आम्ही कोण?
आडवा छेद 

नैसर्गिक आपत्तींच्या पोटातील दुर्दैवी आपत्ती

  • सुहास कुलकर्णी
  • 17.03.25
  • वाचनवेळ 4 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
human trafficking in natural disasters header

हवामान बदलाची चर्चा जगभर होत असते. किती पद्धतीने हवामान बदल होत आहे आणि त्यातून कोणते प्रश्न निर्माण होत आहेत, याचा अभ्यासही सुरू आहे. अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, उष्णतेच्या आणि थंडीच्या लाटा, गारपीट, वादळं यांची वारंवारिता वाढत आहे आणि त्यात वित्तहानीसोबत मनुष्यहानी होत आहे, हे उघड आहे.

हवामान खात्याच्या ताज्या अहवालानुसार देशात एका वर्षात सुमारे ३२०० लोकांचा बळी गेला आहे. केवळ नैसर्गिक आपत्तींमुळे एवढ्या लोकांचा जीव जातो, हे धक्कादायक आहेच; पण हवामान बदलाच्या दुष्परिणामांचं हे केवळ वरवर दिसणारं टोक आहे, हेही खरं.

सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचं सोडा, फक्त समुद्री वादळांचा मनुष्यजीवनावर काय परिणाम होतो बघा. भारताला पूर्व आणि पश्चिम असे दोन लांबलचक समुद्रकिनारे लाभलेले आहेत. एका बाजूला अरबी समुद्र आहे, तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर. या दोन्ही किनाऱ्यांवर जोरकस वादळं दाणादाण उडवत असतात. त्यातही बंगालपासून ओरिसा, आंध्र आणि तामिळनाडू या पूर्वेकडच्या पट्ट्यात त्यांचा जोर जास्त असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या जबाबदाऱ्यांत वादळांपासून बचाव करणं हे जोखमीचं कामच होऊन बसलं आहे. वादळांचे अंदाज बांधणं, हे वादळ कोणत्या भागात, केव्हा, किती काळ, किती नुकसान करणार याचा अभ्यास करणं आणि त्या भागांतील हजारो-लाखो लोकांना काही काळापुरतं सुरक्षित स्थळी हलवून त्यांना खाऊ-पिऊ घालणं, हे एक कामच होऊन बसलं आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी ओडिशातील नवीन पटनाईक सरकारने एक रीतसर यंत्रणा उभारण्यात यश मिळवलं आहे. त्याचे तपशील तिकडे कार्यरत असलेले मराठी सनदी अधिकारी राजेश पाटील यांच्या ‌‘मोर ओडिशा डायरी‌’ या पुस्तकात मिळतात. तिथल्या सरकारने केलेल्या उपाय योजनांमुळे नुकसान कमी करण्यात यश कसं मिळतं आहे, हे कळू शकतं.

ओडिशाप्रमाणेच बंगालही वादळांमुळे प्रभावित होणारं प्रमुख राज्य आहे. २०२२ मध्ये समुद्री वादळांमुळे या एकट्या राज्यात ५८,८७१ लोक बेपत्ता म्हणून नोंदवले गेले आहेत. त्यातील ५३,६५५ स्त्रिया असून १२,४५५ मुलं आहेत. या लोकांपैकी किती मृत्युमुखी पडले, किती परागंदा झाले, किती स्थलांतरित-विस्थापित झाले, किती रस्त्यावर आले माहीत नाही! परंतु हा आकडा भिववणारा आहे एवढं खरं.

या आकड्याच्या पोटात आणखी एक भीषण सत्य लपलेलं आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीनुसार त्या वर्षात ७७ व्यक्तींची मानवी तस्करी झाली. त्यात ६० मुली व १७ मुलं होती. यातील बहुतेक १८ वर्षांखालील होती. हा आकडा पोलिसांत नोंद झालेल्या व्यक्तींचा आहे. ज्यांची तस्करी यशस्वीपणे झाली आणि त्याचा यंत्रणेला पत्ताच लागला नाही, अशी संख्याही या पलीकडे असणारच. नोंद होणाऱ्या आकड्यांतही गेल्या तीन वर्षांत वाढच होत आहे. याचा अर्थ नैसर्गिक आपत्तीत जी मुलं-मुली सापडतात, अनाथ होतात, त्यांचा चोरटा व्यापार केला जातो, तो व्यापार दरवर्षी वाढत असताना दिसतो आहे. तस्करी केलेल्या व्यक्तींना व्यावसायिक पातळीवर लैंगिक शोषण, सक्तीचे श्रम, वेठबिगारी, अवयवांची चोरी अशा कोणत्याही छळाला सामोरं जावं लागतं. प्रत्येक वादळानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन होणाऱ्या या प्रकाराला हवामान बदलाच्या चर्चेत फारच कमी स्थान मिळतं.

हवामान बदलामुळे जी नैसर्गिक संकटं उद्भवतात. त्यातून कशीतरी मीठभाकरी खाऊन जगणारी माणसं आणखीच दारिद्य्राच्या खाईत ढकलली जातात, जगण्यासाठी त्यांना स्थलांतर करावं लागतं, धोकादायक कामं करावी लागतात, गावं-खेडी सोडून शहरात यावं लागतं. तिथे रस्त्यावरचं जीणं पत्करावं लागतं. या साऱ्या ओढाताणीत मुलं-माणसं हरवतात, बेपत्ता होतात, चोरली जातात. त्यामुळे हवामान बदलाच्या चर्चेत वाढणारी गरिबी आणि मानवी तस्करीसारखे अनुषंगिक प्रश्न पुढे यायला हवेत. अन्यथा हवामान बदल हा फॅशनेबल विषयच राहील.

मराठीतील महत्त्वाचे लेखक विलास सारंग यांनी फार पूर्वी एक कथा लिहिली होती. त्यात मुंबईचा एक शेठ गुजराथमध्ये आलेल्या वादळाचा गैरफायदा घेऊन तिथल्या निराधार अल्पवयीन मुलींना उचलून मुंबईत फोरास रोडवर विकण्याच्या मिशाने आपला एजंट पाठवतो, असा या कथेचा पूर्वार्ध आहे. माणसाचं किती स्खलन होऊ शकतं हे सांगण्यासाठी लेखकाने ही कथा लिहिली असणार असं वाटलं होतं. पण आजच्या भारतात ते वास्तव आहे आणि त्याची चर्चादेखील माध्यमांत नाही, हे दुर्दैव आहे.

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

NATU VIKAS S.21.03.25
भयानक वास्तव. जाणीव जागृती केली आहात तुम्ही.
प्रताप भैय्या देशमुख17.03.25
सुहासजी नैसर्गिक आपत्तीमध्ये परागंदा होणाऱ्यांची संख्या निश्चितपणे भिववणारी आहे परंतु यास माझ्यासारखी व्यक्ती नियतीचा फेरा ही म्हणू शकते. परंतु यामध्ये उध्वस्त झालेली माणसे आणि त्यांची शरीरे यांचा व्यापार करणाऱ्या प्रवृत्तीला काय म्हणावं? यांस आपण 'स्खलन' हा चपखल शब्द वापरला आहे. आणि त्यापुढेही आपण माध्यमांचं खरं वास्तव एका वाक्यात टिपलेलं आहे. मुद्रित माध्यमं आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं यांचा आर्थिक पाया पक्का असला पाहिजे हे नक्कीच परंतु फक्त जाहिरातीसाठी आणि टीआरपी साठीच ही माध्यमं वावरत आहेत. हे चित्र समाजासाठी आणि संपूर्ण लोकशाहीसाठी अत्यंत विदारक आहे. आणि नेमकं तसंच चित्र आता उभा राहिलेलं आहे. आजकालची सर्वच माध्यमं 'माणसाला कुत्र चावलं' आणि 'कुत्र्याला माणूस चावला' याच घटनेभोवती वारंवार फिरताना दिसतात परंतु माणसाचे आणि कुत्र्याचे इतर बाह्य व अंतरंग यापासून मात्र कायम दूर राहतात. आपला हा लेख अतिशय भावला. आपण तो शब्द रूपात आमच्यासारख्या वाचकांसमोर ठेवला ,त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन!
See More

Select search criteria first for better results