आम्ही कोण?
ले 

हरितक्रांतीची पितृसंस्था आर्थिक संकटात

  • आशीष वेले, प्रतीक शर्मा
  • 29.07.25
  • वाचनवेळ 4 मि.
cimmyt international maize and wheat improvement center

मेक्सिकोतलं आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) ही अनेक विकसनशील देशांच्या अन्नसुरक्षेसाठी प्रयत्न करणारी जगातली महत्त्वाची कृषिसंशोधनसंस्था. १९६६ मध्ये या संस्थेची स्थापना झाली. जगभरातील कृषीवैज्ञानिक सुरुवातीपासून CIMMYT संस्थेशी जोडले गेलेले आहेत. त्यांतलं एक प्रमुख नाव म्हणजे जागतिक हरित क्रांतीचे जनक मानले जाणारे कृषीतज्ज्ञ नॉर्मन बॉरलॉग. बॉरलॉग यांच्या कृषीसंशोधनकार्यामुळे भारतासह जगभरातील लक्षावधी लोक उपासमारीपासून बचावले.

आजवर या संस्थेला USAID कडून आर्थिक सहकार्य मिळत आलं आहे. पण आता अमेरिकी सरकारकडून USAID ला मिळणारी मदत आटल्याने USAID ने CIMMYT ची देणगी बंद केली आहे. त्यामुळे CIMMYT आता भारतासारख्या राष्ट्रांकडून वाढीव आर्थिक योगदान मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे.

या घडामोडींची दखल आपण का घ्यायला हवी?

भारतात डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना आपण हरितक्रांतीचे जनक म्हणून ओळखतो. त्यांनी बॉरलॉग यांच्या मदतीनेच देशात ही हरितक्रांती घडवून आणली. डॉ. स्वामीनाथन आणि बॉरलॉग यांनी CIMMYTच्या सहकार्यातून कल्याण सोना (१९६७), सोनालिका (१९६८) आणि नंतर पीबीडब्ल्यू ३४३ (१९९५) हे गव्हाचं वाण तयार केलं गेलं आणि पुढे इतिहास घडला.

१९७० मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाल्यावर नॉर्मन बॉरलॉग आपल्या भाषणात कृतज्ञतापूर्वक बोलले होते- ‘हरितक्रांती हा एक सामूहिक प्रयत्न आहे आणि तिच्या नेत्रदीपक विकासाचे बरेचसे श्रेय भारतीय अधिकारी, संघटना, शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांना दिले पाहिजे. परंतु, डॉ. स्वामीनाथन, मेक्सिकन वाणांचे संभाव्य मूल्य सर्वप्रथम ओळखण्याचे श्रेय तुम्हालाच दिले पाहिजे. जर तुम्ही हे जाणले नसते, तर आशियात हरितक्रांती झालीच नसती.’

आजही जगभरात ६० दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवर CIMMYT-व्युत्पन्न जातींची लागवड केली जाते. भारतात २०१९ पासून जवळपास ५० टक्के गहू CIMMYT आणि ICAR (इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, भारतीय कृषीसंशोधन परिषद) यांच्या सहकार्याने तयार झालेल्या वाणांपासून घेतला जातो.

२०११ मध्ये CIMMYT आणि ICAR यांच्या संयुक्त उपक्रमाने 'बॉरलॉग इन्स्टिट्यूट फॉर साउथ एशिया'ची (बीआयएसए) स्थापना करण्यात आली. लुधियाना (पंजाब), जबलपूर (मध्य प्रदेश) आणि समस्तीपूर (बिहार) येथील संशोधन केंद्रंदेखील उभी राहिली. हवामान-लवचिक पिकं, पिकांची उष्णतेची सहनशीलता, नायट्रोजन-वापराची कार्यक्षमता, रोग प्रतिकारशक्ती आणि शाश्वत शेती, अशा विविध पातळ्यांवर जागतिक दर्जाचं काम चालू केलं गेलं.

भारत आणि CIMMYT

शेती उत्पादनात शाश्वत वाढ होण्यासाठी बियाणं हा मूलभूत उत्पादन वाढवणारा घटक आहे. गेल्या चार दशकांपासून भारतीय शेतीच्या प्रगतीत बियाणं महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. १९४३ मध्ये पूर्व भारतात 'बंगाल दुष्काळ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या व गंभीर अन्न-आपत्तीत अंदाजे ४० लाख लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळी बियाणांच्या संशोधनाचं हे क्षेत्र फारसं विकसित झालेलं नव्हतं. १९६० पूर्वी, शेतकरी स्वतःच्या शेतात पिकलेल्याच बियाण्यांचा वापर शेतीसाठी करत होते, परिणामी १९६२-१९६३ मध्ये प्रमाणित बियाणं उत्पादनाखालील शेतीक्षेत्र ५०० हेक्टरपेक्षा कमी होतं. म्हणून, वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज आणि पुरवठा यातील तफावत कमी करणं महत्वाचं होतं.

हे घडवून आणलं नॉर्मन बॉरलॉग आणि डॉ स्वामीनाथन यांनी. आपल्याला स्वातंत्र मिळालं तेव्हा भारताची लोकसंख्या सुमारे ३५० दशलक्ष होती आणि एकूण धान्य उत्पादन फक्त ५१ दशलक्ष टन होतं. आज देशाची लोकसंख्या १.२ अब्जाहून अधिक आहे आणि अन्न उत्पादन २५० दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे.

भारताने २०२४ मध्ये ३२ दशलक्ष हेक्टरवर गहू लागवड केली. गव्हाच्या प्रमुख १० जातींपैकी सहा जाती CIMMYT-व्युत्पन्न आहेत, ज्या साधारण १५.३ दशलक्ष हेक्टर शेतीक्षेत्र व्यापतात.

उत्तर भारतात मार्चमध्ये वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनात नुकसान होताना दिसतं. रात्रीच्या तापमानातील एक अंश सेल्सियसची वाढही उत्पादनात सहा टक्के घट होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे उष्णता-सहनशील असणाऱ्या आणि उच्च-उत्पादन देणाऱ्या गव्हावरील CIMMYTचं संशोधन भारतीय अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.

भारत: कृषिक्षत्रातलं प्रादेशिक नेतृत्व

भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा असं म्हटलं गेलं, की अमेरिकेने भारतीय उपखंडात अन्नधान्याची मदत पाठवली नाही तर भारतीय जनता जगूच शकणार नाही. (याला इंग्रजीत ‘ship to mouth' अवस्था म्हटलं जातं.) स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेची ship to mouth अवस्था न राहता, आता देशाने अन्नाच्या स्वावलंबनापर्यंत मजल मारली आहे. हा टप्पा गाठणं आपल्या विकासासाठी मूलभूत होतं, ज्यात CIMMYT सारख्या संस्थांनी अमूल्य भूमिका बजावली आहे. म्हणून आता भारत सरकारने CIMMYTला मदत करणं अगदी सयुक्तिक ठरेल.

CIMMYT ला मोठा निधी पुरवून भारत अन्नसुरक्षेतील जागतिक संशोधन आणि विकास प्राधान्यांवर (Initiatives) प्रभाव टाकू शकतो. भारतीय कृषी अनुभवाचा वापर करून आफ्रिका आणि इतर विकसनशील प्रदेशांच्या क्षमता-निर्मितीसाठी देखील हे पाऊल उचलणं उपयुक्त ठरू शकतं.

अनेक भारतीय शास्त्रज्ञ सध्या जगभरातील CIMMYT कार्यालयांमध्ये काम करत आहेत. CIMMYTच्या जागतिक कार्यबलाच्या सुमारे १० टक्के लोक भारतीय आहेत. विद्यमान संशोधन प्लॅटफॉर्म स्वदेशाच्या हितासाठी टिकवून ठेवणं, तसंच प्रशासन आणि प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आपलं मत सुरक्षित करणं आणि प्रादेशिक व जागतिक अन्न सुरक्षा उपक्रमांना पाठिंबा देणं, या सर्व उद्दिष्टांसाठी भारताने आपला निधी मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे.

भारत सरकारने CIMMYTला पाठिंबा देण्यात पुढाकार घेतला, तर ती डॉ. स्वामीनाथन यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.

आशीष वेले, प्रतीक शर्मा | 9850822058 | ashish.wele@gmail.com

आशीष वेले हे डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्याशी निगडीत कृषिशास्त्रज्ञ आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results