आम्ही कोण?
ले 

"माझ्यासारखा श्रीमंत घरातला एकुलता मुलगा म्हणजे वाया जाण्यासाठी योग्य सामुग्री"

  • शशी थरूर
  • 14.11.25
  • वाचनवेळ 22 मि.
nehru birthday

जवाहरलाल नेहरूंचे पाय काही पाळण्यात दिसले नव्हते. पुढे जाऊन हा मुलगा थोर बनणार आहे याची लक्षणं तशी बरीच उशिराने दिसू लागली. शाळेत त्यांची ओळख एक उदासीन मुलगा अशीच होती. मोतीलाल यांची वकिली उत्तम चालू असल्याने घरात सुबत्ता होती आणि जवाहरलालांचं घरात कोण कोडकौतुक होत असे! पूर्वी आपल्याकडे पुरुषांचं आपल्या बायकांकडे म्हणावं तसं लक्ष नसायचं. त्यामुळे या बायका प्रेमाची सगळी भूक आपल्या मुलांवर वात्सल्याचा वर्षाव करून भरून काढायच्या. जवाहरलाल यांचं घरही त्याला अपवाद नव्हतं. त्यांच्या आईने जवाहरलाल यांच्यावर मायेची अशी पखरण केली होती की बस! पुढे जवाहरलालांनी आपल्या आत्मचरित्रात एखाद्या गुन्ह्याची कबुली दिल्याप्रमाणे लिहिलं, ‘श्रीमंत घरातला एकुलता एक मुलगा म्हणजे वाया जाण्यासाठी अगदी योग्य सामग्री! विशेषतः आपल्या भारतात तर असंच म्हणावं लागेल. त्यातून तो माझ्यासारखा, जन्मल्यावर पुढची अकरा वर्षं एकुलता एकच असेल तर मग विचारायलाच नको. तो बिघडणार नाही अशी आशा ठेवणंही कठीण.'

लहानपणी जवाहरलाल यांच्या मनावर संस्कार करणारे घरातच दोन गट होते. अर्थात या दोन गटांमध्ये काही विरोधाभास आहे असं मात्र जवाहरलाल यांना कधीच वाटलं नाही. एक गट होता त्यांची आई आणि घरातल्या इतर बायकांचा. हा गट म्हणजे पारंपरिक हिंदू संस्कारांचा अर्क होता, तर दुसरीकडे होते त्यांचे आधुनिक आणि निधर्मी वडील मोतीलाल. घरातला स्त्रीवृंद (विशेषतः स्वरूपराणी यांची विधवा बहीण राजवती) जवाहरलाल यांना पुराणातल्या गोष्टी सांगत, त्यांना नियमितपणे देवळांमध्ये घेऊन जात अन्‌‍ गंगेच्या पवित्र पाण्याने स्नानही घालत. याउलट मोतीलाल. त्यांनी कधी हिंदू धर्म नाकारला नाही; पण तरीही स्वतःला कर्मकांडांपासून जाणीवपूर्वक लांब ठेवलं. मोतीलाल परदेशवारी करून आले त्या वेळी काळ्या पाण्याचा समुद्र पार केल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून त्यांनी शुद्धीकरण करून घेतलं पाहिजे, असं अलाहाबादमधल्या कर्मठ ब्राह्मणांचं म्हणणं होतं; पण मोतीलाल यांनी त्याला ठाम नकार दिला. या ब्राह्मणांनी त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकल्यावरही मोतीलाल तडजोड करायला तयार झाले नाहीत. त्यामुळे बराच काळ त्यांच्या कुटुंबावरचा हा ‘कलंक' कायम होता. पुढे मोतीलाल यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर एवढं यश मिळवलं की हे वाळीत टाकणं निरर्थक बनून गेलं.

नेहरू म्हणजे काश्मिरी पंडित. सन १७०० पासून या समाजातील काही मंडळींनी उत्तर आणि मध्य भारतात स्थलांतर करायला सुरुवात केली होती. १६व्या व १७व्या शतकात काश्मिरी लोकांनी मोठ्या प्रमाणावर इस्लाम धर्म स्वीकारला होता, पण बहुसंख्य काश्मिरी मुस्लिम उदारमतवादी सुफी पंथाचं अनुसरण करत होते. हिंदूंसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरामागे धर्मांतराची भीती नव्हती. त्यांच्याकडे शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य असल्यामुळे चांगल्या संधीच्या शोधात ते बाहेर पडले होते. भारतातल्या अन्य समाजांप्रमाणेच काश्मिरी पंडितही एक समाज म्हणून घट्ट होता. त्यांचं मूळ, त्यांचं सामाजिक उच्च स्थान, त्यांचं रंग-रूप, त्यांची सीमित संख्या या सगळ्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत याची त्यांना जाणीव होती; तरीही त्यांचा दृष्टिकोन भारतीय होता आणि त्याचा त्यांना अभिमान होता. सरतेशेवटी ते त्यांची मूळ घरं मागे ठेवून आले होते. काश्मीर ही त्यांची मातृभूमी होती.

ज्या काश्मीरमध्ये त्यांची भरभराट झाली तिथे मुस्लिमांची संख्या त्यांच्यापेक्षा तेरा पट अधिक होती. तिथे जातीय तंट्यांचा इतिहास नव्हता. काश्मीरमधील ब्राह्मणेतर जातींनी आणि बहुसंख्य ब्राह्मणांनीसुद्धा इस्लाम धर्म स्वीकारला असल्यामुळे मुस्लिम संस्कृतीशी, फारसी भाषेशी आणि अगदी मांसाहाराशीसुद्धा त्यांनी जुळवून घेतलं होतं. हा समाज स्वत:ला सुरक्षित मानत होता आणि इतरांशी सामंजस्य ठेवून होता. साहजिकच या समाजाचा कल विशाल बंधुभावाकडे होता. म्हणूनच मोतीलाल नेहरूंच्या घरातला कारभारी मुस्लिम असणं हा अपघात नव्हता. त्यांचं नाव होतं मुन्शी मुबारक अली. जवाहरलालना त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलं आहे, ‘त्यांच्या शुभ्र दाढीमुळे मला ते खूप प्राचीन, ज्ञानी वृद्ध भासत असत. मी त्यांना बिलगून बसत असे आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टी डोळे विस्फारून ऐकत असे.'

नेहरू परिवाराचं मूळ आडनाव होतं कौल. जवाहरलाल नेहरूंचे पूर्वज राज कौल अठराव्या शतकात दिल्लीत स्थायिक झाले, त्या वेळी दिल्लीत मोगलांची सत्ता होती. बहुधा त्या काळात दिल्लीत आणखी काही कौल प्रस्थापित असल्यामुळे त्यांनी कौल-नेहरू असं जोड आडनाव घेतलं. ‘नेहरू'चा संदर्भ ‘नहर' या उर्दू शब्दाशी जोडला असावा, असं म्हटलं जातं. नहर म्हणजे कालवा. त्यांचं वास्तव्य कालव्याच्या कडेला असल्यामुळे हे आडनाव पडलं असावं असा कयास आहे. (हे आडनाव काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील नारू या गावावरूनही आलं असण्याची शक्यता आहे, पण हे कधीच खात्रीपूर्वक सिद्ध झालेलं नाही.) एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात कौल-नेहरूंनी आग्र्यात मुक्काम हलवला. तिथे हे जोडनाव पुसलं जाऊन केवळ ‘नेहरू' राहिलं. अलाहाबादमध्ये वकिली करताना नेहरू या आडनावानेच मोतीलालांनी प्रसिद्धी मिळवली.

nehru birthday

एक यशस्वी वकील म्हणून मोतीलालांनी नाव आणि पैसा तर कमावलाच, पण त्याबरोबरच ब्रिटिश राहणीही अंगीकारली. शहरातल्या इंग्रजांची वस्ती असलेल्या उच्चभ्रू भागात व्हिक्टोरियन थाटाचं आलिशान घर (‘आनंद भवन' किंवा ‘अबोड ऑफ ब्लिस'), डौलदार घोडागाडी, उमदे अरबी घोडे असा त्यांचा एकूण थाट होता. त्यांचे सूट बहुतेक वेळा लंडनमधल्या सॅव्हिल रो स्ट्रीटवरील प्रसिद्ध टेलरिंग दुकानातून शिवून घेतलेले असत. त्यामुळे जवाहरलालचं बालपणही ऐषोरामी वातावरणात गेलं. वीज आणि नळाचं पाणी तर त्याच्या घरात होतंच. (त्या काळी या सुखसोयी त्याच्या मित्रांच्या ऐकिवातही नव्हत्या.) शिवाय, स्विमिंग पूल व टेनिस कोर्टसारख्या असाधारण सोयींनी त्याचं घर सज्ज होतं. मोतीलालांनी त्याच्यासाठी इंग्लंडहून नव्या धाटणीच्या तिचाकी-दुचाकी सायकली आणि इतर आधुनिक खेळणीही मागवली होती. (अलाहाबादमधील पहिली मोटार मोतीलालांच्याच मालकीची होती. १९०४मध्ये त्यांनी ती परदेशातून मागवली होती.) वाढदिवसाच्या जंगी पार्ट्या, काश्मीरमध्ये सहली, विपुल कपडेलत्ते अशा संपन्नतेत जवाहरलालचं बालपण व्यतीत झालं.

१८९४ साली जवाहरलाल पाच वर्षांचा असताना स्टुडिओत काढलेला एक फोटो आहे. या फोटोत नेव्ही ब्ल्यू सुटात छोटा जवाहरलाल खुर्चीत बसला आहे. नीट विंचरलेले केस, उंच ताठ कॉलर असा त्याचा थाट आहे. दोन्ही हात एकमेकांत गुंफून त्याने गुडघ्यांमध्ये ठेवले आहेत. त्याच्या बाजूला, मध्यभागी मोतीलाल डावा हात कंबरेवर ठेवून उभे आहेत. त्यांच्या कोटाच्या मध्ये सोन्याच्या घड्याळाची चेन लोंबत आहे. रुबाबदार मिश्या असलेले मोतीलाल जणू जग न्याहाळत आहेत. दुसऱ्या बाजूला खुर्चीवर स्वरूपराणी उंची साडी परिधान करून बसल्या आहेत. मात्र, व्हिक्टोरियन थाटातल्या या रुबाबदार पुरुषांसमोर त्या काहीशा फिक्या भासत आहेत. (छोट्या जवाहरलालचा त्याच्या आईसोबत आणखी एक फोटो आहे. त्यात जवाहरलाल भारतीय वेषभूषेत आहेत. त्या फोटोत मोतीलाल नाहीत.)

nehru birthday

साधारण याच काळात घडलेला एक प्रसंग जवाहरलाल नेहरू कित्येक दशकं विसरले नाहीत. मोतीलालांकडे दोन खास पेन होते. त्यांच्या शिसवी लाकडाच्या डेस्कवर ते कायम ठेवलेले असत. एकदा छोट्या जवाहरलालची नजर त्यावर पडली. ‘वडिलांना एकाच वेळी दोन पेन लागणार नाहीत' असा विचार करून त्यातलं एक पेन त्याने अभ्यासासाठी घेतलं. एक पेन गहाळ असल्याचं मोतीलालांच्या लक्षात आलं तेव्हा ते संतप्त झाले आणि त्यांनी शोध सुरू केला. जवाहरलाल घाबरला. प्रथम त्याने पेन लपवलं, मग तो स्वत: लपून बसला; पण घरातल्या नोकरांनी त्याला शोधून काढलं आणि भडकलेल्या मोतीलालांसमोर उभं केलं. पुढे काय घडलं हे जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या आठवणींमध्ये लिहिलं आहे- ‘बेदम मार बसला. इतका, की डोळ्यांपुढे अंधारी आली. सणकून वेदना तर होत होत्याच, पण त्याहूनही जास्त लाजिरवाणं वाटलं. मी आईकडे पळालो. नंतर किती तरी दिवस माझ्या दुखऱ्या शरीरावर वेगवेगळी मलमं चोळली जात होती.' या अनुभवातून छोटा जवाहर खूप काही शिकला. वडिलांच्या वाट्याला जायचं नाही, जे आपलं नाही त्यावर दावा सांगायचा नाही, जर कधी काही चूक हातून घडली तर ती दडवायची नाही आणि यातून ‘सहज सुटू शकतो' असं कधी गृहीत धरायचं नाही, असे अनेक धडे. त्यातून त्याच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. पुढे तोच जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वाचा असाधारण पैलू ठरला.

नेहरू कुटुंबात मोतीलाल व जवाहरलाल हेच दोन पुरुष होते. बहीण सरूप- कुमारीचा जन्म १८ ऑगस्ट १९०० रोजी झाला. (पुढे विजयालक्ष्मी पंडित या नावाने जगाला त्यांची ओळख झाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या.) जवाहरलाल यांच्या सोळाव्या वाढदिवशी त्यांचा एक भाऊ जन्माला आला, पण दुर्दैवाने एका महिन्यातच त्याचा मृत्यू झाला. मोतीलाल यांना चार पुत्र झाले, पण त्यापैकी तिघांचा शैशवातच मृत्यू झाला. त्यानंतर दोन वर्षांनी, २ नोव्हेंबर १९०७ रोजी जवाहरलालांच्या धाकट्या बहिणीचा जन्म झाला. तिचं नाव ‘कृष्णा'. लहानपणी मोठ्या बहिणीला ‘नन्ही' व धाकट्या बहिणीला ‘बेटी' अशी टोपणनावं होती. त्यांना शिकवायला इंग्रजी शिक्षिका येत असे. तिने या टोपणनावांना ‘नान' आणि ‘बेट्टी' असं इंग्रजी रूप दिलं. पुढे हीच नावं त्यांना कायमची चिकटून राहिली.

आधी उल्लेख केलेला छोट्या जवाहरलालचा सुटाबुटातला फोटो केवळ ऐट म्हणून नव्हता. त्याच्या बालपणावर पडलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाचं ते प्रतिबिंब होतं. त्याला शिकवायला दोन ब्रिटिश शिक्षिका घरी येत असत. १९०१ ते १९०४ या काळात आयरिश-फ्रेंच फर्दिनांद टी. ब्रुक्स यांची त्याला खासगी शिकवणी होती. ब्रुक्स यांनी जवाहरलालला इंग्रजी काव्य आणि विज्ञानाची मूलतत्त्वं शिकवली. त्यासाठी त्यांनी घरात प्रयोगशाळा तयार केली होती. ब्रुक्सनीच जवाहरलालमध्ये वाचनाचं वेड रुजवलं. (किशोरवयात जवाहरलालने स्कॉट, चार्ल्स डिकन्स, कॉनन डायल, मार्क ट्वेन यांचं लेखन अधाशासारखं वाचलं ते त्यामुळेच.)

मोतीलालांनी एक संस्कृत शिक्षकही नेमले होते; परंतु इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या या शिष्याला संस्कृत शिकवण्यात त्यांना फारसं यश मिळालं नाही. इथे पुन्हा ब्रुक्स उपयोगी पडले. ते थिओसॉफीचे अनुयायी होते. हिंदू सिद्धांत आणि ख्रिश्चन नैतिकता यांचा मिलाफ असलेलं हे तत्त्वज्ञान एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकांमध्ये लोकप्रिय झालं होतं. ब्रुक्स यांनी उपनिषदं आणि भगवद्गीतेची इंग्रजी भाषांतरं जवाहरलालला वाचायला दिली होती. वयाच्या तेराव्या वर्षी जवाहरलालने या तत्त्वज्ञानाची अल्पकाळ दीक्षाही घेतली होती (तथापि, ही गोष्ट जवाहरलालसह सर्वजण लवकरच विसरून गेले). ‘होम रूल' चळवळीतील अग्रणी ॲनी बेझंट यांच्यामुळे जवाहरलाल या तत्त्वज्ञानाकडे ओढले गेले. पुढे अनेक वर्षं ॲनी बेझंट यांचा जवाहरलाल यांच्यावर बराच प्रभाव होता.

जवाहरलालच्या लहानपणी त्याची आई बऱ्याचदा आजारी असायची. स्वतःच्या नाजूक तब्येतीमुळे जवाहरलालचीही त्या अति काळजी करत असत. त्याला कोणाची तरी दृष्ट लागेल या भीतीने त्यांना पछाडलेलं असायचं. जवाहरलालच्या रूपाबद्दल, त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल, शारीरिक वाढीबद्दल, अगदी त्याच्या खाण्याबद्दलही कोणी काही बोललं तर त्यांना ते चालत नसे. (असं म्हणतात, की दुपारच्या जेवणाआधी त्या जवाहरलालला थोडं खायला देत, जेणेकरून इतरांसमोर तो अधाशासारखं खाणार नाही आणि त्याच्या खाण्याबद्दल कोणाला काही बोलण्याची संधी मिळणार नाही.) जवाहरलालला ‘वाईट नजरे'पासून जपण्यासाठी त्या काहीही करायला तयार असत. त्यामुळेच जवाहरलालला दृष्ट काढण्याच्या सोपस्कारांना वारंवार सामोरं जावं लागत असे. त्यातील एक सोपस्कार कपाळावर काळं तीट लावण्याचा असे. अर्थात, मोतीलालांबरोबर कौटुंबिक फोटो काढण्याचा प्रसंग असेल तेव्हा मात्र हे काळं तीट पुसून टाकलं जाई.

मोतीलालांना या अशा रिवाजांकडे वा सोपस्कारांकडे लक्ष देण्यास फारसा वेळच नव्हता. ते खुल्या विचारांचे आणि बुद्धिप्रामाण्यवादी होते. हिंदू धर्म आणि कर्मकांडांपेक्षा इंग्रजांची तार्किक विचारसरणी व पाश्चात्त्य विज्ञानामध्ये त्यांना भारताच्या प्रगतीची खरी आशा दिसत होती. त्यांच्या या मतांचाही कधी कधी अतिरेक होत असे. इतका, की एकदा १८९० च्या दशकात त्यांनी घरात इंग्रजीशिवाय इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, असा फतवा काढला. पण, कुटुंबातील स्त्रिया इंग्रजी शिकलेल्या नाहीत याचा मात्र त्यांना साफ विसर पडला होता. त्यामुळे साहजिकच जवाहरलाल पंधरा वर्षांचा झाला तेव्हा मोतीलाल यांनी त्याचं नाव इंग्लंडमधील हॅरो येथील प्रतिष्ठित ब्रिटिश पब्लिक स्कूलमध्ये घातलं.

योगायोग असा, की साधारण पंधरा वर्षं आधी विन्स्टन स्पेन्सर चर्चिल हा तरुण मुलगा याच शाळेत शिकला होता. हॅरोच्या या दोन विद्यार्थ्यांचा भारताविषयी दृष्टिकोन पूर्णपणे परस्परविरोधी होता. नेहरू राष्ट्राभिमानी होते, तर चर्चिल भारतीय स्वातंत्र्याच्या पक्के विरोधात. चर्चिल एकदा म्हणाले होते, “भारत हा देश किंवा राष्ट्र नाही, ती केवळ एक भौगोलिक अभिव्यक्ती आहे. एक देश म्हणून विषुववृत्ताच्या रेषेइतकंही त्याचं अस्तित्व नाही.”

हॅरोचे आधीच्या शतकातील आणखी एक विद्यार्थी सर विल्यम जोन्स अधिक उदार मताचे होते. त्यांनी

१७८४ मध्ये ‘एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल'ची स्थापना केली होती, अनेक संस्कृत ग्रंथांची भाषांतरं केली होती आणि भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाबद्दल पाश्चात्त्य कुतूहलाला उत्तेजन दिलं होतं. तथापि, चर्चिल यांच्या भारताविषयीच्या अनुदार दृष्टिकोनामुळेच जवाहरलाल नेहरूंना ‘भारताचा शोध' घेणं भाग पडलं, असं म्हणता येईल.

चर्चिल यांनी लिहिलं होतं, ‘भारतात जी एकतेची भावना दिसत आहे ती सर्वस्वी भारतातल्या इंग्रज सरकारची कृपा आहे, आणि ही भावना ज्या भाषेतून व्यक्त होत आहे ती आहे इंग्रजी. संपूर्ण भारतात ती एकमेव सामायिक भाषा आहे.' पुढे नेहरूंनी चर्चिल यांच्याच शाळेत शिकून, त्यांच्याच इंग्रजी भाषेत ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला आणि चर्चिलच्या सरकारपासून मुक्त होण्याचा भारताचा हक्क ठणकावून सांगितला.

जवाहरलाल साधारण सतरा वर्षांचा असतानाचे त्याचे दोन फोटो आहेत. एक फोटो हॅरो शाळेच्या छात्रसेनेच्या खाकी गणवेशातला आहे. डोक्यावरच्या काहीशा विचित्र टोपीच्या घट्ट हनुवटी पट्ट्यामुळे गाल आवळलेले दिसताहेत, चेहरा दुर्मुखलेला आहे. दुसरा फोटो अधिक पारंपरिक मुद्रेतला आहे. (गडद सूट, डावा हात कोटाच्या खिशात, उजव्या हातात कडक गवती हॅट, कॅमेऱ्याचा झोत टाळण्याच्या नादात काहीशी गोंधळलेली नजर.) दोन्हींपैकी कोणत्याच फोटोत मिश्या दिसत नाहीत. वडिलांचा आदर राखण्यासाठी कधी कधी तो मिश्या ठेवत असे. (वडिलांनी त्याला थेट सांगितलं होतं, की गुळगुळीत दाढी केलेला तुझा चेहरा एखाद्या मूर्खासारखा दिसतो.)

जवाहरलाल हॅरोमध्ये नीट रुळला होता, स्वस्थचित्त होता हे या दोन्ही फोटोंमध्ये दिसतं. त्याची शाळेतली कामगिरी चांगली होती. त्याची मेहनत आणि क्षमता, त्याची शिकण्याची इच्छा, इंग्रजी भाषेची त्याची गुणवत्ता या बाबतीत त्याचे शिक्षक त्याच्यावर खूष होते. (फ्रेंच आणि लॅटिन या भाषांमध्ये मात्र तो फारसा चांगला नव्हता.) त्याचा शारीरिक तंदुरुस्तीवरचा विश्वास ‘हॅरो'मध्ये पक्का झाला. तिथे जवाहरलालने फुटबॉल आणि क्रिकेट अशा दोन्ही खेळांमध्ये भाग घेतला. धावण्याच्या शर्यतीतही तो नेहमी मनापासून सहभागी होत असे. शाळेतील अर्धा मैल व मैलभर अंतराच्या स्पर्धांमध्ये, तसंच स्टिपलचेससारख्या तंदुरुस्ती आणि दम यांचा कस पाहणाऱ्या स्पर्धांमध्ये त्याचा सहभाग असे. त्याचप्रमाणे बर्फावर स्केटिंग करणं आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामशाळेत व्यायाम करणं त्याला आवडत असे. सैनिकी प्रशिक्षण वर्गातही त्याला विशेष रस होता.

‘हॅरो'ची आठवण नेहमीच नेहरूंच्या काळजात राहिली. नेहरूंचे अग्रगण्य चरित्रकार सर्वपल्ली गोपाल यांनी हॅरोमधील त्यांच्या सहाध्यायांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातील बहुतेकजणांनी नेहरू हे चारचौघांसारखेच ‘साधारण' विद्यार्थी होते, त्यांची फारशी ‘छाप' नव्हती, अशा आठवणी सांगितल्या; पण स्वत: नेहरूंनी हॅरोचं वर्णन ‘आनंददायी अनुभव' असं केलं होतं. हॅरो सोडताना त्यांना रडू आल्याची आठवण त्यांनी सांगितली होती. खरं तर अलाहाबादमधल्या सुरक्षित बालपणानंतर एका नव्या देशाशी, नव्या हवामानाशी आणि एका नव्या शाळेशी जुळवून घेण्याच्या आणि तिथे बऱ्यापैकी कामगिरी करण्याच्या जवाहरलालांच्या क्षमतेकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष केलं, असं म्हणावंसं वाटतं. अगदी त्यांचे चरित्रकार गोपाल यांनीही याबद्दल त्यांना पुरेसं श्रेय दिलेलं नाही. नेहरूंच्या हृदयात हॅरोचं स्थान आगळंच होतं. पुढे तीस वर्षांनंतर तुरुंगात असताना त्यांच्या दैनंदिनीत हॅरोच्या चित्रांना उजाळा देण्यात त्यांनी समाधान शोधलं होतं, यावरून त्याची कल्पना येते.

जवाहरलाल हॅरोमध्ये शिकत असतानाच्या काळात भारतातील स्वातंत्र्य चळवळीने नाट्यपूर्ण वळण घेतलं होतं. आतापर्यंत ही चळवळ सौम्य मार्गाने चालली होती; पण १९०५ मध्ये इंग्रज सरकारने घेतलेल्या बंगालच्या फाळणीच्या निर्णयाच्या विरोधात जनक्षोभ उसळला होता. जवाहरलालांच्या जन्माआधी चार वर्षं, म्हणजे १८८५मध्ये ॲलन ह्यूम या उदारमतवादी स्कॉटिश माणसाच्या पुढाकारातून स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आता देशभर विस्तारली होती. काँग्रेसच्या १८८५च्या पहिल्या सार्वजनिक सभेला ७२ प्रतिनिधी उपस्थित होते. तीन वर्षांनंतर १८८८मध्ये अलाहाबाद इथे झालेल्या सार्वजनिक सभेत हा आकडा १४०० वर जाऊन पोहोचला. त्यापैकी एक मोतीलाल नेहरू होते. जवाहरलालही भारतीय राजकारणातील घडामोडींमध्ये उत्सुकतेने रस घेत. मोतीलालांकडून त्यांना येणाऱ्या पत्रांबरोबर भारतातील वर्तमानपत्रांमधील कात्रणंही असत. त्यातून त्यांना भारतातल्या स्वदेशी चळवळीची माहिती मिळत होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जहाल आणि मवाळ गटांत विभागली असल्याचं त्यांना या कात्रणांमधून समजत होतं. जहाल गटाचं नेतृत्व बाळ गंगाधर टिळक करत होते, तर मवाळ गटाचं नेतृत्व गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे होतं. ब्रिटिशांनी बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांना या पत्रांमधून मिळाली होती. लोकांच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. त्या वेळी जवाहरलाल हे टिळक आणि जहालवाद्यांच्या राष्ट्रवादाचे प्रशंसक होते. मोतीलालांच्या अति मवाळवादावर ते कायम टीका करत. पण धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी मोतीलालांचा जहालवाद्यांच्या मार्गापेक्षा हिंदू विचारसरणीला विरोध होता हे जवाहरलालांना पुढे बऱ्याच वर्षांनंतर लक्षात आलं.

shodh nehruncha

विद्यार्थी म्हणून इंग्लंडमध्ये पोहोचल्याक्षणीच जवाहरलाल नेहरूंमधील विद्रोहाच्या खुणा दिसण्यास सुरुवात झाली होती. १९०५मध्ये त्सुशिमा इथे जपानच्या नौदलाने रशियावर मिळवलेल्या विजयाच्या बातमीमुळे तरुण जवाहरलालला स्फुरण चढलं होतं. एक आशियाई देश युरोपातील एका महाशक्तीला पराभूत करू शकतो, या जाणिवेने तो रोमांचित झाला होता. पुढे आयर्लन्डचा प्रवास केल्यानंतर राष्ट्रवादी चळवळीची ताकद तरुण जवाहरलालला समजली. तिथे आयरिश लोकांनी व त्यांच्या ‘सिन फिन' चळवळीने ब्रिटिश मालावर बहिष्कार घातला होता. यातून जहाल विचारांकडे त्याचा कल झुकला होता. या काळात जवाहरलालने वाचनही खूप केलं. जॉर्ज बर्नार्ड शाँच्या लेखनाचा तो चाहता बनला. त्या काळातील काही ब्रिटिश लेखकांच्या, विशेषत: विल्यम मॉरिस व मेरीडिथ टाऊनसेंड यांच्या पुस्तकांमध्ये भांडवलवाद व साम्राज्यवादाच्या विरोधातले प्रभावी विचार त्याला आढळले. भारतातील ब्रिटिश राजवटीची घसरण अटळ असल्याचं सूचन त्यांनी या पुस्तकांतून केलं होतं. जवाहरलालला शाळेत प्रसिद्ध इतिहासकार ट्रेव्हिलियन यांनी लिहिलेलं गॅरिबाल्डीचं चरित्र बक्षीस म्हणून मिळालं होतं. यातून भारतात त्याच प्रकारचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळाली होती.

ऑक्टोबर १९०७ मध्ये जवाहरलालने केंब्रिजमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या वडलांच्या व मुख्याध्यापकांच्या अपेक्षेपेक्षा काहीशी आधीच त्याने प्रवेशपरीक्षा दिली होती व त्यात तो उत्तीर्ण झाला होता. सारी गोळाबेरीज केली तरी जवाहरलालचं विद्यार्थिदशेतील जीवन खूप कृतिशील किंवा असाधारण होतं असं दिसत नाही. त्याने रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र व पदार्थविज्ञानशास्त्र या विषयांचा अभ्यास केला (नंतर पदार्थविज्ञानशास्त्र हा विषय बदलून वनस्पतिशास्त्र हा विषय घेतला) आणि दुसऱ्या वर्गाची सामान्य पदवी मिळवून तो पदवीधर झाला. नंतरच्या काळात नेहरू ज्या लोकशाही समाजवादी विचारांसाठी ओळखले गेले त्या ‘फेबियन' समाजवादी विचारांची चर्चा ते महाविद्यालयात असताना केंब्रिजमधील वैचारिक वर्तुळात जोरात होती. मात्र, त्या वेळी विद्यापीठातील ‘फेबियन सोसायटी'शी जवाहरलालचे काही संबंध असल्याचे पुरावे नाहीत. (ब्रिटिश समाजवादी विचारवंतांनी एकोणिसाव्या शतकात ‘फेबियन सोसायटी'ची स्थापना केली. ‘लोकशाही समाजवाद' व ‘समाजवादी अर्थव्यवस्था' या तत्त्वांचा पुरस्कार करणं, हा या संस्थेचा उद्देश होता.) महाविद्यालयात असताना जवाहरलाल अनेक वादविवाद मंडळांचा सदस्य झाला होता, मात्र भाषणांमध्ये त्याचा सहभाग जवळपास कधीच नव्हता. भारतीय विद्यार्थ्यांनी स्थापन केलेलं ‘इंडियन मजलिस' हे मंडळ चर्चा व सार्वजनिक सभांचं आयोजन करत असे. जवाहरलाल या मंडळाचा सदस्य होता, पण तो या मंडळाचा फार ठळक असा घटक कधीच नव्हता. सार्वजनिक जीवनातल्या त्याच्या बुजरेपणाचं हे लक्षण होतं. त्यावर मात करण्यासाठी जवाहरलालला पुढे बरेच कष्ट घ्यावे लागले. बिपिनचंद्र पाल यांच्यासारख्या त्या वेळच्या जहाल गटातल्या नेत्याची ‘ग्राम्य भाषणं' त्यांनी केंब्रिजमध्ये ऐकली होती, पण उच्चभ्रू वर्गात वावरलेल्या जवाहरलालला ती भाषणं जवळची वाटणं अवघडच होतं. कारणं काहीही असोत, विद्यार्थिदशेत नेहरू कधीच चमकले नाहीत हे खरं. सर्वपल्ली गोपाल यांच्या शब्दांत सांगायचं, तर ‘त्या वेळी त्यांच्यात तेजाची किंवा असामान्यत्वाची कोणतीच चिन्हं दिसली नव्हती. एवढंच काय, त्यांच्या समकालीनांमध्ये ते वेगळे उठून दिसले नव्हते.”

अर्थात त्या काळातल्या भारतीय तरुणांपेक्षा जवाहरलाल काही बाबतींत नक्कीच वेगळा होता. तो एक चांगला खेळाडू होता. तो टेनिस खेळत असे. नौकानयन शर्यतींमध्ये भाग घेत असे. घोडेस्वारीत तो निपुण होता. आपण इतरांना आवडावं म्हणून ढोंगी वागणं जवाहरलालच्या स्वभावात नव्हतं. फक्त एकदाच हॉटेलमधील एका वेटर तरुणीबरोबर त्याने नाच केला होता; पण त्याचा उद्देश होता तो ती त्याच्याशी कोणत्या विषयांवर बोलेल हे जाणून घेण्याचा. असो. केंब्रिजमध्ये असताना जवाहरलालने वकिलीच्या तयारीकरता लंडनच्या ‘इनर टेंपल'मध्ये प्रवेश घेतला. (ब्रिटनमधील न्यायाधीश व कायदेपंडितांच्या मंडळाला ‘इनर टेंपल' म्हणतात. ब्रिटनमध्ये वकिली करण्यासाठी या मंडळाचा सदस्य असणं आवश्यक असतं.) खरं तर जवाहरलालला वकिलीत फारसा रस नव्हता, पण केवळ मोतीलालांच्या इच्छोपोटी त्याने इथे प्रवेश घेतला होता. त्यामुळे त्याला लंडनला स्थलांतर करणं भाग पडलं. त्यामुळेच पुढे ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये त्याने शिक्षण घेतलं. इथेच नेहरूंच्या मनावर समाजवाद बिंबला आणि त्यातून त्यांचा जगाविषयीचा दृष्टिकोन तयार झाला असं मानलं जातं. तथापि, इथेही ‘फेबियन' समाजवादाशी त्यांचे वैचारिक संबंध आल्याचे फारसे पुरावे नाहीत. तरुण जवाहरलाल फुरसतीचा बराच काळ मन रमवण्यात घालवत असे. विशेषत: शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना तो उपस्थित राहत असे. नेहरूंनी लिहिलं आहे, ‘त्या काळात माझा कल आजचा दिवस आनंदात घालवण्याकडे असे. उद्याच्या चिंतांचा विचार न करता शांत आणि आनंददायी जीवन जगणं मी अनुभवत होतो.' या काळात जवाहरलालला काही देणीही झाली होती. ती फेडण्यासाठी एकदा त्याला त्याचं सोन्याचं घड्याळ गहाण ठेवावं लागलं होतं आणि मोतीलालांकडे जास्त पैशांची मागणी करावी लागली होती. आपली मागणी पूर्ण व्हावी यासाठी तो चलाखीही करत असे. एकदा त्याने ‘पैसे न पाठवल्यास अभ्यास सोडून घरी परत येईन' अशी धमकी वडलांना दिली होती. वडलांच्या व्यवसायात त्याला रस नव्हता हे तो वकिलीच्या परीक्षेत काठावर पास झाला यातून स्पष्ट होतं. तथापि, परीक्षेत पास झाल्यामुळे १९१२ मध्ये तो वकिली करण्यास पात्र झाला.

वयाच्या बाविसाव्या वर्षी पुन्हा मायदेशी परतेपर्यंत जवाहरलाल नेहरूंच्या जीवनाचा एक टप्पा पूर्ण झाला होता. त्यांच्या जीवनातला हा एकमेव असा काळ होता, ज्यात नोंद ठेवावी अशी कामगिरी त्यांच्याकडून घडली नाही, आणि तरीही या काळात पिता-पुत्रांमध्ये जो पत्रव्यवहार झाला त्यात मोतीलालांचा आपल्या मुलाच्या नशिबाबद्दलचा विश्वास प्रकर्षाने दिसून येतो. मोतीलाल हे एकीकडे प्रचंड आत्मविश्वासाने भरलेले तापट गृहस्थ होते. संतापाच्या भरात ते नोकरांना मारहाणही करत असत. मात्र, मुलाच्या बाबतीत ते खूप सौम्य, प्रेमळ व हळवे होते. जवाहरलालशी केलेल्या पत्रव्यवहारामध्ये त्यांनी त्याच्याबद्दलच्या आशा-आकांक्षा स्पष्टपणे व्यक्त केलेल्या दिसतात. तत्कालीन काँग्रेस नेत्यांची चित्रं असलेल्या एका पोस्टकार्डावर रोमेश चंदर दत्त यांच्या चित्राखाली मोतीलालांनी ‘भावी जवाहरलाल नेहरू' असं लिहिलं होतं. रोमेश चंदर दत्त हे त्या काळातील असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. १८९९ साली त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं. ब्रिटिशांनी चालवलेल्या प्रशासन सेवेकरता पात्र ठरलेल्या सुरुवातीच्या भारतीयांपैकी ते एक होते. यशस्वी प्रशासक, वकील, इतिहासकार, साहित्यिक व अनुवादकार म्हणून ते मान्यता पावले होते. मोतीलालांच्या जवाहरलालांकडून खूप उच्च अपेक्षा होत्या. शाळेत त्याने सीनियर रँग्लर व्हावं, इथपासून तेव्हाच्या इंडियन सिव्हिल सर्व्हिस अर्थात आयसीएसच्या परीक्षेत यश मिळवावं, इथपर्यंत त्यांचे अनेक मनसुबे होते. (जवाहरलालने ते कधीच पूर्ण केले नाहीत, हा भाग अलाहिदा!) मोतीलालांची पत्रं घोडेस्वारी व नेमबाजीच्या महत्त्वापासून फुटबॉल खेळताना दुखापत कशी टाळावी इथपर्यंत अनेक सल्ल्यांनी भरलेली असत. भारतीय राजकारणातील घडामोडींबद्दलची मतं व दृष्टिकोन मोतीलाल आपल्या पत्रांमधून मांडत असत व जवाहरलालला वादविवादासाठी आव्हान देत असत. पिता व पुत्रामध्ये हजारो मैलांचं अंतर होतं, तरीही त्यांचा एकमेकांशी थेट आणि उत्तम संवाद होता. भारतात एका छताखाली राहत असते तर ते असा संवाद टिकवू शकले असते का याबाबत शंकाच आहे.

मोतीलालांनी आपल्या या काहीशा उधळ्या मुलाला कधीही पैशाची कमतरता भासू दिली नाही. त्याचं प्रत्येक शैक्षणिक यश त्यांनी चांगलं पण सुयोग्य असंच बक्षीस देऊन गौरवलं. जवाहरलालच्या चुकांमुळे जेव्हा जेव्हा ते नाराज झाले, त्या प्रत्येक वेळी त्यांचं मन पुन्हा जिंकण्यात जवाहरलालने यश मिळवलं. (अशा एका प्रसंगी मोतीलालांनी लिहिलं होतं, ‘माझ्यात इतर काहीही दोष असतील, पण मी पैशांचा लोभी आहे, किंवा पैशांमुळे मी तुला लाडावून ठेवलंय, असा आरोप माझ्यावर कोणी करणार नाही.') मोतीलालांनी जवाहरलालला पदवीधर झाल्याबद्दल शंभर पौंडांचं घसघशीत बक्षीस दिलं होतं; पण या बक्षिसाने जवाहरलालचं करियरच काय, अवघं आयुष्यच जवळजवळ संपवलं होतं. झालं असं, की या पैशांतून जवाहरलालने फ्रान्सला जावं आणि फ्रेंच भाषा शिकावी अशी मोतीलालांची इच्छा होती. त्यांनी तसं सुचवलंही होतं. परंतु फ्रान्सला जाण्याऐवजी जवाहरलाल एका इंग्रज मित्राबरोबर नॉर्वेत गिरिभ्रमणासाठी गेला. तिथे अचानक झालेल्या अपघातात तरुण जवाहरलाल बर्फासारख्या थंड पाण्याच्या प्रवाहात पडून वेगाने एका खोल धबधब्याच्या दिशेने वाहत गेला होता. तो पाण्यात बुडालाच असता; पण त्याच्या सोबत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तो चारशे फूट खोल कड्यावरून कोसळता कोसळता वाचला. नदीच्या काठाने धावत जाऊन धबधब्याच्या अलीकडे काही यार्डांवर त्याच्या मित्राने त्याचा पाय पकडून त्याला पाण्याबाहेर ओढलं.

या प्रसंगामुळेच नेहरूंचा अमेरिकी इतिहासकार स्टॅन्ले वुलपर्ट याने जवाहरलालचे त्याच्या मित्राशी समलिंगी संबंध असल्याचा निष्कर्ष काढला होता. अर्थात, या निष्कर्षाला फारसा तार्किक आधार नव्हता. नॉर्वेतला अपघात आणि जवाहरलालचे शिक्षक ब्रुक्स समलिंगी होते, अशा फुटकळ आधारावर केलेला तर्क असल्यामुळे तो गंभीरपणे घेणं अवघड आहे. वुलपर्टच्या दाव्याला बळकटी देणारा कोणताही पुरावा पत्रांच्या अथवा समकालीनांच्या आठवणींच्या रूपात अस्तित्वात नाही. त्या काळात युरोपात तरुण पुरुषांनी जोडीने भ्रमंती करणं हे खूप सामान्य होतं. शिवाय जवाहरलालचा तसा काही कल असता, तर त्याचे मित्र, कुटुंबीय आणि परिचितांपैकी कोणीही त्याबद्दल उल्लेख केलेला नाही, हे पटणारं नाही. जवाहरलाल नेहरूंच्या जीवनातील घटनाक्रमाची नोंद ठेवणाऱ्यांपैकी कोणीही त्यांच्याविषयीच्या अशा अफवांचा उल्लेख केला नाही, अगदी त्यांच्या शत्रूंनीसुद्धा नाही. अन्यथा, नेहरूंना दुखावण्यासाठी अशा आरोपांचा वापर ते करू शकले असते.

इंग्लंडमधील जवळपास सात वर्षांच्या वास्तव्यानंतर, १९१२च्या ऑगस्ट महिन्यात जवाहरलाल नेहरू भारतात परतण्यास निघाले, तेव्हा त्यांच्या हाती अनुभव म्हणून फारच थोडं होतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर ते काहीसे घमेंडी होते. त्यांच्यात वाखाणण्यासारखं थोडं होतं. जर परीक्षांमधली त्यांची कामगिरी चांगली असती तर वडिलांच्या इच्छेनुसार ते नागरी सेवेत (आय.सी.एस.) जाऊ शकले असते. मात्र, शैक्षणिक कामगिरीत त्यांचा स्तर साधारण असल्यामुळे आय.सी.एस.सारख्या कठीण परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची त्यांना फारशी संधी नव्हती. जर ते नागरी सेवेत गेले असते तर त्यांची राजकीय क्षेत्रापेक्षा तिकडे उत्तम कारकीर्द घडू शकली असती. पण आपल्याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राजकारणात यश मिळवल्याची उदाहरणं जवळपास नाहीतच. त्यामुळे नेहरू लहानपणी शिक्षणात चमकले असते, तर पुढे राजकारणात ते ज्या उंचीवर पोहोचले तिथे पोहोचू शकले नसते.

तथापि, इंग्लंडच्या वास्तव्यात जे ज्ञान या तरुणाने मिळवलं त्यातून त्याच्यात निश्चितच अमूर्त बदल घडला. जवाहरलालला हॅरोला पाठवल्यानंतर मोतीलालांनी त्याला पाठवलेलं पत्र भावनिक होतं. त्यांना झालेल्या दु:खाचं वर्णन त्यांनी केलं होतं : ‘या जगात आमच्याजवळ असलेल्या आमच्या सर्वांत लाडक्या खजिन्याला आम्ही दुरावलो आहोत; पण हे तुझ्याच भल्यासाठी आहे. तुझ्या जीवनाची तरतूद करण्याचा हा प्रश्न नाही. ते मला अशक्यही नाही. माझ्या केवळ एका वर्षाच्या उत्पन्नातून मी ते करू शकतो. प्रश्न तुला चांगला माणूस बनवण्याचा आहे. तुला आमच्याजवळच ठेवणं आणि चांगलं शिक्षण देऊ करण्याऐवजी तुला आमच्या धनदौलतीच्या हवाल्यावर सोडणं हे खूपच स्वार्थीपणाचं झालं असतं.' सात वर्षांनंतर जवाहरलालनेही आपल्याला वडलांचा हेतू समजल्याची व तो सफल झाल्याची खात्री दिली. इंग्लंडमधून परतीसाठी निघण्याच्या चार महिने आधी, एप्रिल १९१२ मध्ये वडलांना पाठवलेल्या पत्रात जवाहरलालने लिहिलं होतं, ‘शिक्षण म्हणजे परीक्षेत पास होणं, इंग्रजी किंवा गणित समजून घेणं नाही. ती एक मनोधारणा आहे.'

जवाहरलालच्या बाबतीत ही मनोधारणा एका सुशिक्षित, सुसंस्कृत व सुसंपन्न इंग्रज माणसाची होती. ब्रिटिश साम्राज्यातील दोन सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांनी त्याला घडवलं होतं. (याच दोन शिक्षणसंस्थांनी लॉर्ड बायरनला घडवल्याचंही नेहरूंनी नंतर अभिमानाने नोंदवलं आहे.) जवाहरलाल नेहरू परीक्षेत दुसऱ्या दर्जाने पास झाले असले तरी त्यांचं शिक्षण या दोन अव्वल संस्थांमध्ये झालं होतं हे महत्त्वाचं.

या शिक्षणादरम्यानच अजाणतेपणाने का होईना, भावी काळातील एका राष्ट्रवादी नेत्याचा पाया रचला गेला होता. इंग्रज माणसाच्या हक्कांची जाणीव जवाहरलाल नेहरूंच्या मनावर बिंबली होती. हे हक्क आपल्यासाठी नाहीत याची जाणीव त्यांना एक दिवस होणारच होती. ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील भारतात हे हक्क उपभोगण्यास मिळण्याइतके आपण इंग्रज नक्कीच नाही, या जाणिवेने त्यांच्यात संतापाची भावना निर्माण होणं साहजिक होतं.

(‘नेहरू : द इन्व्हेन्शन ऑफ इंडिया' या शशी थरूर लिखित पुस्तकाचा मनोहर सोनवणे यांनी केलेला अनुवाद ‘शोध नेहरूंचा आणि भारताचाही' या नावाने समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्यातील हा संपादित भाग.)

शशी थरूर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results