आम्ही कोण?
काय सांगता!  

क्रिस्तिना झिनॅटो थेट शार्कच्या जबड्यात हात घालते

  • प्रीति छत्रे
  • 22.08.25
  • वाचनवेळ 2 मि.
shark

क्रिस्तिना झिनॅटो ही एक डीप सी ड्रायव्हर आहे. ‘कॅरिबियन रीफ शार्क’ जातीच्या शार्क माशांच्या संवधर्नासाठी ती झटते. तिच्या या संवर्धन प्रयत्नांमध्ये एक आगळावेगळा ट्विस्ट आहे.

क्रिस्तिनाला लहानपणापासून पाण्याचं, समुद्राचं, डायव्हिंगचं आकर्षण होतं. तरुण वयात डायव्हिंगच्या एका ट्रेनिंगसाठी ती बहामामध्ये गेली. तिथल्या अनुभवाने ती इतकी प्रभावित झाली की तिने तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. खोल समुद्रात विशेषतः शार्क माशांसहित विहरायला तिला आवडायला लागलं.

तिच्या सांगण्यानुसार, शार्क मासे अजिबात धोकादायक वगैरे नसतात. समोर दिसेल त्याच्यावर हल्ला करण्याची त्यांची मुळीच सवय नसते. ते आपल्यावर पाळीव प्राण्यांप्रमाणे प्रेम करतात. मात्र आपल्याला त्यांच्याशी नातं प्रस्थापित करण्याला वेळ द्यायला हवा.

क्रिस्तिना समुद्रात शार्क माशांसहित जास्त जास्त वेळ घालवू लागली. तिला शार्क माशांची आणि शार्क माशांना तिची देहबोली समजू लागली. ती समुद्रात उतरली की आसपासचे शार्क मासे तिच्याजवळ आपणहून गोळा होऊ लागले.

आणि एकदा एक वेगळीच गोष्ट घडली.

shark

क्रिस्तिनाच्या जवळ आलेल्या एका शार्कचं काहीतरी बिनसलंय हे तिच्या लक्षात आलं. तिने तिच्या नेहमीच्या पद्धतीने त्या शार्कला जवळ घेतलं, कुरवाळून बघितलं, पण शार्क तिला रोजच्यासारखा प्रतिसाद देईना. तिने त्यामागचं कारण शोधण्याचं ठरवलं. शार्कपासून जरासं लांब जाऊन तिने त्याचं चहूबाजूंनी सावकाश निरिक्षण केलं आणि तिला दिसलं की त्याच्या तोंडातून एक दोर बाहेर लटकत होता. तिने जवळ जाऊन पाहिलं, तर शार्कच्या घशात मासेमारीचा एक आकडा अडकलेला होता.

क्रिस्तिनाने शांतपणे शार्कच्या घशात हात घातला आणि तो आकडा बाहेर काढला. दुस-या दिवशी पुन्हा एक शार्क तिच्या जवळ आला. त्याच्याही घशात हूक अडकला होता. क्रिस्तिनाने त्याचीही सुटका केली.

आज क्रिस्तिना झिनॅटो या कामासाठी ओळखली जाते. ती खोल समुद्रात जाताना कायम डायव्हिंग सूटवरून एक हलका पण पोलादी सूट घालते. शार्कची भीती वाटते म्हणून नव्हे, तर ‘त्यामुळे माझ्यातलं आणि शार्कमधलं अंतर कमी व्हायला मदत होते,’ असं ती सांगते.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results