अलीकडच्या काळात मानव-बिबट्या संघर्ष वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाहायला मिळतो आहे. वाघ-सिंहापेक्षा बिबटयाशी मनुष्याचा संघर्ष तुलनेने जास्त होतो. कुत्री, मांजरे, डुकरे, गाई, म्हशींची वासरे, इतर छोटे प्राणी हे बिबट्याचं खाद्य. त्याला खाद्य मिळालं नाही म्हणजे तो त्या शोधात मनुष्यवस्तीमध्ये येतो. आता ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात राहणाऱ्या मंडळींनाही बिबट्याची भीती सतावू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वन्य प्राण्यांचे अधिवास असलेल्या शहरांबाहेरील वनसदृश भागांत सिमेंटची जंगलं उभी राहिली. वन्य प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले, शहरं जंगलाकडे सरकत असल्यामुळे वन्यप्राण्यांचं जगणं, त्यांचा मोकळेपणा या सगळ्यावर बंधनं आली. त्याचा परिणाम दिसतो आहे- तो माणूस-बिबटे संघर्षाच्या रूपात!
राज्यात ठाणे, बोरिवली, जुन्नर, ताडोबा, नाशिकच्या काही भागांत बिबट्या मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यापैकी बोरिवली आणि जुन्नर या परिसराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात मनुष्यवस्ती आहे. बोरिवलीच्या परिसरातील मनुष्यवस्तीच्या भागात हे बिबटे हिंडत असतात. राज्याच्या वन विभागाने बोरिवलीच्या परिसरात बिबट्यांवर चांगलं काम केलं आहे, पण जुन्नर, शिरूरमधली परिस्थिती याउलट आहे. गेल्या आठवड्यात शिरूरमध्ये दोन लहानग्या मुलांचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. या भागात जंगलच नाही, त्यामुळे बिबट्यांची राहण्याची जागा म्हणजे उसाचं शेत. त्यामुळे या भागातील बिबट्यांना (शुगरकेन लेपर्ड) असं संबोधलं जातं. सध्या वातावरणामुळे बिबट्यांच्या अधिवासातही बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांची वागणूकही बदललेली दिसते.
यावर उपाय काय?
माणसंही सुरक्षित राहिली पाहिजेत आणि बिबट्यांचाही सुरक्षित अधिवासासह अन्नाचा प्रश्न सुटला पाहिजे, या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील जयपूर शहराच्या मध्यभागात असणारे झालाना लिओपार्ड सफारी पार्कचं मॉडेल आदर्शवत ठरतं. या परिसरात बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात असूनही मनुष्य आणि बिबट्या यांच्यामध्ये कधीच संघर्ष होत नाही, बिबट्याने माणसावर हल्ला केल्याच्या घटना घडताना दिसत नाहीत. माणूस-बिबट्यांचं इथे अभूतपूर्व सहअस्तित्व दिसतं. बिबट्याकडून माणसावर होणारे हल्ले रोखण्यासाठी हे मॉडेल देशभरात राबवलं जाऊ शकतं.
काय आहे झालाना मॉडेल?
जयपूर परिसरात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत. बिबट्यांमुळे या भागातील पर्यावरणाचे संवर्धन अगदी चांगल्या प्रकारे होत असून त्यांच्या भीतीमुळे अवैध वृक्षतोडही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इथली निसर्गसंपदा सदा हरित आहे. जैवविविधता आणि पर्यावरण संतुलन इथे टिकून आहे. उन्हाळयात जयपूरच्या परिसरात तापमानाचा पारा ४७ अंशापर्यंत गेलेला असतो. मात्र, या परिसरात तो ४२ ते ४४ अंशापर्यंत असतो. इथल्या बिबट्यांचे मुख्य खाद्य आहे भटकी कुत्री. आतापर्यंत तिथली सुमारे ४३ टक्के भटकी कुत्री बिबट्यांनी फस्त केली आहेत. त्यामुळे या भागात भटक्या कुत्र्यांचं प्रमाण कमी असून कुत्रा माणसांना चावण्याचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे सरकारकडून रेबीज प्रतिबंधक लस देण्यासाठी दरवर्षी होणाऱ्या खर्चात २५ ते ३० लाख रुपयांची बचत होताना दिसून येते, असे निरीक्षण बिबट्याचे अभ्यासक स्वप्निल कुंभोजकर नोंदवतात.
झालाना भागात आजूबाजूच्या खेड्यांमध्ये गुजर समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांच्याकडील जनावरं, म्हणजे गाई-म्हशी मरण पावल्यावर त्यांची विल्हेवाट लावणारी यंत्रणा महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे ही मंडळी त्यांना जंगलाच्या सीमेवर आणून टाकतात, हे खाद्य बिबटे खातात. यामुळे बिबट्यांना खाद्य मिळतं आणि मृत जनावरांची परस्पर विल्हेवाट लागते. त्यामुळे बिबट्यांच्या अधिवासापासून ते खाद्यापर्यंत सर्व काही इथे एकाच ठिकाणी मिळत आहे.
वन विभागाची इच्छाशक्ती
झालाना पॅटर्नसाठी वन विभागाकडून नाविन्यपूर्ण योजना राबवण्यात येतात. बिबट्याच्या हल्ल्यांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू टाळण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन गावांमध्ये वन विभागाने स्थानिक स्वयंसेवक पथकं तयार केली आहेत. त्यातील लोकांना बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षित केलं जातं. ग्रामपंचायती, ग्रामस्थांसह बैठका घेऊन हे स्वयंसेवक वन विभागाच्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांना सहभागी करून घेऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतात. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गुरंढोरं, शेळ्या मारल्या गेल्यास वन विभाग पीडित व्यक्तीला त्वरित भरपाई देतो. त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्या आणि वन विभागाप्रती द्वेषाचं प्रमाण कमी आहे.
संशोधकांचं मार्गदर्शन
वन संशोधकांनी केलेल्या वेगवेगळ्या संशोधनाचा वापर झालानामध्ये धोरणे आखण्यासाठी करण्यात येतो. कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे बेसलाइन डेटा जमा करून बिबट्यांचा आहार, प्रदेशाचे नमुने आणि बिबट्यांच्या संख्येचं निरीक्षण केलं जातं. ही माहिती राज्य सरकारला देण्यात येते. त्याचा अभ्यास करून महत्त्वाची धोरणं आखण्यात येतात. कधी मानवी वस्तीत बिबट्यांकडून हल्ला झाल्याची घटना घडलीच तर त्यासाठी पशुवैद्यकीय, वनरक्षकांचा समावेश असलेली बचाव पथकं तयार करण्यात आली आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सापळा लावण्याची आधुनिक उपकरणं, अत्यधुनिक वाहनं, बचाव पिंजरे सुसज्ज आहे. शिवाय बिबट्यांबाबत कोणत्याही घटनेची तक्रार करण्यासाठी एक खास हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. बिबट्या धोकादायक असेल तर त्याला ठेवण्यासाठी पुनर्वसन केंद्र असल्याने माणसासाठी घातक म्हणून त्याची हत्त्या करण्याचाही प्रश्न येत नाही. माणूस आणि बिबटे आपापल्या अधिवासात मुक्तपणे जगू शकतात.
या मॉडेलचा आणि राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करून तज्ज्ञांच्या सहाय्याने असं मॉडेल उभं करता येईल का, हा पहायला हवं.
