आयआयटी मुंबईच्या 'आपले प्रश्न आपले विज्ञान' या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रभरातील धडपड्या मुलांसाठी MKCL च्या सहाय्याने प्रा राम ताकवले फेलोशिप सुरू करण्यात आली. कॉलेज जीवनातच मुलांना आपापल्या परिसरातील प्रश्न समजावेत, त्या प्रश्नांचा अभ्यास त्यांनी करावा आणि त्या प्रश्नांवर उपायही शोधून काढावेत हा यामागचा उद्देश आहे. यंदा पुणे, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील एकूण ३० विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्यात आली. हे विद्यार्थी आर्टस्, कॉमर्स, सायन्स अशा तिन्ही शाखांचे आहेत. बहुतांश विद्यार्थी हे पदवी शिक्षण घेणारे तर काही पदव्युत्तर शिक्षण घेणारे आहेत. त्यांनी निवडलेल्या विषयावर काम करण्यासाठी त्यांना दहा हजार रुपये रोख दिले गेले. शिवाय आवश्यक तिथं मार्गदर्शनही दिलं गेलं.
एमकेसीएल (Maharashtra Knowledge Corporation Limited) ने IIT Bombay च्या ‘आपले प्रश्न आपले विज्ञान' च्या विद्यार्थीपूरक उपक्रमाला पाठिंबा देत प्रा राम ताकवले फेलोशिप सुरु करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. या फेलोशिपला एमकेसीएलने आर्थिक सहाय्य दिले आहे.
फेलोशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील दोन ते तीन विषय काढण्यास सांगितले गेले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शेती, विज्ञान, व्यसन, मोबाईलचा अतिवापर, रस्ते, स्वच्छतागृह, मायक्रोफायनान्स, आरोग्य, बेरोजगारी, लग्नसंस्था अशा वेगवेगळ्या विषयांची निवड केली. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण अशा तिन्ही भागातील विषय मुलांनी निवडले. नंतर या विद्यार्थ्यांचं पुण्यात दोन दिवसीय अभ्यास शिबीर घेण्यात आलं. लोकांना काय प्रश्न विचारायचे, त्यांच्याकडून मिळालेली माहिती कशी नोंदवायची आणि माहितीचं विश्लेषण कसं करायचं याविषयी या शिबिरात मार्गदर्शन करण्यात आलं. त्यानुसार आपापल्या भागात जाऊन विद्यार्थ्यांनी लोकांशी संवाद साधला आणि माहिती मिळवली.
दीड महिन्यानंतर मुलांचा प्रकल्प पूर्ण झाला. त्यानंतर पुण्यातील एसएम जोशी फाउंडेशनच्या आवारात जूनच्या अखेरीस विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं प्रदर्शन भरवण्यात आलं. मुलांनी आपापले विषय पोस्टर प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून लोकांसमोर सादर केले.
या अभ्यासातून अनेक प्रश्न पुढे आले. साईकुमार सोळंके या तरुणाने पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. त्याला समजलेल्या माहितीनुसार एका परीक्षार्थी विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च एक ते सव्वा लाखाच्या घरात आहे. हा विद्यार्थी किमान साडेतीन ते चार वर्षं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात राहतो. ही तयारी करणाऱ्या बहुतांश मुलांकडे स्पर्धा परीक्षा वगळता करिअरचा कसलाही बॅकअप नसतो. एकूण विद्यार्थ्यांपैकी यश मिळवण्याचं प्रमाण फक्त ६ टक्के आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांकडे नोकरी मिळवता येईल अशी आवश्यक कौशल्य नसल्याने या विद्यार्थ्यांना नंतर बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा काही गोष्टी साईकुमारने आकडेवारीसहित उलगडून दाखवल्या आहेत.
नंदुरबारच्या नर्मदा नगर येथील देवांगा वसावे या मुलीने गावातल्या मुलांमध्ये ऑनलाईन गेमिंगची परिस्थिती काय आहे, फ्री फायर आणि ड्रीम ११, रमीसारख्या खेळांमध्ये त्यांचा साधारण किती वेळ जातो, किती पैसे खर्च होतात याचा अभ्यास केला. या अभ्यासात सहभागी झालेले ४७ विद्यार्थी दिवसाला सरासरी दीड तास गेम खेळतात, हे त्याच्या लक्षात आलं. या मुलांना मोबाईल रिचार्जसाठी महिन्याला साधारण ३०० रुपये खर्च येतो. ड्रीम ११ गेम खेळणारी मुलं २० रुपयांपासून ते ७००० रुपयांपर्यंतचा खर्च बेटींगवर करतात, हे वास्तव त्याच्या अभ्यासातून समोर आलं.
साईकुमार आणि देवांगा यांच्याप्रमाणेच इतर मुलांनी घरकाम करणाऱ्या स्त्रिया, छोट्या दुकानात विक्रीस असणाऱ्या वस्तू, विदर्भातील बैल बाजार, ई-कॉमर्स वेबसाईटवरून वस्तू मागवणारे लोक, घरच्या रोजच्या वापरातले केमिकल्स आणि तो कमी करण्याचे पर्याय, भंडारा आणि गोंदिया येथील बसस्थानकावरील महिलांचे स्वच्छतागृह अशा अनेक विषयांचे अभ्यास केले. त्यातून आपल्या समाजात काय सुरु आहे याचं प्रतिबिंब पुढे आलं.
स्वच्छतागृहांचा अभ्यास केलेली दिव्या नवखरे फेलोशिपचा तिचा अनुभव सांगते. "बसस्थानकावरील महिलांसाठीची स्वच्छतागृहं खराब आहेत, वापरण्यालायक नाहीत हे मी वर्षानुवर्ष बघत होते. पण त्याविषयी मला करता काहीच येत नव्हतं. फेलोशिपच्या निमित्ताने मी ही अडचण नीट समजून घेतली. भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी जी स्थिती आहे ती राज्यात अनेक ठिकाणी असणार हे या अभ्यासामुळे समजायला मदत होईल. हा अभ्यास प्रशासनासमोर गेला तर स्वच्छतागृह देखभाल आणि दुरुस्तीसाठी काही पावलं उचलली जातील. मला या कामामुळे आत्मविश्वास मिळाला. स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः काम करायला हवं ही जाणीव मला फेलोशिपने दिली."
हे विद्यार्थी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतून आले आहेत. त्यातील कुणी दुर्गम आदिवासी पाड्यातील आहेत तर कुणी ग्रामीण भागातून तर कुणी शहरी वस्त्यांमधून आलेले आहेत. काहीजण त्यांच्या कुटुंबातून शिकणारे पहिलेच आहेत. अनेकांना या फेलोशिपमुळे पहिल्यांदाच आपला जिल्हा सोडून बाहेर जाण्याची संधी मिळाली. इतर मुलांसोबत काम करताना आपण कुठेही कमी नाही हा आत्मविश्वासही त्यांना या फेलोशिपच्या निमित्ताने मिळाला.
या उपक्रमाचं विविध क्षेत्रातील अभ्यासक मंडळींनीही चांगलं स्वागत केलं आहे. उदाहरणार्थ ‘क्वेस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात रचनात्मक काम करणारे निलेश निमकर म्हणतात, "यातील प्रत्येक अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांचं कुतूहल, ग्राउंड लेव्हलवर काम करण्याचा अनुभव आणि विचारपूर्वक काम करण्याची क्षमता दिसून आली. त्यांच्यात असलेली विषयाची स्पष्टता, आत्मविश्वास, समाज आणि पर्यावरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाधानकारक आहे. आपण जे शिक्षण घेतो ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी हा उपक्रम विद्यार्थ्यांना बळ देतोय."
फेलोशिप उपक्रमाचा हा अनुभव पाहता पुढील काळात ही फेलोशिप सुरु ठेवून विद्यार्थ्यांमधील शोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा संबंधितांचा विचार आहे. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचला तर स्थानिक प्रश्न समजून घेऊन त्यावर काम करणं सोपं जाईल, हे या फेलोशिपच्या निमित्ताने लक्षात येतंय. कॉलेजवयीन विद्यार्थी आणि धडपड्या तरुणांच्या अशा उपक्रमांना लोकांमधूनही पाठबळ मिळेल, अशीही त्यांची अपेक्षा आहे.
