
एप्रिल फूल डे अनेक देशांत लोकप्रिय आहे. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात कशी झाली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. पण तो साजरा करण्याची पद्धत मात्र सर्वत्र आढळते. या दिवशी आपल्या माणसांची, मित्रांची थट्टा मस्करी करून, छोटं-मोठं खोटं बोलून त्यांना फसवलं जातं. पण हा खेळ निरुपद्रवी असणं अपेक्षित असतं. पण आज सोशल मिडियाचं आपल्या आयुष्यात अतिक्रमण झालेलं असल्याने रोजच आपल्यावर फेक न्युजचा भडिमार होत असतो. त्यामुळे रोजच एप्रिल फूल्स डे असतो, असं म्हणावं लागेल.
याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय तथ्य-तपासणी दिन (इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग डे) दरवर्षी २ एप्रिल रोजी साजरा केला जातो. खोट्या बातम्या (फेक न्युज) आणि चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणं हा या दिवसाचा उद्देश. आंतरराष्ट्रीय तथ्य-तपासणी नेटवर्क (इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क) या संस्थेने २०१६ मध्ये एप्रिल फूलनंतरच्या लगेचच्या दिवसाची तथ्य-तपासणी दिन म्हणून घोषणा केली.
दरम्यान, या दिवसाच्या निमित्ताने खोट्या बातम्यांबद्दलची थोडी माहिती. खोट्या बातम्या कोणत्या देशात पसरवल्या जातात?
स्टॅटिस्टा आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या संस्थांच्या अहवालांनुसार, भारतात खोट्या बातम्या पसरण्याचं प्रमाण मोठं आहे. विशेषतः निवडणुका आणि रोगांच्या साथी येण्याच्या काळात याचं प्रमाण जास्त असतं. याशिवाय अमेरिका, ब्राझील, फिलिपिन्स, आणि रशिया हे देशही खोट्या बातम्यांच्या प्रसारात आघाडीवर आहेत. कारण या देशांमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि राजकीय हेतूंसाठी चुकीची माहिती पसरवली जाते.
सर्वात जास्त तथ्य तपासणी कोणत्या देशात चालते?
तथ्य तपासणीच्या बाबतीतही अमेरिका हा देश सर्वात आघाडीवर आहे. तिथे पॉलिटिफॅक्ट, स्नोप्स, आणि फॅक्टचेक.ऑर्ग सारख्या मोठ्या आणि स्थापित तथ्य तपासणी संस्था आहेत. ड्यूक युनिव्हर्सिटीच्या २०१९च्या रिपोर्टनुसार अमेरिकेत ६० हून अधिक सक्रिय तथ्य तपासणी संस्था आहेत. याशिवाय, फिनलंड, युनायटेड किंगडम आणि नॉर्वे हे देशही तथ्य तपासणीत आघाडीवर आहेत.
टीम युनिक फीचर्स पोर्टल | 9156308310 | uniquefeatures.portal@gmail.com
टीम युनिक फीचर्स पोर्टल