आम्ही कोण?
काय सांगता?  

गगनचुंबी इमारतींना सावरणारा Tuned Mass Damper

  • प्रीति छत्रे
  • 21.04.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
mass tuned damper

‘अमुक देशात जगातली सर्वात उंच इमारत उभी राहिली’ अशा प्रकारच्या बातम्या अधूनमधून वाचायला मिळतात. इमारत जितकी उंच, तितका वार्‍याच्या झोतांमुळे त्या इमारतीला असणारा धोकाही अधिक. भूकंपाच्या धक्क्यांचाही या इमारतींवर साहजिक अधिक परिणाम होतो. त्यावर ताबा ठेवण्यासाठी अशा गगनचुंबी इमारतींमध्ये एक अभियांत्रिकी युक्ती वापरली जाते. त्याचं नाव Tuned Mass Damper.

बांधकामात वापरल्या गेलेल्या लोखंड, काँक्रीट इत्यादीमुळे इमारती मजबूत होतात, असं कुणीही म्हणेल. मात्र वार्‍यांच्या प्रचंड झोतांना किंवा भूकंपाच्या लहान ते मध्यम धक्क्यांना तोंड देण्याची वेळ येते तेव्हा ९०, १००, १२० मजली इमारतींना तेवढं पुरेसं नसतं. बाह्य आघातांमुळे अशा इमारती मंद झोके घेतातच.

Tuned Mass Damper हा एक प्रचंड वजनाचा धातूचा लंबक (pendulum) असतो. तो इमारतीच्या वरच्या भागात लटकवत ठेवला जातो. वार्‍यांमुळे किंवा भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारत झुलायला लागते तेव्हा हा लंबक इमारतीच्या विरुद्ध दिशेने झोके घ्यायला लागतो. त्यामुळे साहजिकच इमारतीचं झुलणं (sway) काबूत ठेवलं जातं. आणि थोड्याच वेळात ते पूर्ण थांबवलंही जातं. हे करताना अवजड लंबकाच्या झुलण्याचा उलटा परिणाम होऊ नये यासाठी लंबकात निर्माण होणारी kinetic energy इमारतीच्या सांगाड्यात शोषून घेतली जाण्याची सोयही केलेली असते.

Tuned Mass Damper ची ही अभियांत्रिकी युक्ती वापरात आली तेव्हा सुरुवातीला त्याबद्दल कुणाला काही दिसू नये असा प्रयत्न केला जायचा. या प्रकारची यंत्रणा इमारतीच्या दर्शनी भागाच्या मागे लपवली जायची. मात्र आता तैवानमधल्या तैपेइ-१०१ सारख्या इमारतीत खास हा प्रचंड लंबक बघायला म्हणून पर्यटक गर्दी करतात.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results