
११ फेब्रुवारी हा जगप्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसनचा जन्मदिवस. त्याने शास्त्रीय सैद्धांतिक शोध फार लावलेले नसले तरी तो अव्वल दर्जाचा तंत्रज्ञ असल्यामुळे त्याने शेकडो मानवोपयोगी यंत्र तयार केली. त्याच्या नावावर हजारहून अधिक शोध नोंदवले गेले आहेत.
विजेचा दिवा, स्वयंचलित तारायंत्रणा, सिनेमा प्रोजेक्टर, सायक्लोस्टायलिंग मशीन असे शेकडो शोध लावून त्याने माणसाचं जगणं सोपं व्हायला मदत केली.
अनेकांना माहीत नसेल, की हा अव्वल दर्जाचा शास्त्रज्ञ मोठा उद्योजकही होता. विजेवर चालणाऱ्या घरगुती व औद्योगिक यंत्रांच्या क्षेत्रातली ‘जनरल इलेक्ट्रिक' (जीई) ही जगातली सर्वांत मोठी कंपनी त्यानेच स्थापन केली होती.
अनेकांना हेही माहीत नसेल की १८४७ साली अमेरिकेतल्या ओहायो प्रांतातील मिलान या गावी जन्मलेल्या एडिसनने बालपणी म्हणजे वयाच्या केवळ बाराव्या वर्षी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकण्याचं काम केलं होतं. पुढे त्याने छपाई यंत्र तयार करण्याची खटपट केली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने ‘ग्रँड ट्रंक वीकली' नावाचं साप्ताहिकही काढलं होतं. एका मालगाडीच्या डब्यातच त्याने आपली प्रयोगशाळा थाटली होती. तिथेच तो साप्ताहिकाची छपाई करत असे. नवनवीन गोष्टी करून पाहण्याच्या या वृत्तीतूनच एक महान शास्त्रज्ञ आणि उद्योजकही जन्माला.
टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com
टीम युनिक फीचर्स पोर्टल