
६ मार्च १९९१. ऑस्ट्रेलियातल्या एका कॉम्प्युटरविक्रेत्याकडच्या स्क्रीनवर काही विचित्र खुणा उमटल्या. अधिक शोध घेतल्यावर कळलं, की तो एक व्हायरस होता. व्हायरसने त्या कॉम्प्युटरवरचा सर्व डेटा पुसून टाकला होता. कॉम्प्युटर जगतातलं हे बहुधा सर्वात पहिलं malware. संशोधकांना असंही आढळून आलं, की हा व्हायरस ६ मार्चव्यतिरिक्त इतर दिवशी काहीही नासधूस न करता गपगुमान बसून असतो. ६ मार्च हा चित्रकार मायकलँजेलोचा जन्मदिवस. म्हणून या व्हायरसलाही तेच नाव दिलं गेलं.
तो इंटरनेटपूर्वीचा काळ होता. त्यामुळे हा व्हायरस असलेली हार्डडिस्क किंवा यूएसबी ड्राइव्ह एखाद्या कॉम्प्युटरच्या थेट संपर्कात आले तरच तो पसरणार, हे नक्की होतं.
गंमत अशी होती, की समजा तुमच्या कॉम्प्युटरवर हा व्हायरस आला असेल, पण ६ मार्चला तुम्ही कॉम्प्युटर सुरू केलाच नाही, तर तुमच्या डेटाला त्यापासून कोणताही धोका पोहोचण्याची शक्यता शून्य होती. पण हे सुरुवातीला लक्षात आलं नव्हतं.
त्या काळात अमेरिकेत अनेक घरांमध्ये PC आलेले होते. मात्र तेव्हा व्हायरस इन्फेक्शनची खात्रीशीर आकडेवारी त्वरित मिळवण्याची साधनं नव्हती. त्यामुळे काही हजार ते काही लाख कॉम्प्युटर्समध्ये हा व्हायरस शिरला असल्याचं म्हटलं गेलं. १९९२ सालचा मार्च महिना जवळ यायला लागला तसतसं मीडियाने हा विषय आणखी मोठा केला. प्रत्यक्षात ६ मार्च १९९२ यादिवशी काही कॉम्प्युटर्सच्या डेटाचं नुकसान झालं खरं, पण मीडियाने सांगितलं तसं त्यात ‘भयंकर’ काहीही निघालं नाही.
पुढच्या काही वर्षांत हा मायकलँजेलो बातम्यांमधून गायबही झाला. त्याच्यामुळे एक मात्र झालं- malware पासून अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात, हे जगभरातल्या कॉम्प्युटर वापरकर्त्यांच्या लक्षात आलं. तिथून पुढे ‘अँटीव्हायरस इंडस्ट्री’वाढीस लागली, हे वेगळं सांगायला नकोच.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.