्चा केली. त्यातून असं ठरलं, की संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाइट करायचा, फक्त शेवटी आशावाद व्यक्त होतो तेव्हा एक-एक फ्रेम रंगीत होत जाईल आणि अखेरच्या काही मिनिटांसाठी संपूर्ण पडदा रंगीत असेल.

चिन्मयने चित्रपटाचे संवाद अतिशय उत्कट आणि प्रवाही लिहिले होते. संपूर्ण चित्रपटभर एक आर्तता जाणवत राहील असं वातावरण त्यातून साकारत होतं. त्या आर्ततेला साजेशी कविता संदीप खरे यांनी लिहून दिली, जी आम्ही अवधूत गुप्तेच्या आवाजात रेकॉर्ड केली. या लेखाच्या सुरुवातीला मी त्यातल्याच ओळी उद्धृत केल्या आहेत. कारण चित्रपटाला काही वर्षं लोटल्यानंतरही माझ्या मनाच्या तळाशी ती कविता रेंगाळली आहे.

चित्रपटात आईच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी मला सोनाली कुलकर्णीच पाहिजे होती. ती एक समर्थ अभिनेत्री आहेच, शिवाय जयवंत दळवी यांचं साहित्य तिने वाचलेलं असल्याने त्याचाही उपयोग होणार होता. वडिलांच्या भूमिकेसाठी एक-दोन नामवंत कलाकारांना विचारणा केली, पण तारखा जुळल्या नाहीत. मग अचानक मला दिग्दर्शक रवी जाधवचं नाव सुचलं. मी त्याला अभिनयासाठी विचारणं हे त्याच्यासाठीही आश्चर्यच होतं; पण तो ती भूमिका उत्तम करू शकेल याचा मला विश्वास होता, जो नंतर सार्थ ठरला. सोनालीच्या बॉसच्या भूमिकेत सचिन खेडेकरची निवड केली, कारण तो कसलेला अभिनेता आहेच. शिवाय सोनालीप्रमाणे त्यालाही वाचनाची आवड आहे. आपण माध्यमांतर करतो म्हणजे कादंबरी किंवा कथेवरून चित्रपट तयार करतो तेव्हा कलाकारांना मूळ कलाकृतीची जाण असावी असं मला वाटतं.

या चित्रपटातलं आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजे ‘स्पेशल चाइल्ड'. त्यासाठी आम्ही मनमीत पेमची निवड केली. त्याच्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक होती. हा विषय त्याला नवीन नव्हता. कारण त्याच्या जवळची एक व्यक्ती स्पेशल चाइल्ड होती. त्यामुळे त्याला अशा व्यक्तिमत्त्वाचा अंदाज होता. शिवाय कळत-नकळत त्याचे हातवारे, हालचाली यांचंही निरीक्षण त्याने केलेलं होतं. चित्रपटात ‘स्पेशल चाइल्ड'च्या लैंगिक भावना जागृत झाल्यावर काय होतं असा एक सीन आहे. खरं सांगायचं तर तो मनमीनतला समजावून सांगताना मीच जरा अवघडलो होतो; पण त्याने तो नीट समजून घेतला आणि निभावलाही. चित्रपट बनवताना मन सतत संमिश्र भावनांनी भरलेलं होतं. ते ‘स्पेशल चाइल्ड' आईच्या पदराला हात घालतं, हा सीन अपेक्षेप्रमाणे शूट झाला की दिग्दर्शक म्हणून बरं वाटायचं, पण माणूस म्हणून तो प्रश्न भेडसावत राहायचा. हा विषयच असा होता की ज्याच्यापासून अलिप्त राहणं अतिशय अवघड होतं. त्यातून स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट असल्याने माझ्या मनावर प्रचंड ओझं होतं.

चित्रपट तयार झाला. प्रदर्शनाची तारीखही नक्की झाली. स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याचं १९९६ पासून पाहिलेलं माझं स्वप्न पूर्ण होत होतं. त्यामुळे कृतकृत्यतेची भावना होती. दुसरीकडे निर्मात्याने पैसे गुंतवलेले असल्याने आर्थिकदृष्ट्या चित्रपटाला कसं यश मिळेल याचं नाही म्हटलं तरी टेन्शन होतं. त्याच वेळेला ‘स्पेशल पेरेंट्‌‍स'चा मी मांडलेला विचार प्रेक्षक कशाप्रकारे स्वीकारतो आहे याचीही धाकधूक होतीच. ठरल्या दिवशी चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद येऊ लागला. नेहमीप्रमाणे पहिल्या दोन दिवसांत बऱ्या आणि वाईट अशा दोन्ही प्रतिक्रिया होत्या, पण चित्रपट चालणार की नाही हे कळत नव्हतं. त्यामुळे आम्ही सगळेच गॅसवर होतो. पण अखेर घडू नये ते घडलं. सहाव्या दिवशी चित्रपटगृहातून चित्रपट उतरला. मराठी प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली.

आम्ही वर्षभर केलेल्या मेहनतीवर अवघ्या सहा दिवसांत पाणी फिरलं. मला दुहेरी धक्का बसला. पहिला धक्का अर्थातच चित्रपट आर्थिकदृष्ट्या न चालल्याचा होता. दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट चालला नाही याची नोंद माझ्या नावावर झाली होती. आमच्यावरच्या विश्वासाने पैसा गुंतवलेल्या निर्मात्यांचं आर्थिक नुकसान झालं होतं. पण या दोन्ही बाबी तात्कालिक होत्या. दिग्दर्शक म्हणून पुढे मी आणखी चित्रपट यशस्वी करून दाखवू शकणार होतो. तसं करून पहिल्या चित्रपटाचं अपयश धुऊन काढणं माझ्या हातात होतं. आमचे निर्मातेही इतर प्रकल्पांमध्ये पैसे मिळवून या चित्रपटाचा तोटा भरून काढू शकणार होतेच. पण मला बसलेला दुसरा धक्का माझ्या जिव्हारी लागला होता. तो कसा भरून निघणार होता?

मी आणि चिन्मयने अतिशय पोटतिडकिने ‘स्पेशल पेरेंट्स'चा विषय मांडला होता. सोनाली, सचिन, रवी आणि मनमीतने जीव ओतून त्यासाठी काम केलं होतं. अमलेंदूने त्या ‘पेरेंट्‌‍स'च्या जगण्यातली आर्तता पडद्यावर उतरवण्यासाठी प्रत्येक फ्रेममध्ये त्याचं कॅमेरामन म्हणून असलेलं कसब पणाला लावलं होतं. संदीप खरेच्या कवितेच्या ओळींनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला होता. राहुल रानडेने चित्रपटाला समर्पक संगीत दिलं होतं. पण... पण माझ्या मराठी प्रेक्षकांनी एका झटक्यात हे सगळं नाकारलं होतं. ‘आमचं मूल स्पेशल आहे हा आमचा दोष नाही. आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू नका' ही पालकांची आळवणी ज्याप्रमाणे समाज ऐकत नाही, त्याप्रमाणे मी दिग्दर्शक म्हणून संवेदनशील प्रेक्षकाला घातलेली साद समाजाने ऐकून न ऐकल्यासारखी केली होती.

प्रेक्षागृहातून चित्रपट उतरल्यानंतर पुढचा आठवडाभर मी झोपू शकलो नाही. कणभरही अन्न खाऊ शकलो नाही. सतत रडत होतो. आपल्या मराठी प्रेक्षकांचा हा ‘नवा' चेहरा मला सहन होत नव्हता. पुढे याच चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळेना. नंतरच्या काळात मी दिग्दर्शित केलेल्या ‘हिरकणी' आणि ‘चंद्रमुखी' या दोन्ही चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मात्र, ‘कच्चा लिंबू'चा सल माझ्या मनाच्या तळात तसाच आहे. माझ्यासाठी तो ‘स्पेशल चित्रपट' आहे.

प्रसाद ओक







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

विनायक बा. शितोळे, सांगली18.08.25
सिटी प्राइड कोथरूड ला मी व्यक्तिशः त्यांचे भेटून अभिनंदन केले होते.चित्रपट संपवून आम्ही बाहेर पडलो होतो तेव्हा ते जोडीने होते व मी स्वतःहून त्यांना माझा फीडबॅक असा दिला होता कि, *जयवंत दळवी यांचे इंप्रेशन घेऊन मी आत गेलो होतो, पण दिग्दर्शक प्रसाद यांचे इंप्रेशन घेऊन बाहेर पडत आहे* हे ऐकताच त्यांच्या सौ.नी खूपच समाधान व्यक्त केले होते. हा ही एक चांगला सिनेमा आहे...विशेषतः सध्या तुफान चालू असलेल्या, ऑल द बेस्ट नाटकातील मनमित पेम या अभिनेत्याने या सिनेमा त साकारलेली भूमिका मस्तच.माझे एक मामा ही special child प्रकारात मोडतात,जे आत्ता 50 वर्षाचे आहेत..त्यामुळे कल्पना आहे. रवी जाधव या गुणी दिग्दर्शकाने यात बापाची साकारलेली भूमिका पाहण्याजोगी.👍🏻

नितांत 16.08.25
चित्रपट प्रदर्शित झालेला माहित नव्हता. त्या अगोदर शूटिंग सुरू आहे हे पण माहित नव्हते. तो प्रदर्शित झाल्यानंतर रिव्ह्यू पाहण्यात आले नाहीत. वाचण्यात आले नाहीत. सांगली सारख्या ग्रामीण भागातील हे चित्र आहे. आता चित्रपट नक्की पाहीन. लेखा विषयी जाहिरात पाहिल्यानंतर पहिला मुद्दा प्रमोशन विषयी जाणवला.

सुरेश मन्साराम मोरे14.08.25
नमस्कार एकंदरीत पिक्चर चांगलाच आहे.माझी एक अत्यंत ऊत्कुष्ठ कादंबरी पिक्चरसाठी आहे.मी आपणास संपर्क करू इच्छित आहे.तरी 9890620917 यावर संपर्क करावा ही विनंती

Kamlesh Pradhan14.08.25
अतिशय सुंदर कल्पक आणि वैचारिक मराठी चित्रपट आहे हा चित्रपट ज्याला कळला त्याला कळला, आर्थिक नुकसान झाले हा भाग वेगळा आहे परंतु प्रसाद ओकने जे काही मराठी चित्रपटात मांडले आहे ते खूप मोठे धाडस आहे. आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरला आहे

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results