आम्ही कोण?
ले 

मुळातून माणूस - इथे माणूसपणाचं कौतुक केलं जातं..!

  • योगेश जगताप
  • 29.08.25
  • वाचनवेळ 5 मि.
sarad majakur

समाजात काहीतरी उल्लेखनीय काम केलेल्या, कुठल्याही कामात योगदान देणाऱ्या, यश मिळवलेल्या किंवा एखाद्या स्पर्धेत जिंकलेल्या व्यक्तींनाच सहसा पुरस्कार मिळाल्याचं आपण पाहतो. या विचाराला छेद द्यायचा असं अभिजीत सोनावणे यांनी ठरवलं आणि आपलं काम चोखपणे आणि प्रामाणिकपणे करणाऱ्या विविध क्षेत्रातील माणसांना पुरस्कार द्यायचा असंही ठरवलं. कामातील कौशल्यासोबत त्यांच्या माणूसपणाचं कौतुक करणं हाही उद्देश असल्याने हे पुरस्कार ‘मुळातून माणूस’ या नावाने द्यायचं ठरलं.

अभिजीत सोनावणे हे ‘सारद मजकूर संस्थे’चे संस्थापक. पत्रकारिता शिक्षण घेतलेल्या अभिजीत यांनी मुख्य माध्यमांत काही वर्षं पत्रकारिता केली. पुढे त्यातून बाहेर पडून त्यांनी ‘सारद मजकूर’ ही संस्था सुरू केली. विविध प्रकारच्या कंटेंट रायटिंगची कामं सारद मजकूरमार्फत केली जातात.

हे काम एकीकडे सुरु असतानाच अभिजीत यांनी यंदा हे सामान्यातले असामान्य लोक शोधून पुरस्कार द्यायला सुरुवात केली. पुरस्कार हे वार्षिक असल्याचं आपण पाहतो पण ‘मुळातून माणूस’ हा पुरस्कार मात्र दर महिन्याला दिला जातो. आपल्या आजूबाजूला अशा धडपड्या माणसांची संख्या इतकी जास्त आहे की महिन्यातून एक पुरस्कार दिला तरी कित्येक वर्षं पुरस्कार देत राहता येतील, असं त्याचं मत.

तर ‘मुळातून माणूस’ हा पुरस्कार सुरू करताना पहिल्यांदा अभिजीत यांनी त्याच्या संपर्कात १० वर्षांहून अधिक काळ असणाऱ्या लोकांची निवड केली. या लोकांच्या कामाची आणि स्वभावाची त्यांना माहिती होतीच. तरीही त्यांनी या लोकांविषयी इतरांचा कल जाणून घेतला. संबंधित व्यक्तीचं काम, लोकांशी असलेलं वागणं, त्यांच्या चांगुलपणाचा लोकांना आलेला अनुभव हे सगळं विचारात घेतलं आणि पुरस्काराचे मानकरी ठरवले.

पुरस्कारप्रदान सोहळ्याचा जाहीर कार्यक्रम घेऊन गप्पांच्या माध्यमातून पुरस्कारप्राप्त व्यक्तीचा जीवनप्रवास उलगडून दाखवला जातो.

पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या तेजस्विनी घूंगूर्डे या गृहिणी आहेत. घरातील जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी स्वतःची ट्रेकिंगची आवड जोपासली आहे. पंधरा दिवसांतून त्या सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यांतून भटकत असतात. यासाठी त्यांनी घरची ‘चूल आणि मूल’ ही चौकट मोडली. आता त्यांच्याकडे बघून आसपासच्या मुली-महिलासुद्धा ट्रेकिंगला जाऊ लागल्या आहेत. स्वतःच्या मर्यादा ओलांडून तेजस्विनी त्यांचं जीवन जगतायत. इतर महिलांमध्येही त्या आत्मभान जागवतायत या बाबीची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली.

sarad majakur

दुसरा पुरस्कार नंदा कंधारे यांना देण्यात आला. या घरकाम करतात. मागील ४० वर्षांपेक्षा अधिक काळ त्या हे काम करतायत. पंडित भीमसेन जोशी यांच्या घरी त्यांनी बरीच वर्षं काम केलं. दररोज ४ ते ५ घरांतील काम करून त्यांनी आपल्या ३ मुलांचं संगोपन केलं. त्यांना चांगलं शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं. स्वतः अशिक्षित असतानाही नंदा ताईंनी हे काम केलं.

sarad majakur

यानंतर सत्येंद्र राठी हे पुण्यातलेच एक लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते. ते K & Q (Knowledge & Question) नावाची संस्था चालवतात. सुजाण पालकत्वाची पेरणी ते संस्थेच्या माध्यमातून करतात. वंचित समाजातील गरजू मुलांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनातून स्वतःसाठी वेळ काढून शांत बसण्याचा प्रयोग हे त्यांचे उपक्रम विशेष नोंद घेण्यासारखे आहेत.

sarad majakur

संगीता देशमुख ही तरुणी महाराष्ट्र राज्य वीज महामंडळात काम करते. गाव सोडून ती पुण्यात आली तेव्हा गावाकडे असताना लागलेली कबड्डीची आवड तिने पुण्यातही जोपासली. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वेगवगळ्या स्पर्धांत भाग घेऊन तिने स्वतःचं कर्तृत्व दाखवून दिलं. तिला महाराष्ट्र सरकारतर्फे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आलं. तिच्या धडपडीची दखल ‘सारद’ने घेतली.

sarad majakur

सचिन परब हे माध्यमांतील लोकांमध्ये बऱ्यापैकी परिचित असलेलं नाव. मुख्य माध्यमातील कामाचा दीर्घ अनुभव असलेल्या सचिन यांनी मागील काही वर्षं डिजिटल पत्रकारितेतही लक्ष घातलं. शिवाय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील संतांच्या कार्याची ओळख करून देणारा रिंगण विशेषांकही ते मागील तेरा वर्षांपासून काढतायत. गाव-खेड्यातून अनेक मुलं पत्रकारिता करण्याचं स्वप्न घेऊन पुण्या-मुंबईसारख्या शहरात येतात. त्यांना मूलभूत कौशल्य शिकवून काम मिळवून देण्यासाठी सचिन प्रयत्न करतात. परब यांच्या कामाचं कौतुकही ‘सारद’ने केलं.

sarad majakur

आणि या महिन्याचा पुरस्कार मिळाला प्रभाकरन नायर यांना. हे मागील ४५ वर्षांपासून पुण्यात टायर पंक्चर काढण्याचं काम करतात. ते मूळचे केरळचे. त्यांच्या भावाच्या ओळखीने ते पुण्यात आले. काम करताना ते ग्राहकाला फसवत नाहीत. जेवढं काम करू, तेवढ्याचेच पैसे घ्यायचे हा त्यांचा शिरस्ता. विशेष म्हणजे ते जिथे काम करतात ते पंक्चर काढण्याचं दुकान २४ तास सुरू असतं. रात्री-मध्यरात्री गाडीच्या टायरची काहीही अडचण आली, तर नायर यांना ओळखणारे शेकडो लोक त्यांना हक्काने फोन करतात.

पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीची जाहीर मुलाखत हा कौतुक सोहळ्यातील महत्वाचा भाग. उदाहरणच द्यायचं झालं तर प्रभाकरन नायर यांची मुलाखत. केरळमध्ये खायचे वांदे असताना ते कामाच्या शोधात लहान वयातच पुण्यात आले. मराठी भाषा शिकून घेतली. कामात गती मिळवली. टायर पंक्चरच्या कामात लोक कसं फसवतात याची काही उदाहरणं त्यांनी सांगितली. लोकांना फसवणं सहज शक्य असताना ते हा मार्ग अवलंबत नाहीत. ते सांगतात, "नीट काम केलं की चांगले पैसे मिळतात, लबाडी करायची वेळच येत नाही."

अभिजीत यांनी पुण्यात सुरू केलेल्या या उपक्रमापासून प्रेरणा घेत असाच उपक्रम आपापल्या तालुक्यात, जिल्ह्यात राबवण्याचा मानसही अनेक जणांनी बोलून दाखवला आहे.

संपर्क - अभिजीत सोनावणे - ८८८८८९५२२६

Key highlights- Abhijit Sonawane's 'Mulatun Manus' award celebrates everyday heroes in Pune, Maharashtra!

This monthly award recognizes ordinary individuals from various fields for their hard work and kindness. Recipients, including homemakers, domestic workers, social workers, and small business owners, are honored for their unique contributions that make our community brighter.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

renuka aundhekar02.09.25
जसा चष्मा असतो तसे जग दिसते.. अभिजीत ला मुळातून माणूस ही कल्पना सुचली असावी कारण त्याला व्यक्तितील माणूसपण स्पर्शून गेले असावे..भावले असावे..कित्येक वेळा आपल्यालाही समोरच्यातील चांगले गुण कळतात पण कधी कधी ते बोलून दाखवले जात नाही..अभिजित ने बोलून न दाखवता कृतीतून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे गुण अधोरेखित केले/ करतोय..ह्यासाठी त्यांचे खुप कौतुक..आणि खुप सगळ्या शुभेच्छा..नवनवीन प्रयोगांसाठी..

Amruta30.08.25
खूप सुंदर, आणि उत्तम लेख.

Amruta30.08.25
खूप सुंदर, आणि उत्तम लेख.

आलोक शेवडे ,बुलढाणा 30.08.25
अभिजित हाच खरा एक मुळातून गोड माणूस आहे.. माझ्या शब्दात सांगायचं तर माणसातला शब्दकिडा.. नेमकी शब्दयोजना ही त्याची खासियत..'सारद' बद्दल देखील त्याची भाषा समृद्धी दिसते.. मी विचारलं 'शारद' का? तो म्हणाला नाही,सा र द.. माणसाच्या मनातील भावनांचा सार शब्दबद्ध करणारी सारद संस्था.. सामान्य माणसाचं प्रचंड कौतुक असणाऱ्या या सालस माणसाला सलाम.. खूप खूप शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन मित्रा..

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results