हल्ली या ना त्या पद्धतीने भारत-पाकिस्तान असं कायम मनात असतं. कारण सरळच आहे, की ते या ना त्या प्रकारे कायम समोर येत असतं. बाबरी मशीद/राम जन्मभूमीचं कायम न्यायालयात काही ना काही चाललेलं असतं. असंख्य तणावाखाली वावरत असलेले लष्करशहा मुशर्रफ, मिळेल त्या व्यासपीठावर काश्मीरचा प्रश्न उपस्थित करत असतात. आणि अगदी भारतीय खाजगी वाहिन्यांना दिलेल्या टवटवीत मुलाखतीतही काश्मीर हा कळीचा मुद्दा आहे असं सांगत असतात. भारत आणि पाकिस्तानचे हे उद्योग चालू असताना काश्मीरमध्ये सारखं काही ना काही होत असतं. स्त्रिया, लहान मुलं चिरगुटांसारखी मरत असतात. खेरीज सीयाचीनमध्ये दोन्ही देशांचे परस्परांविरुद्ध उभे ठाकलेले सैनिक कितीही काळजी घेतली तरी अमाप गारठ्याने सारखे मरत असतात. आणि ही सारी दोन्ही देशातल्या गरीब घरातली, शरीर हेच केवळ ज्यांचं भांडवल आहे अशी तरुण मुलं/माणसं असतात. मुख्य म्हणजे त्यांच्या मरणाच्या कुठंही बातम्या होत नाहीत आणि आपण तर सुखाचे घास घेत म्हणत असतो की ‘सैनिकहोऽऽ तुमच्याऽऽसाठी, भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी....' काही अडत नाही. कुणीही आपल्या अंतरात्म्याला विचारावं. गाणी गाऊन वा ऐकून स्वत:वर खूष होण्याइतपतच या गोष्टींची मर्यादा. बाकी राज्यकर्ते, पुढारी एकमेकांविरुद्ध डरकाळ्या फोडण्यास कायम मुक्त. दोन्ही देशातल्या गरिबांच्या घामातून तयार होणारा अगणित पैसा संहारक शस्त्रं विकत घेण्यासाठी खर्च होतोय. सारखा खर्च होतोय. सैन्यं एकमेकांसमोर नेहमी सज्ज खडी असतात. क्रिकेटचे सामने धर्मयुद्धासारखे लोकांच्या मनात खेळवले जात असतात. तरी बरं, महंमद कैफ किंवा झहीर खानसारखे जन्माने मुसलमान असलेले भारतीय खेळाडू आपल्या संघात आहेत आणि दोघंही महत्त्वाचे खेळाडू आहेत. भारत-पाकिस्तानच्या दरम्यान जेव्हा जेव्हा क्रिकेट मॅच होते तेव्हा सगळं भरतखंड टीव्हीच्या पडद्यासमोर असतं. क्रिकेटने जवळपास धर्माची जागा घेतलेल्या आपल्या देशात सचिन तेंडुलकरसारखा महान अद्भुत खेळाडू देवाच्या स्थानी जाऊन बसला आहे.
हे सारं हे असं काय झालं आहे? गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षात आपण काय मिळवलं? कुठून कुठं आलोत आपण? कुठून कसा वाढलाय इतका विद्वेष?
आपण, पाकिस्तानी, बांगलादेशी कसे काय ‘वेगळे' लोक आहोत? आपण तर एकाच प्रकारच्या एकमेकांना समजणाऱ्या भाषा बोलतो. एकमेकांसारखे दिसतो तर कुठून कशा भक्कम केल्या जात आहेत आपल्यामधल्या भिंती? हा कसला आरडाओरडा चालला आहे सगळीकडं? कोण हे प्रवीण तोगडिया आणि साध्वी ऋतंभरा? हे अशोक सिंघल कोण? लक्षावधी बांगलादेशी भारतात येऊन राहतात किंवा कच्छच्या रणातून पिढ्यान्पिढ्या भटके लोक आजही भारत-पाकिस्तान असं काहीही न जुमानता ये-जा करत असतात. कोणती कुंपणं घालून आपण हे सारं अडवणार आहोत? कोणत्या तपासण्या करणार आहोत?
काहीतरी चुकतंय खास. काहीतरी कृत्रिम आहे हे नक्की. जागतिक राजकारणातल्या बड्या शक्तींना अनुकूल (म्हणजे सोयीचं) असंच आपण वागत आहोत. कधी कधी तर मनात येतं की भारत-पाकिस्तानची सैन्यं समोरासमोर आली की त्यांना थांबवावं आणि मधोमध कुंदनलाल सैगल अन् नूरजहाँची गाणी लावून द्यावीत. म्हणावं, हे ऐका अन् काय करायचं ते करा. हे हास्यास्पद असेलच; तरीही मनात येतं. आता या काळात सैन्यं अशी कुठून समोरासमोर येणार? तरीही नूरजहाँ अन् सैगल यांचा स्वर भरतखंडात सगळीकडे एकाच प्रकारे हृदयांची कंपनं भारित करील, हे तर आपल्याला पटतं. विश्वचषकाच्या एका अंतिम सामन्यात एकदा भारताचा विजय झाला, तेव्हा पाकिस्तानचा कप्तान वकार युनूस एकटाच उमदेपणानं पुढं आला. त्याने सगळ्या भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन केलं. मला वाटलं, विजयाच्या आनंदाच्या अत्युच्च क्षणी भावाकुल होऊन सचिन तेंडुलकर म्हणेल, आम्ही विजयी झालो, त्याचा आनंद आहेच. पण पाकिस्तान पराभूत झाला याचं दु:खही आहे. दुनियेतले बाकी खेळाडू आमचे मित्र आहेत. पण पाकिस्तानी आमचे भाऊ आहेत.
खरंच काय हरकत आहे? मुळात त्यात चुकीचं तर काहीच नाही. पण सचिन तेंडुलकर समजा असं म्हणाला, तर त्याचा फार मोठा प्रभाव सगळ्यांवर पडेल, पडला असता. हे इतकं सोपं नाही हे मला कळतं. पण हे असं होणं फार आवश्यक आहे हेही.
शेवटी राज्यकर्ते राजकारण करत असतात. ते त्यांचे अन् त्यांच्या वर्गाचे हितसंबंध पाहणार. पण लोकांनी आपला स्वर व्यक्त का करू नये? निदान आपण जर लोकशाहीवादी देश असू (निदान अजून तरी आहोत असं म्हणायला जागा आहे) तर आपण आपलं म्हणणं ओरडून का सांगू नये?
नेपाळच्या प्रजाजनांसाठी आपण आपल्या सरहद्दी खुल्या केल्यात. समजा बांगलादेश, पाकिस्तानसाठीही खुल्या केल्या तर? काय होईल? त्या खुल्या नसतानाही सारं होतच आहे तर खुलं करून असा किती फरक पडणार आहे? म्हणजे नुकसान असं किती होणार आहे? तुलनेने फायदे मात्र अमाप. इथं येऊन, चरितार्थ करून परत काही काळासाठी वा कायमचे जाणारे लोक आपल्या सहिष्णुतेचे दूत होऊन परत जातील. कुणी म्हणेल, आपणच का हे करायचं? बांगलादेश, पाकिस्तान यांनी ते करावं. ठीक आहे करावं. पण आपली जबाबदारी आधी. सगळ्या दृष्टींनी आपण थोरले. आपणच पुढाकार घेतला पाहिजे. सगळ्या भरतखंडाचा, त्याच्यात सगळ्यांना सगळीकडं मुक्त संचार असलेला एक देश असण्याचं स्वप्न आपण का बघू नये? संरक्षण, परराष्ट्र धोरण यासाठी केंद्रसत्ता, बाकी राज्यं स्वायत्त. युरोप अशा दिशेने व्यापारी हिशेबाने निघालाच आहे ना! आपण तर त्यांच्यापेक्षा बऱ्याच अंशी एकसारखे लोक. आपण लोकांनीच इच्छाशक्ती प्रकट केली तर राज्यकर्त्यांना आपल्यापुढे झुकावंच लागेल अखेर. पाकिस्तानातल्या पंजाब्यांना वा लष्करी अधिकाऱ्यांना गेली एवढी वर्षं सत्तेची सवय झालीय, त्यात त्यांचे हितसंबंध तयार झालेत. ते सहजी जाणार नाहीत. आपल्यातल्याही एका मोठ्या वर्गाला आपल्या लोकांना एका विशिष्ट वर्चस्ववादी समाजरचनेकडे न्यायचं आहे. त्यांनाही ही भूमिका पचणार नाही. पण आपल्या मोठ्या मध्यमवर्गाचं काय? त्याने आपली विचार, कृती करण्याची परंपरा या चंगळवादाच्या झंझावातात सोडून टाकलीय; त्याचे परिणाम भीषण होणार आहेत.
गेली पंचावन्न वर्षं आपण सारखे चिरफाळत आहोत. प्रत्येक पातळीवर आपल्या सारख्या फाळण्या होताहेत. रोज रोज फाळणी व कालच्यापेक्षा आजची अधिक भीषण फाळणी हे आपलं वर्तमान आहे. हे सारं आपल्याला कुठं नेणार आहे? काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात भाई वैद्यांच्या समवेत पारनेरला होतो. कार्यक्रम संपला. माझ्यावर पितृवत प्रेम करणारे माझ्या बालमित्राचे वडील सुलतानभाई मन्यार माझ्यासाठी तिथे आले होते. त्यांची भाईंशी ओळख करून दिली. ते भाईंना म्हणाले, गावी आमची घरं अगदी शेजारी आहेत. मध्ये फक्त एक भिंत. भाई म्हणाले, पाडून टाका ती. सुलतानभाई गप्प झाले. त्यांना आणि भाईंना वेगळं वेगळं म्हणायचं होतं. मी मनात म्हणालो, भिंती नाहीतच असं ते सांगताहेत. पण आता केवढाल्या भिंती उभ्या राहिल्यात हे वृद्धापकाळी त्यांनाही दिसतं आहे. ‘सुफी संप्रदाया'वर ग्रंथ लिहिणारा माझा मित्र डॉ. अलीम वकील आमच्याच कॉलनीत राहतो. इथं तो एकटाच मुसलमान. परवा तो सांगत होता, मी नवीन घर बांधायला घेतलंय. म्हटलं, कुठं? म्हणाला, मुस्लिम मोहोल्ल्यात. मी गप्प झालो. तो म्हणाला, ‘अरे तुम्ही सगळे मित्र आहात तोवर ठीक आहे. पण उद्याचं काय? उद्या मी कुठं गेलो तर माझ्या बायकामुलांना सुरक्षित वाटावं असा माहौल कुठंय?' मी निरुत्तर झालो, काय बोलणार? हे कसले किल्ले बांधले जाताहेत? किनारपट्टींच्या गावांमध्ये केरळापासून मुंबईपर्यंत हे केवढाले मदरसे कोण बांधतंय? ही लहान कोवळी मुलं तिथं कुठून गोळा झालीयेत? कुठून पैसा येतोय? आणि गावोगावी ही इतकी मंदिरं, पूर्जाअर्चांची गर्दी, महाआरत्या? कुठून सुरू झालंय हे प्रच्छन्न प्रदर्शन? हे कसे काय एकमेकांविरुद्ध उभे ठाकलोत आपण? या वर्तमानातल्या भक्कम विद्वेषी भिंती कोणत्या इतिहासाचं पुनर्लेखन करून शतकानुशतके मागे नेल्या जात आहेत?
‘बायजा' या जानेवारी/फेब्रुवारी २००३च्या अंकात उमा चक्रवर्ती यांच्या एका लेखाचा अनुवाद छापून आलेला आहे. लेखाचं नाव, ‘स्त्रिया आणि जमातवाद'. त्यात वाक्रुन्निसा अन्सारी नावाच्या मुंबई महापालिकेच्या नगरसेविकेवर गुदरलेल्या प्रसंगाचा उल्लेख आहे. १६ मे २००० रोजी महापालिकेच्या सभागृहात तिचे कपडे उतरवून तिच्या गळ्याला फास बांधण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या अनेक नगरसेविकांनी केला. हे सर्व चाललेलं असताना मेयर, सभापती आणि सेनेचे पुढारी वाचा गिळून सारं बघत होते. अन्सारी यांच्यावर हल्ला चालला असताना, तिला नागवी करा, ती बाळासाहेबांच्या विरुद्ध फार बोलते अशा आरोळ्या नगरसेवक देत होते. हे चालू असताना मला महाभारतातील द्रौपदीची आठवण झाली, असे नंतर अन्सारीबाईंनी वार्ताहरांना सांगितले.
हे काय आहे? कोणत्या भीषण अमानुष अवस्थेला आपण पोहोचलो आहोत? लोकप्रतिनिधी या थराला जातात आणि आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही? वाक्रुन्निसा अन्सारी कोणत्या देशाची नागरिक आहे? कोणत्या सभागृहाची सदस्य आहे? ती ज्या द्रौपदीचा दाखला देते ते महाभारत कोणाचं आहे? आता आजच्या काळात कोणत्या महाभारताला आपण आमंत्रण देत आहोत? हे कोण कौरव आणि पांडव? कोणत्या युद्धासाठी एकमेकांसमोर ठाकले आहेत?
हे आपल्याला परवडणारं नाही. मुख्य म्हणजे ते फार चुकीचं आहे. हिमालयात पिढ्यान्पिढ्या साठलेलं प्राचीन बर्फ आहे. या बर्फावरून वारा वाहत येतो आणि साऱ्या भरतखंडाला एकत्र जोडून टाकतो. तिथूनच नद्या उगवतात अन् आपणा साऱ्यांच्या जगण्याच्या धमन्या होतात. सिंधु, सरस्वती, गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, इरावती या नद्यांनी केवढं नैसर्गिकरीत्या जोडून टाकलंय आपल्याला. कोण कुठून आला अन् कोणत्या धर्माचा याची फिकीर कुठंय त्यात? आणि बाबराने त्याच्या आत्मवृत्तात म्हटलंयच की जिथं आपण किमान बाराएक वर्षं राहतो तिथलेच आपण होऊन जातो. हवा, पाणी, अन्न यांचाही काही एक संस्कार मानायचा की नाही? भाऊ एकमेकांचे वैरी होतात. पण मुळात ते भाऊ आहेत हे सदासर्वकाळ विसरून कसं चालेल? एक मराठी अधिकारी बहुधा आठल्ये नाव असावं त्यांचं; त्यांनी कुठंतरी लिहिलं होतं, ते भारत-पाक युद्धात युद्धकैदी होऊन पाकिस्तानी कैदेत होते.
तिथे एकदा एक पाकिस्तानी शिपाई त्यांना म्हणाला, ‘साहेब तुमच्या अधिकाऱ्यांजवळ डोकं आहे अन् आमचे फौजी लढण्यात कोणालाही हार जाणारे नाहीत. आपण एकत्र आलो तर दुनिया जिंकू.'
हे मर्यादित सत्य. त्यापाठीची भावना सुंदर. लढाऊ अन् बुद्धिमान सगळीकडेच कोणी ना कोणी असतातच. मुख्य म्हणजे आपले एकमेकांचे शत्रू असणं अनैसर्गिक आणि कोणाला जिंकायचं तर त्यासाठी युद्ध कशाला? सहअस्तित्वाची एवढी परंपरा आहे तर युद्धाच्या गर्जना कोणाविरुद्ध? कोणावर विजय? त्यापेक्षा सानेगुरुजींचं ‘बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो' अधिक सुंदर. किंबहुना तेच सगळ्यात जास्त सुंदर. बलसागर होवो. विश्वात शोभुनी राहो बस्स. अन् हा भारत म्हणजे आपल्या स्वातंत्र्यवीरांच्या स्वप्नातला भारत. हे सारं होईल तेव्हा होईलच. त्याआधी शत्रुत्वाच्या भावनेचा निरास करण्याचं तातडीने मनावर घेतलं पाहिजे. रोजच्या फाळण्या अन् चिरफाळण्यांचा प्रतिकार केला पाहिजे.
(अनुभव, सप्टेंबर २००२ मधून साभार.)
