आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

भाषा सेतू बांधणारं ‘स्वरनाद' रिहॅबिलिटेशन सेंटर

  • वृषाली जोगळेकर
  • 08.10.25
  • वाचनवेळ 7 मि.
swarnaad

ओम बाबर, ‘स्वरनाद' संस्थेचा एक माजी विद्यार्थी. ‘स्वरनाद'मधल्या सगळ्या शिक्षिका आणि कर्मचारी तसंच अधिकारी वर्ग यांच्या मार्गदर्शनामुळे, आपलेपणामुळे तो कॉम्प्युटर इंजिनियरिंग पूर्ण करू शकला. पुढे त्याचं चांगलं करियर झालं. ‘स्वरनाद'मध्ये आज शिकत असलेल्या मुलांना तो संदेश देतो, की ‘स्वरनाद'चा आधार घेऊन आपल्या पंखांना बळ द्या आणि उंच आकाशात भरारी घ्या.

श्रद्धा शिळीमकर हिने ‘स्वरनाद'पासून सुरुवात करून पुढे वाणिज्य शाखेतली पदवी घेतली. त्याचबरोबर तिने भरतनाट्यमच्या परीक्षा दिल्या आहेत, कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. तिने टीचर्स ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि आता ‘स्वरनाद'बरोबर ती कामही करत आहे.

ऋषिकेश पाटील ‘स्वरनाद'मध्ये आला तेव्हा त्याच्या भविष्याबद्दल त्याच्या पालकांसमोर अनेक प्रश्न होते. पण पुढे त्याने एमकॉम केलं. आता तो एका कंपनीत नोकरी करतो. त्याबरोबरच तो आपला ट्रेकिंगचा छंद जोपासत आहे. त्याने बाइकवरून पुणे ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटरचा प्रवासही केला आहे.

थोड्याफार फरकाने अशा अनेक यशोगाथा ‘स्वरनाद'मध्ये तयार झाल्या आहेत. हे सारं वाचल्यावर ‘स्वरनाद' हे नेमकं काय आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

swarnaad

ऐकू येत नाही, म्हणून बोलता येत नाही, अशा मुलांना बोलकं करण्याचं काम ‘स्वरनाद'मध्ये होतं. त्या कामाच्या मुळाशी आहे ‘कॉक्लिआ' ही संस्था.

डॉ. अविनाश वाचासुंदर आणि रक्षा देशपांडे या दोघांनी १९९८ साली चिंचवडमध्ये ‘कॉक्लिआ' संस्था सुरू केली. डॉ. वाचासुंदर हे नाक-कान-घसा तज्ज्ञ आहेत. कर्णबधीरता हा दोष जर वयाच्या ० ते ६ वर्षांच्या दरम्यान लक्षात आला तर त्यावर वेळीच उपचार करणं शक्य होतं. तसंच ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही, हा पुढच्या काळातला मोठा धोका टाळता येतो. त्यासाठी कानाला मशिन लावणं आणि वैद्यकीय उपचार करणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच पुढे त्या मुलाला समजेल अशा पद्धतीने त्याला नवनवीन गोष्टी शिकवत राहणं हेदेखील आवश्यक आहे, कर्णबधीर मुलांना कसं शिकवायचं याचं प्रशिक्षण रक्षा देशपांडे यांनी घेतलेलं होतं. मुख्य म्हणजे प्रत्येक कर्णबधीर मूल बोललं पाहिजे, ही तळमळ या दोघांनाही सुरुवातीपासूनच होती. त्यातूनच ‘कॉक्लिआ पुणे फॉर हिअरिंग अँड स्पीच' ही संस्था सुरू झाली. तसंच त्यांनी काही दिवसांतच ठिकठिकाणी वाचा-भाषा केंद्रं सुरू केली. या केंद्रांचं ‘स्वरनाद' असं नामकरण झालं.

अर्थात सुरुवातीचा संस्थेचा प्रवास सोपा नव्हता. रक्षा देशपांडे यांनी चिंचवड आणि परिसरातल्या अनेक वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन पालकांशी संवाद साधला. कर्णबधीरत्व हे छुपं व्यंग आहे. ते दिसून येत नाही. अशा स्वरूपाचं व्यंग आपल्या मुलात आहे हे स्वीकारायलाच अनेक पालक तयार होत नाहीत. त्यांना पालक म्हणून तो एक प्रकारचा पराभव वाटतो. आपलं बाळ आवाजाला प्रतिसाद देत नसेल, शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करत नसेल तर वेळीच त्याला डॉक्टरांकडे नेण्याबद्दल सांगणं हे रक्षा यांचं पहिलं काम होतं, आणि ते सोपं नव्हतं. कधी कधी पालक आपल्या बाळांमधलं असं व्यंग ओळखतात, पण घरच्या ज्येष्ठांचा उपचारांना अप्रत्यक्ष विरोध असतो. उशिरा बोलायला लागलेल्यांची घरातली उदाहरणं दिली जातात. त्यातून अनेकदा बाळाचे पालक जागरूक असूनही डॉक्टरकडे जाण्यापासून परावृत्त होऊ शकतात.

swarnaad

शिवाय आपल्याकडे सरकारी दवाखान्यांमध्ये कर्णबधीरत्वाची चाचणी करणारी ‘बेरा टेस्ट' उपलब्ध नाही. खासगी दवाखान्यात या टेस्टसाठी थोडे जास्त पैसे घेतले जातात. त्यामुळे उपचारांचा खर्च परवडणार नाही म्हणून टाळाटाळ केली जाते. अशा वेगवेगळ्या कारणांनी कर्णबधीरपणाकडे वेळीच लक्ष पुरवलं जात नाही.

रक्षाताई वाड्या-वस्त्यांमध्ये जात असत तेव्हा उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचं आश्वासनही देत असत. अशी जनजागृती करण्यासाठी त्या हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करत. तिथे जमलेल्या महिलांशी याविषयी बोलत.

कर्णबधीर मुलांवर उपचार करताना बेरा टेस्ट, हिअरिंग एड लावणं, त्याने फरक पडणार नसेल तर इम्ल्पांट, या गोष्टी गरजेच्या असतात. हे सगळं करूनही नंतर स्पीच थेरपी दिली नाही तर उपयोग होत नाही. फ्रॅक्चर झाल्यावर ऑपरेशन करणं जसं महत्त्वाचं तितकीच फिजिओथेरपी महत्त्वाची असते, तसंच हे आहे. शिवाय हिअरिंग एड किंवा इम्प्लांट यशस्वी होण्यासाठी थेरपी सातत्याने द्यावी लागते. त्यासाठी घरातल्या एका व्यक्तीला पूर्ण वेळ देणं आवश्यक असतं, किमान ते मूल सहा वर्षांचं होईपर्यंत तरी.

रक्षाताईंनी जमेल तो खटाटोप करून यासंबंधी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. मग ‘स्वरनाद'मध्ये हळूहळू मुलं यायला लागली. या मुलांसाठी केंद्रात स्पीच थेरपीबरोबरच आणखी काही थेरपीज आणि पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याची सोय करणं आवश्यक होतं. पूर्व प्राथमिक शिक्षण नीट झालं तरच ही मुलं पुढे सर्वसामान्य मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेऊ शकतात. पण त्यासाठी आणखी काही प्रशिक्षित शिक्षिका मिळणं आवश्यक होतं. मग रक्षाताईंनी सुरुवातीला स्पीच थेरपी दिलेल्या मुलांच्या आयांना विनंती केली. अनेक मुलांच्या आयांनी ‘डिप्लोमा इन डेफ चाइल्ड एज्युकेशन'चा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि त्या ‘स्वरनाद'बरोबर काम करायला लागल्या. संपूर्ण भारतात हा अभ्यासक्रम चारच ठिकाणी शिकवला जातो. महाराष्ट्रात ‘स्वरनाद'मध्ये तो शिकवला जातो. ‘स्वरनाद'ला पहिल्या बॅचमध्ये १०-११ शिक्षक मिळाले. त्यातूनच सुरुवातीला पुण्यात शिवाजीनगरला त्यांनी या मुलांसाठी प्री-प्रायमरी स्कूल सुरू केलं.

swarnaad

चिंचवड आणि परिसरातून शिवाजीनगरला मुलांना आणायचं आणि पुन्हा घरी सोडायचं याची जबाबदारी स्वतः डॉक्टर आणि रक्षाताईंनी घेतली. मुलांची रोजची ने-आण करण्यासाठी दोघांनी आपापल्या गाड्या वापरायला सुरुवात केली. टाटा मोटर्सच्या एका अधिकाऱ्यांनी हे एकदा बघितलं आणि त्यांना टाटा मोटर्सकडून एक मिनीबस दिली. त्यानंतरही जशी सेंटर्स वाढत गेली तशी प्रत्येक सेंटरसाठी टाटा मोटर्सने गाडीची व्यवस्था केली. २०१९मध्ये पुणे महानगरपालिकेने कोथरूडमध्ये कर्णबधीर बालकांच्या पुनर्वसनासाठी जागा दिली. या जागेत वाचा-भाषा प्रशिक्षणाबरोबरच मानसशास्त्रीय मूल्यांकन केलं जातं, ऑक्युपेशनल थेरपीज दिल्या जातात आणि पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम देखील शिकवला जातो, तसंच पालकांनाही मार्गदर्शन केलं जातं. पुणे आणि परिसरातील कर्णबधीर बालकांना हे केंद्र खूपच सोयीचं झालेलं आहे.

पुण्याबाहेरील पालकांना आपल्या कर्णबधीर मुलांच्या उपचारांसाठी आणि वाचा-भाषा प्रशिक्षणासाठी काही महिने पुण्यात येऊन राहणं बऱ्याचदा परवडत नाही. अशा मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी उरवडे इथे २०२२मध्ये ‘स्वरनाद'चं निवासी केंद्र सुरू केलेलं आहे. ० ते ६ वर्षं या वयोगटातल्या कर्णबधीर मुलाला घेऊन त्याची आई तिथे राहू शकते. प्रशिक्षण पूर्ण झालं की ते आपल्या गावी परत जाऊ शकतात आणि ते मूल तिथल्या शाळेत पुढे प्रवेश घेऊ शकतं. या केंद्रात सध्या २०-२५ मुलं शिकत आहेत.

‘कॉक्लिआ' आणि ‘स्वरनाद'ला समाजातील काही दानशूर व्यक्ती आणि कंपन्यांचे सीएसआर फंड्स यांचा मोठा आधार मिळत आहे. कर्णबधीरपणाच्या जनजागृतीपासून ते यावरील संशोधनापर्यंत सगळ्या गोष्टींवर ‘कॉक्लिआ'त सातत्याने काम सुरू असतं.

एक विद्यार्थी-एक शिक्षिका अशी सुरुवात झालेल्या संस्थेची आज बारा ठिकाणी वाचा-भाषा केंद्रं आहेत, तर पूर्व प्राथमिक शाळेची सोय असलेली ‘स्वरनाद'ची दोन केंद्रं आहेत. ‘स्वरनाद'च्या सगळ्या शाखांमध्ये आज शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मिळून ८०च्या घरात स्टाफ आहे. सर्व शाखा मिळून १५०च्या आसपास विद्यार्थी शिकत आहेत.

swarnaad

‘स्वरनाद'मध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडून नाममात्र फी आकारली जाते. प्रत्येक वर्गात सात ते आठ मुलांमागे दोन शिक्षिका असतात. त्यात शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या थेरपीज दिल्या जातात. ‘स्वरनाद' मुलांच्या जाण्या-येण्याची सोय करते. देणगीदारांच्या माध्यमातून बाकीचे खर्च भागवले जातात. फक्त आईने वेळ द्यावा एवढीच अपेक्षा असते. आईला मुलाच्या वर्गातच बसवलं जातं. त्यामुळे आपल्या मुलाची प्रगती आईला नेमकेपणाने लक्षात येते. घरी त्याचा किती आणि कोणता सराव करून घेणं गरजेचं आहे हे लक्षात येतं.

‘स्वरनाद'मध्ये येणारं प्रत्येक मूल वेगळं असतं. कर्णबधीरपणा हा एक समान धागा असला तरी प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती वेगळी असते. बऱ्याच मुलांचा आत्मविश्वास हरवलेला असतो. अशा परिस्थितीतही इथे प्राथमिक शिक्षण घेतलेले शंभरहून अधिक विद्यार्थी सर्वसामान्य शाळेत पुढील शिक्षण घेत आहेत, उत्तम गुणांनी पास होत आहेत. शिक्षणाच्या बरोबरीने चित्रकला, नृत्यकला अशा विविध कलांमध्ये आणि खेळांमध्येही ते चमकदार कामगिरी करत आहेत. सुरुवातीचे काही विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरी-व्यवसायात गुंतले आहेत. त्यात काहीजण इंजिनियर झालेले आहेत, काहीजण द्विपदवीधर झालेले आहेत. यामध्ये त्या मुलाची मेहनत तर महत्त्वाची आहेच, पण ‘स्वरनाद'मध्ये त्याला मिळालेलं शिक्षण, वेगवेगळ्या थेरपीज, त्याच्या पालकांचं झालेलं प्रशिक्षण आणि त्यातून त्यांनी त्याला योग्य ते संस्कार देणं, अशा साऱ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

घरात छोट्या बाळाचं आगमन होतं तेव्हा सारं घर आनंदाने न्हाऊन निघतं. त्याच्या बाळलीला बघणं अत्यंत सुखावह असतं. बाळाने आई, बाबा असे शब्द उच्चारायला सुरुवात केली की त्याचे आई-बाबा धन्य होतात. मात्र, ही एरवी अगदी सहज होणारी गोष्ट जेव्हा काही बाळांच्या बाबतीत घडत नाही तेव्हा आई-वडिलांनी वेळीच जागरूक होऊन बाळाला डॉक्टरांकडे नेणं आवश्यक आहे. अशा बाळांच्या आणि त्याच्या आई-ुबाबांच्या मागे ‘कॉक्लिआ' आणि ‘स्वरनाद' खंबीरपणे उभे राहतात. सुरुवातीला सांगितलेल्या यशकथा त्यातूनच तयार होतात.

(अनुभव, सप्टेंबर २०२५च्या अंकातून साभार)

वृषाली जोगळेकर | joglekarvrushali.unique@gmail.com

वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results