ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुका सणाचा आनंद लुटत होती. दोन माणसांनी दूरवरून त्यांच्यावर बंदूक चालवली. ४० जण जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कारमध्ये आयईडी स्फोटकं सापडली. बाप आणि मुलगा अशी हल्लेखोरांची जोडी होती. बाप १९९८ मध्ये ऑस्ट्रेलियात स्थलांतरित होऊन नागरिक झाला होता, २४ वर्षांचा त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात जन्मल्याने जन्मजात नागरिक झाला होता. त्यांच्याकडे लष्करी उपयोगासाठी तयार केलेल्या प्रभावी दर्जाच्या बंदुका होत्या. शक्यता दाट आहे; पण अजूनही गाझामधल्या युद्धाबद्दलची चीड व्यक्त करण्यासाठी हा हल्ला झाल्याचे सिद्ध झालेलं नाही.
घटना घडल्यापासून चौथ्या पाचव्या मिनिटालाच या घटनेची बातमी आणि रील्स जगभर पसरल्या. लगोलग पोलीस घटनास्थळी पोहोचले, धरपकड झाली, चौकशी सुरू झाली. एक हल्लेखोर मेला होता, एक हल्लेखोर गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती पडला होता. अजून तपास सुरू व्हायचा होता.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आणि पोलिस प्रमुखांनी ही घटना जगासमोर ठेवली आणि शांततेचं आवाहन केलं, अजूनपर्यंत त्यांच्याजवळ कोणतीही माहिती वा पुरावे गोळा झाले नव्हते. पण इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि अध्यक्ष हर्झोग यांनी हा हल्ला दहशतवाद्यांनी केला आहे, असं सांगून टाकलं. तेवढ्यावर दोघे थांबले नाहीत. ऑस्ट्रेलियामध्ये ज्यूविरोध (अँटीसेमिटिझम) बोकाळला असून सरकार त्यावर प्रभावी कारवाई करत नाही, असा आरोप दोघांनी केला. अजून कोणतेही पुरावे नसताना दोघांनी राजकारण करायला सुरुवात केली.
ऑस्ट्रेलियातले लाखो नागरिक इस्रायलने गाझामध्ये चालवलेल्या युद्धाचा निषेध करण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर आले होते. विद्यार्थी आणि तरुण हे या इस्रायल निषेधात आघाडीवर होते. ऑस्ट्रेलियन सरकारनेही इस्रायलचा निषेध केला होता. युद्ध थांबवा अशी विनंती केली होती. पॅलेस्टाईन देश स्थापन करा असा ठराव मांडला होता. युनायटेड नेशन्सने इस्रायलच्या युद्धखोरीचा निषेध केला होता; इस्रायल व पॅलेस्टाईन अशी दोन राष्ट्रं निर्माण व्हावीत असा ठराव केला होता, ऑस्ट्रेलियाने त्या ठरावाला पाठिंबा दिला होता. नेतान्याहू यांनी ऑस्ट्रेलियन सरकारवर या निर्णयाबद्दल टीका केली होती. इस्रायल ‘वेस्ट बँक’ या पॅलेस्टाईनच्या विभागात बेकायदा वसाहती बांधत आहे, यावर युनायटेड नेशन्स आणि ऑस्ट्रेलियाने टीका केली होती. टीकेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल सरकारने ऑस्ट्रेलियन राजदूतांचे व्हिसा रद्द केले होते.
ऑस्ट्रेलियन जनता इस्रायली कारवाईवर टीका करतेय याचा फायदा घेऊन इराणी सरकारने ऑस्ट्रेलियातल्या ज्यूंविरुद्ध दंगली घडवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने इराणी राजदूतांचे व्हिसा रद्द केले. इस्रायलचं धोरण आपल्याला मंजूर नसलं तरी इस्रायली आणि ज्यू माणसं ऑस्ट्रेलियात सुरक्षित आहेत, त्यांची पुरेपूर काळजी आपण घेत आहोत, असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी वारंवार स्पष्ट केलं होतं.
गाझाच्या प्रश्नावरून इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव होता आणि आहे. ऑस्ट्रेलियात ज्यूंवर झालेल्या ताज्या हल्ल्याला ही पार्श्वभूमी आहे.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधल्या एका सिनेगॉगवर (ज्यूंचं प्रार्थनास्थळ) एका माणसाने हल्ला केला होता. गाझामध्ये चाललेल्या युद्धाचा आपण निषेध करत आहोत, असं त्या माणसाने जाहीरपणे सांगितलं होतं. अमेरिकेतही ज्यूंवर हल्ले झाले आहेत. अमेरिकेतल्या युनिव्हर्सिट्या आणि कॉलेजांमधून लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले, त्यांनी इस्रायलचा निषेध केला. असा निषेध करणाऱ्यांमध्ये अनेक ज्यू विद्यार्थीही होते. अमेरिकन सरकारने, अमेरिकन उत्पादकांनी इस्रायलला शस्त्रं व माल पुरवणं बंद करावं, अशी मागणी झाली.
इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी युरोपीय देशांतही लोकांमध्ये इस्रायलबद्दल तीव्र चीड आहे. आखाती देशांबद्दल, मुसलमान बहुसंख्य असणाऱ्या देशांबद्दल तर बोलायलाच नको. इस्रायलने चालवलेल्या अमानुष आणि क्रूर युद्धाबद्दल तिथली जनता अस्वस्थ आहे. आज फक्त अमेरिका इस्रायलसोबत आहे, बाकीचं सारं जग इस्रायलच्या विरोधात आहे, असं चित्र दिसतंय. केवळ अमेरिकेच्या बळावर इस्रायलची मस्ती चालली आहे. तरीही युरोप अमेरिकेतल्या जनतेने संयम पाळला आहे, त्यांनी त्यांच्या देशातल्या ज्यूं नागरिकांना त्रास दिलेला नाही.
इस्रायलला विरोध म्हणजे ज्यूंना विरोध नव्हे असं जगभरच्या लोकांनी ठासून सांगितलेलं आहे. लोक अँटीसेमेटिक नाहीत, अँटी इस्रायल आहेत. हमासने इस्रायलवर केलेला हल्ला ही भयानक चूक आहे, असं सारं जग म्हणतं. पण म्हणून दोन वर्षं गाझावर लढाई लादून लाखापेक्षा जास्त माणसं मारणं, तीन चतुर्थांश गाझा जमीनदोस्त करणं बरोबर नाही, असंही सारं जग म्हणतंय. खुद्द इस्रायलमधले लोक म्हणत आहेत की नेतान्याहू अतिरेक करत आहेत. इस्रायलमधल्या कित्येकांनी उघडपणे आरोप केलाय की डळमळीत झालेल्या सत्तेवर ताबा टिकवण्यासाठी नेतान्याहू यांनी युद्ध उचकावलं आहे. हमास या संघटनेला धडा शिकवण्याच्या नादात लाखभर निष्पाप नागरिकांना मारणं हे अमानुष कृत्य आहे असं जगातले आणि इस्रायलमधले लोकही म्हणत आहेत. ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुटका केल्यानंतर आणि ट्रम्प यांची मध्यस्थी दोन्ही बाजूंनी मान्य केल्यानंतरही इस्रायल दररोज शेकडो माणसं मारतंय आणि शेकडो घरं जमीनदोस्त करतंय.
सिडनीत मेलेले १५ ज्यू निष्पाप होते. ते ज्यू गाझात बाँब टाकत नव्हते. त्यांना गोळ्या घालणं अगदीच चूक आहे. पण तोच न्याय इस्रायलने गाझातल्या हजारो निष्पाप लोकांनाही लावायला हवा. तसं होताना दिसत नाहीये. नेतान्याहू राक्षसासारखे वागत आहेत. शिक्षा त्यांना, त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना व्हायला हवी, जगभर पसरलेल्या ज्यूंना नाही.
सत्तांध झालेली सरकारं आणि जनता यांच्यात दुही असते, असं जगभर दिसतंय. इस्रायलमध्येही तसंच घडतंय. ऑस्ट्रेलियात किंवा कुठेही कोणीही ज्यूंचे खून करता कामा नये आणि कोणीही मुसलमानांचे खून करता कामा नयेत. हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
