आम्ही कोण?
काय सांगता!  

जेव्हा नदीला कायदेशीर हक्क मिळतात

  • प्रीति छत्रे
  • 18.09.25
  • वाचनवेळ 2 मि.
whanganui river

न्यूझीलंडमधली व्हांगानुई नदी ही जगभरातली पहिली अशी नदी आहे जिला माणसांचे कायदेशीर हक्क बहाल करण्यात आले आहेत. २०१७ मध्ये तिथे हा आगळावेगळा निर्णय घेतला गेला.

व्हांगानुई ही न्यूझीलंडमधली एक प्रमुख नदी आहे. न्यूझीलंडचे मूळ निवासी, माओरी, या नदीशी शेकडो वर्षं जोडलेले आहेत. ब्रिटिश वसाहतवादी तिथे पोहोचण्याच्या आधीपासून माओरी लोकांचं व्हांगानुई नदीसहितचं सहजीवन तिथे बहरलं होतं. त्या लोकांची गुजराण नदीवर अवलंबून होती. त्यांचं दळणवळणही नदीमार्फतच होत असे.

नदीचं पुरेपूर रक्षण करता यावं यासाठी माओरी लोक दीड-एकशे वर्षांपासून कायदेशीर लढा देत आलेले होते. अखेर २०१७ मध्ये तिथे एक नवा कायदा केला गेला आणि या नदीला माणसांचे कायदेशीर हक्क (legal personhood) बहाल करण्यात आले. नदीच्या कायदेशीर हक्कांची राखण करण्यासाठी माओरी लोकांतर्फे दोघांची रीतसर नेमणूक केली गेली. त्यानंतर नदीचं कोणत्याही प्रकारे नुकसान झालं तर ते माणसांना नुकसान पोहोचवल्याप्रमाणे मानलं जाऊ लागलं. माणसांच्या कोणत्याही कृतीमुळे नदीच्या पाण्याचं प्रदूषण झालं अथवा इतर कोणत्याही प्रकारे नदीपरिसराचं नुकसान झालं तर नदीतर्फे संबंधितांवर खटला दाखल केला जाऊ शकतो, अशी या कायद्यात तरतूद आहे.

न्यूझीलंडमधल्या एका पर्वताला आणि एका नैसर्गिक वनालाही असे कायदेशीर हक्क मिळाले आहेत. व्हांगानुई नदीसंदर्भातल्या या कायद्यानंतर जगभरातल्या अनेक देशांमध्ये या प्रकारे नदीला कायदेशीर हक्क देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. भारतातही गंगा आणि यमुना नदीला कायदेशीर हक्क बहाल केले गेले. पण ते नंतर मागेही घेतले गेले. पूरपरिस्थितीसारख्या संकटांत माणसांनीच गंगा किंवा यमुना नदीवर खटला गुदरला तर काय होईल, यावर कायदेतज्ज्ञांनी अधिक खल करणं गरजेचं आहे, असं सांगितलं जातं.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results